गुरू हा घाली ज्ञानांजन,गुरू दाखवी निजधन,गुरू सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी।।असा प्राणविसावा गुरू,साधकांचे साह्य करणारा,भक्तांची माय होणारा प्रत्यक्ष तारणारा मूर्तिमंत राबतोय,नर्मदालय येथे या भारती ताई ठाकूर यांच्या संस्थेत,एक लेकरू संभाळताना होणारी कसरत आठवली कि त्यांनी अशा आदिवासी गरीब मुलांना इतक्या सर्वांगीण संस्कारांनी फुलवलय ना की आपण थक्क होतो त्या मुलांचे संस्कार बघूनच.
त्यांच्या चालण्या बोलण्यातून पाहुणचारातून एक अदब व ऋजुता रुजवली गेली आहे.
त्यांच्या डोळ्यात एक तेज व आपुलकीची भावना चमकते.कुठेही दुबळेपणा केविलवणेपणा न दिसता भारती ताईंसारखी समर्थ माय पाठीशी असल्याचा आत्मविश्वास दिसतो.
मुलं शिकतील मोठी होतील त्यांना आत्मभान येईल त्यांचे निजधन त्यांना सापडेल, त्यांना संतांच्या रचनांमधून,संस्कारांमधून व साक्षात भारती ताईंच्या खम्बीर आधारातून दशदिशांचे खुले आकाश प्रगतीच्या वाटा दाखवेल,मात्र सतत या घरट्या कडे त्यांना फिरून विसवायला यावेसे वाटेल एव्हढा जिव्हाळा या स्वरांमध्ये जपला गेलाय.
रियाझ म्हणजे घराण्याच्या गायकी मागचा विचार शोधून त्यात गुरूंनी शिकवलेल्या स्वरांचे मोती स्वतःच्या शैलीने असे सुंदर गुंफायचे कि त्या स्वरांच्या त्रिवेणी प्रयागात श्रोत्यांनी न्हाऊन निघावे.
यात स्वर,गुरूंचे संस्कार,प्रत्येक स्वराचे साक्षात चित्र उभे करण्याची ताकद आणि लय ताल हरकती आणि मुख्य म्हणजे भावाची अभिव्यक्ती जी सगळ्यात उच्च आहे.
या मुलांमध्ये हा भाव पदोपदी जाणवतो आणि एवढया कोवळ्या वयातही जीवना बद्दलची शहाणी समज आपलयाला थक्क करून सोडते.
स्वर पाठलाग करीत राहतात.....
ध्यान मानसी लागले........
नर्मदे हर ।।
रश्मी भागवत।।
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle