माझा लेक अगदी बाळ असताना पांघरूण म्हणून माझ्या सुती साडीची चौघडी पांघरत असे. कालांतराने ती चौघडी अपुरी पडू लागली तशी एकाला लागून एक अशा दोन मऊ साड्या पांघरू लागला. आपोापच त्या एकमेकींना शिवणे आले, आणि आमचे माय-लेकाचे पहिले नाते जास्त घट्ट झाले आणि त्या गोधडी सारखे मऊही :-)
पण मग थंडीत त्याला ही गोधडी पुरेना. बरं माझेही एव्हाना साड्या वापरणे कमी झालेले, पंजाबीचा सुटसुटीतपणा बरा वाटू लागलेला.
दरवर्षी मी आईला तिच्या वाढदिवसाला अन माझ्या वाढदिवसाला दोन सुती साड्या घेते. एक वर्षी आई म्हणाली, "अग या जुन्या साड्यांचं काय करू ग?" अन माझ्या लेकाने ते वाक्य बरोब्बर उचलले. "आजी मला दे ना तुझ्या साड्या..." माझ्या आईला इतके आवडले त्याचे ते वाक्य. अन मग आजी अन नातवाची एक नवीन घट्ट वीण विणली गेली.
अन मग दर वेळेस मी नवीन साडी दिली की नातू आजीकडून जुनी साडी हक्काने मागून घ्यायचा.
मग एके वर्षी म्हणाला," आई ही गोधडी छोटी पडते मला, मी गोल वळलो की की संपते." आता काय करावं बरं? एव्हाना त्याची उंची जवळजवळ सहा फूट झालेली. साडीची दुहेरी घडीच त्याला कशीबशी पुरत होती.
मग मी एका साडीचे दोन भाग केले अन उभ्यात ते जोडले. अशा प्रत्येक साडीला उभ्यात जोडत गेले. अन मग दर वर्षी आधीच्या गोधडीवर दोन साड्या चढत गेल्या. आता तर ती चक्क दुलई म्हणावी इतकी गुबगुबीत झालीय.
मग या उकाड्यासाठी पुन्हा आजीकडे दोन साड्यांची मागणी झाली. आणि आजी-नातवाच्या या नव्या नात्याच्या गोधडीला मी शिवण घातली घातली.
लेक लहान असताना एका प्रवासात त्याला झोप आली. अन पांघरुणाशिवाय झोपायचं नव्हतं. मग मी माझी ओढणी, कॉटनची ओढणी त्याला पांघरली. म्हणाला "आई ही पण छान गोधडी आहे :-) "
माझे जनरली कॉटनचेच ड्रेस असतात. जुन्या ओढण्यांचा पण असाच उपयोग करावा असा विचार केला. मग जुन्या सगळ्या ओढण्या काढल्या बाहेर. दोन दोन ओढण्या उभ्यात जोडल्या. माझ्यासाठी झक्क गोधडी तयार झाली.
आता माझेच माझ्याशी नवे नाते निर्माण झाले. जणु काही माझ्यातलीच मी, मलाच सापडले :-)