कैक गोष्टी ना आपण उगाचच ‘अपने बस की बात नही’ म्हणून सोडून दिलेल्या असतात; काहीही कारण नसताना! प्रयत्नही न करता! आणि मग आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर कोणाच्या तरी निमित्ताने त्या गोष्टीबद्दल कुतूहल जागृत होतं. आहे तरी काय यात एवढं? - असं म्हणत आपण ती गोष्ट करून बघतो. आणि ती इतकी आवडते, की का आपण इतकी वर्षं वाया घालवली असं वाटायला लागतं. अशापैकीच मला सापडलेली एक नवीन गोष्ट म्हणजे फिल्म फेस्टिवल!
मी वयाची सगळी कळती वर्षं पुण्यात काढली. आपली आपण हिंडायला लागले, आवडेल ते करायला घरातूनही काही आडकाठी नव्हती; पण तरी कधी या वाटेला फिरकले नाही. पुण्यात फिल्म फेस्टिवल चालूच असतात, आशय फिल्म क्लबचे विविध उपक्रम चालू असतात, शॉर्टफिल्म्स दाखवल्या जातात. क्वचित कधी मी गेले पण एखादी फिल्म बघायला, पण ‘हा आपला प्रांत नाही रे बाबा’ अशीच काहीशी भावना असायची. हा सगळा उच्चवर्गीय किंवा इंटलेक्चुअल लोकांचा मामला आहे, अशी खूणगाठ मनात पक्की होती. एक मात्र होतं, की आसपास हे करणारं, हे छान आहे, जरूर जा आणि बघ असं सुचवणारं पण कोणी नव्हतं. सुचवलं असतं आणि मी गेले असते, तरी हे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा बघायची आणि अप्रिशिएट करायची अक्कल म्हणा समज म्हणा, मला तेव्हा होती की नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. तर ते एक असो!
लग्न झालं आणि नवऱ्याच्या नादाने जरा वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे, वेगळ्या भाषांतले सिनेमेही बघायला लागले. ते आवडायला लागले. गम्मत वाटायला लागली त्यात. आणि त्यातूनच एक प्रकारे माझा बेस तयार झाला फिल्म फेस्टिव्हलला जाण्याचा. मग भेटली एक मैत्रीण. म्हणजे खरं तर भेटली नाहीच, मैत्रिणीची (धाराची) बंगलोरात रहाणारी मैत्रीण म्हणून आधी वॉट्सप आणि मग फोनवर गप्पा झाल्या. गप्पांमध्ये खूपच मजा आली, आवडीच्या बऱ्याच गोष्टी समान निघाल्या. सिनेमांच्या गप्पा निघाल्यावर तिने बंगलोरमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलबद्दल सांगितलं आणि अगदी जरूर अटेंड कर असा आग्रहच केला. घरापासून भरपूर लांब असूनही मी जायचा निश्चय केला चक्क! चक्क म्हणायचं कारण म्हणजे गाडी/बस/रिक्षाने ३०-४० मिनिटं, मग मेट्रोने (तेही एकदा रूट बदलून) किमान ४० मिनिटं आणि पुढे चालत ५-७ मिनिटं एवढा एका वेळचा प्रवास करायला लागणार होता.
दीडदोन महिने मी आतुरतेनी वाट बघितली, वेळेवर माझं तिकीट काढलं (आणि आयत्या वेळेला जागं झालेल्या लोकांचं पण बरीच धडपड करून काढलं). पण ही आतुरता, धडपड अगदी सार्थ ठरली.
डबा-बाटली-आणि हो, मुख्य म्हणजे पास गळ्यात घेऊन मी पहिल्या दिवशी फेस्टिव्हलला पोचले. ओरायन मॉल फिल्म फेस्टिव्हलच्या पताका लेवून सजलं होतं. लग्नघरात असावी तशी लोकांची लगबग चालू होती. तिकीट काउंटरपाशी भली मोठी रांग लागलेली होती (सणावाराला मंदिरांच्या बाहेर रांगा असतात त्याची आठवण झाली. मग जाणवलं की हीसुद्धा तर भक्तांचीच रांग आहे.) त्या रांगेत बुकलेट मिळत होतं. बुकलेटमध्ये यंदा दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक सिनेमाची, शॉर्टफिल्मची व्यवस्थित माहिती (कलावंत, दिग्दर्शक, देश, भाषा, कालावधी, आणि गट) आणि ६-७ ओळींत कथेबद्दल थोडक्यात लिहिलेलं. अनुभवी लोकं बुकलेट वाचून अभ्यास करतात नि आपल्याला कोणत्या फिल्म्स बघायच्या आहेत ते ठरवून ठेवतात. मग कोणता शो कोणत्या थिएटरला आहे, किती वाजता रांग लावायची वगैरे अडाखे बांधतात. अर्थात, मला हे नंतर कळलं. (आणि कळलं असतं तरी मी आणि अभ्यास म्हणजे जरा...)
पहिल्या दिवशी माझ्याकडे मैत्रीण मानसी म्हणजे आपली मनवा (हीच ती, जिने मला फिल्म फेस्टिव्हल अटेंड करायचा आग्रह केला) हिच्या कृपेने रेडीमेड गाईड उपलब्ध होतं. तिला आतल्या गोटातून त्या दिवशीच्या ‘मस्ट वॉच’ सिनेमांची नावं कळली होती. मग मी बुकलेटच्या रांगेत न उभी राहता टेचात थिएटरच्या रांगेत उभी राहिले. जे नंतर सारखंच करावं लागलं.
एका वेळी दहा थिएटर्समध्ये दहा सिनेमे चालू असले तरी बऱ्याचशा सिनेमांसाठी भरपूssर रांग असायचीच. कैकदा थिएटरची क्षमता संपली म्हणून लोकांना प्रवेश मिळायचा नाही. मग ती लोकं त्या सिनेमाचा शो परत कधी आहे हे बघून ठेवायचे. अशा वेळी बॅकप प्लान उर्फ दुसरा चांगला ऑप्शन कोणता आहे माहिती असणं महत्त्वाचं ठरायचं. लगेच तिकडे पळता यायचं.
पहिल्या दिवशी पहिला सिनेमा पाहिला तो जपानी. मग एकटीने फूड कोर्टात जाउन डबा खाल्ला. पहिल्या दिवशी कसनुशी होऊन, मान खाली घालून (बाहेरचं अन्न खातेय म्हणून हाकलतील की काय ही एक भीती होतीच) एकटीने डबा खाणारी मी नंतर नंतर आरामात इकडेतिकडे बघत, अनोळखी लोकांशी तुम्ही काय पाहिलं-मी काय पाहिलं गप्पा मारत मजेत जेवायला लागले.
वेगवेगळ्या भाषांतले, वेगळ्याच शैलीतले सिनेमा बघायची चटक लगेचच लागली. रोज दोन-तीन तरी सिनेमे बघितलेच. काही सिनेमातल्या चित्रीकरणाने खिळवून ठेवलं, तर काही कथांनी; कधी बारीकसारीक घटनांचा, साध्याशा गोष्टींचा वापर करून अप्रतिम पद्धतीने कथा सादर केली होती. एकाच गोष्टी-घटनेकडे दिग्दर्शक कसा वेगळ्या नजरेनी बघतो हे जाणवलं. प्रत्येक सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत व्हायचं, तेव्हा भारून जायला व्हायचं; आपण या देशात जन्माला आलो, बरीचशी स्वातंत्र्यं गृहीत धरता येतात इतक्या सहजपणे मिळाली, हेही काही सिनेमांच्या निमित्ताने जाणवून मन कृतज्ञतेनी भरून यायचं. देश, संस्कृती, आचार-विचार-पेहराव कितीही भिन्न असलं तरी भावना मात्र सर्वदूर सारख्याच असतात, हे जाणवलं. मैत्रीची ओढ, वात्सल्य, सुरक्षिततेची गरज, प्रेमाची नितांत सुंदर भावना सगळीकडे सारख्याच!
फिल्म फेस्टीव्हलच्या निमित्ताने सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, गिरीश कासारवल्ली, अनंत महादेवन, अशा अनेक दिग्गज लोकांचं दर्शन झालं. सुमित्रा भावेंच्या सिनेमांची मी जोरदार चाहती असल्याने त्यांना भेटून मी आवर्जून सांगितलं तसं. पुष्कर श्रोत्री दिसले, गणेश मतकरी यांच्याशी थोड्या गप्पा होऊ शकल्या. काही मित्रमंडळी भेटली. कोणी ऑफिस-मूल-घरगुती जबाबदाऱ्या यातून वेळ काढत होतं, तर कोणी पूर्ण वीकेंड इकडे वाहिला होता. एक जोडपं तर रोज किमान चारपाच सिनेमे पहात होतं; ऑफिसमधून सुटी घेऊन इकडे येत असल्याने त्यांना पुरेपूर फायदा घ्यायचा होता या संधीचा. बरेच लोकं वर्षातला एक आठवडा या इव्हेंटसाठी राखून ठेवतात असंही कळलं! बऱ्याच देशा-भाषांमधले सिनेमे घरबसल्या, बघायची संधी, तीही मॉलमध्ये असूनही अल्प दारात, तेव्हा हे साहजिकच आहे असं वाटलं.
बऱ्याच सिनेमांना तासतासभर आधी रांग लावावी लागतं असे. साहजिकच रांगेमध्ये गप्पा! एकटीच असल्याने रांगेतल्या पुढच्या किंवा मागच्या माणसाशी बोलणं व्हायचं. काय पाहिलं?, आवडलं का?, का? किंवा का नाही? अशा गप्पा मारताना विभिन्न दृष्टिकोन समजले, लक्षात न आलेले पैलूही जाणवले. एकाच गोष्टीकडे बघणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा किती वेगवेगळे अर्थ शोधतात हे लक्षात येउन विस्मित झाले. अनोळखी लोकं सोडाच, रोजचा सोबतीसुद्धा अचानक काही वेगळंच दृष्टीस आणून देतो. आणि एकटीने सिनेमा बघण्याचा अनुभव हीसुद्धा एक खासच गोष्ट! म्हणजे घरी लॅपटॉपवर किंवा टीव्हीवर एकटीने सिनेमा बघणं वेगळं, आणि भर थिएटरमधे एकटीने जाणं वेगळं. हा अनुभव आधी क्वचितच घेतला होता. पण एकटी असल्याने माझ्या आवडीप्रमाणे सिनेमाची निवड करता आली, आनंद पूर्ण उपभोगता आला. फार वेगळा आणि समाधान देणारा होता हा अनुभव!
आता या ठिकाणी, मी पाहिलेल्या कोणत्याही सिनेमाविषयी, दिग्दर्शकाविषयी काहीच लिहिलं नाहीये याबद्दल काही जणांना आश्चर्य वाटेल, पण एक म्हणजे हे लिखाण माझ्या ‘फिल्म फेस्टिव्हल’च्या अनुभवांवर आहे. आणि दुसरं म्हणजे मी जर सिनेमांवर लिहायला लागले तर मला थांबताच येणार नाही. (थोडं काही लिहू असं म्हणत घेतलं होतं मी लिहायला, पण एका सिनेमावरच पानभर लिहिलं गेलं! मग तो विचारच रद्द केला.)
तर असा हा माझा पहिल्या फिल्म फेस्टिव्हलचा भारावून टाकणारा अनुभव, ज्यानी मला नवीन विश्वाचं दार उघडून दिलंय. मी आत्तापासूनच पुढच्या फेस्टिव्हलची वाट बघायला लागलेय. कोणी आहे का माझ्यासारखं?
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle