नमस्कार,
काय म्हणता?
सर्वप्रथम तुम्हांला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!! गुढीपाडवा झाला आणि तुमच्यापैकी अनेकांच्या स्पेशल मेनू आणि तयारीच्या पोस्ट्सनी मैत्रीण फुलून गेली होती. आता पाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र महिन्यासाठी आपण आपला एक जुना उपक्रम नवीन रुपात पुन्हा एकदा घेऊन येत आहोत... अर्थातच चैत्रवाण!
गेल्यावेळी ह्या उपक्रमाचं स्वरूप असं होतं की तुम्ही मैत्रीणवर नसलेल्या तुमच्या ओळखीतल्या/नात्यातल्या मराठी स्त्रीला मैत्रीणवर येण्याचं वाण द्यायचं. ह्या उपक्रमातून, चैत्रवाण घेऊन अनेक नवीन मैत्रिणी इथे आल्या आणि इथल्या मैत्रिणीच्या गप्पांमध्ये रमल्या. आपण अश्याच अनेकजणी जोडत जोडत मैत्रिणीला 1000 च्या घरात नेऊन ठेवली आहे.
आता मात्र आपल्या सगळ्यांना जाणवणारा मोठा "पण" इथे येतो. अनेक उत्साही, वेगवेगळ्या क्षेत्रांतील, वेगवेगळे विचार असणाऱ्या मुली इथे आल्या खऱ्या.. पण त्या आहेत कुठे? आपल्या स्वयंसेवकांनी केलेल्या पहिल्या फोनवर त्या मनापासून गप्पा मारून कायम येण्याचा, इथून वेगळं काही शिकायचा, वेगळं काही शिकवायचा उत्साह दाखवतात पण मग मराठी टायपिंग, टेक्निकल इश्यू किंवा अश्या काही कारणांमुळे त्यांचं येणं कमी कमी व्हायला लागतं... आणि आपण आपल्या चर्चेतला एखाद्या नवीन दृष्टिकोनाला, एखाद्या नवीन कलाप्रकाराला, एखाद्या नवीन रेसिपीला, एका नवीन गोड मैत्रिणीला भेटण्यापासून वंचित राहतो.
इतकी मोठी बडबड केल्यावर ह्यावेळचा चैत्रवाण काय आहे लक्षात आलं ना? ह्यावर्षी अश्या एका मैत्रिणीला पुन्हा एकदा इथे घेऊन येऊया जी सुरुवातीला इथे आली पण काही ना काही कारणाने तिचा वावर कमी झाला. अशी एखादी मैत्रीण जिच्या पोस्ट्स तुम्हांला आवडत होत्या पण आता तुम्ही त्या मिस करत आहात.. अशी एखादी मैत्रीण जिला मैत्रीणवरच्या धाग्यांचा खूप उपयोग होईल असं तुम्हांला वाटतं आहे.
घेऊन येताय ना? आम्ही सगळ्या नवीन-जुन्या मैत्रिणीची वाट बघतोय. पन्हं आणि आंब्याची डाळ करून ठेवा गं कोणीतरी :)
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle