खूप खूप वर्षांपूर्वी हा खेळ सुरु झालाय, खेळ मोहाचा. रचेत्याच्या मनात विश्वनिर्मितीच्या स्वप्नाने घर केलं आणि मग मंत्रोच्चार झाला -
'एकोहं बहुस्याम !'
मंत्राचारण झालं आणि जीवनाचा ओघ, दिशा निश्चित झाली. आणि मग तेंव्हापासून विणले जाऊ लागले हे मोहाचे, पाशाचे धागे. आणि सुरु झाला हा खेळ जीवनाची अखंड साखळी सुरु ठेवण्याचा. त्यासाठी मोहाच्या या धाग्यांचा आधार घेण्याचा आणि चैतन्याच्या स्रोतांना मोहाच्या धाग्यांच्या गाठी मारण्याचा.
जीवनानी, जीवनेच्छेनी आपल्याला मोहात पाडलं त्याही आधी खूप पूर्वी कधीतरी हे विश्वंच जीवनाच्या मोहाला शरण गेलं आणि मग ही जीवनशृंखला सुरु ठेवण्यासाठी पसरले गेले, विणले गेले, पाशात घेत गेले
'ये मोह मोह के धागे'
विश्वानि सुरु केलेल्या या जीवनाच्या यज्ञाला समिधा म्हणून अर्पण केले गेले
'ये मोह मोह के धागे'
ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम क इकतारा, जो बादलों में से गुज़रे
इतकी अखंड घट्ट वीण असलेले हे मोहाचे धागे आपल्या दोघांपर्यंत आले त्यात नवल कसले ? आपल्या दोघांपर्यंत हे शतकानुशतकांचे धागे, मोहाचे धागे आले यात नवल जरी नसलं, तरी इतक्या असंख्य शक्यतांमधून बरोब्बर आपले हे मोहाचे धागे एकमेकांपाशीच येऊन थांबले. एकमेकांत गुंफल्या गेले, हे मात्र नवल म्हणता येईल असे आहे.
हे कसे काय ? तुला मी आणि मला तू हे कसं काय ? कुणी बांधल्या या गाठी ? कसे हे मोहाचे धागे नेमके तुझ्यापाशीच येऊन थांबले, अडले, भिडले ? माझेही आणि तुझेही. हे विधिलिखित की निव्वळ योगायोग ?
ह्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात, तसं पहिलं असता, इतका खोल विचार करण्यासारखं माझं आणि तुझं असं महत्व तरी ते कितीसं ? दोन धाग्यांचं, आयुष्यांचं काय ते एव्हढं ? पण आपल्यासाठी तर ते आपलं पूर्ण आयुष्य, पूर्ण अस्तित्व असतं ना रे. मोहाच्या या सागरात तुला मी आणि मला तू. का ?
आधीच कुणी हे असं काहीसं होणार म्हणून, रचून बांधून ठेवले होते का हे धागे ? पूर्वनियोजित ? कि असं काही नसतंच मुळी ? विश्वाच्या पसाऱ्यातल्या क्षुद्र दोन जीवांना तेवढंच जरा महत्व, तेवढाच जरा त्यांचा विचार, म्हणून तर आपण असे प्रश्न स्वतःला घालत नाही ना बसत ? कि तसंच असतं ? नसावं.
कसं हे कोडं सोडवावं ? कशा ह्या गाठी उकलाव्या ? आपल्यासारख्या यःकश्चित अस्तित्वांना हे असं या प्रश्नांच्या खोल तळाशी जाणं शक्य तरी आहे का ? कि असंच मोहाच्या जंजाळात, प्रश्नांच्या विळख्यात अडकून राहायचं ? आणि ह्याला अनाकलनीय योजनेचा एक भाग, अंतिम निकाल म्हणून नादंच सोडायचा शोध घ्यायचा ?
का तू ? का मी ?
पण रोमारोमातून चाललेल्या ह्या चैतन्याच्या खेळाकडे त्रयस्थ नजरेने बघता हा विचार येतोच ना समोर. तुझ्या मनातही असं काही येतं का ?
तु होगा ज़रा पागल तूने मुझको है चुना
कैसे तूने अनकहा, तूने अनकहा सब सुना
तु दिन सा है, मैं रात
आना दोनों मिल जाए शामों की तरह
ये मोह मोह के धागे...
मी मला पूर्ण ओळखून आहे आणि त्यामुळेच आश्चर्य वाटतं, अशी कशी मी आवडले तुला ? कसा तुझ्या मनाने माझ्यासाठीच कौल दिला ? माझ्यातल्या उणिवा दिसल्याच नाहीत कि त्या उणिवांच्या पार तू मला पाहू शकलास ? जे खुद्द मलाही स्वतःकडे पाहताना जमत नाही.
की कुठल्या अनामिक शक्तीने हे तुझ्याकडून, आपल्याकडून करवून घेतलं ? कारण हे असंच व्हायचं होतं ? कुठलाश्या विधिलिखिताचे आवाज तर तुझ्याही नकळत तुझ्या कानांपर्यंत पोहोचले नाहीत ना ?
त्या आवाजात, त्या सुरात, एक आवाज, एक इच्छा माझीही होती कि हे असंच व्हावं, तोही ऐकू आला का तुला ? ती इच्छाही विधिलिखिताने माझ्यापर्यंत पोहोचवलेली होती का माझीच होती ते मात्र नाही माहित.
धागे एकमेकांत गुंतले हे नक्की आणि आपण दोघे एका सूत्रात बांधल्या गेलो हेही नक्की. बाकी सगळे प्रश्न. पण जाऊदे, प्रश्नांचं काय ते एवढं, ते असतातंच. पण किती वेगळे आहोत आपण. तुला अगदी स्पष्ट सगळं दिसत असतं. किंवा असं म्हणता येईल, तू प्रश्नांच्या पसाऱ्याला बाजूला करून, स्वच्छ दृष्टिने, स्पष्टपणे सगळं बघू शकतोस. विचारांची दिशा निश्चित ठरवू शकतोस. प्रश्नांना थोपवून, आपला मार्ग निश्चित करून पुढे जाणं जमतं तुला.
आणि मी , मी गोंधळते जरा प्रश्नांच्या पसाऱ्यात. वाढवून ठेवते अधीच असलेली गुंतागुंत, उभी करते स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात आणि विचारत राहते स्वतःलाच कठीण, फार कठीण असे प्रश्न. धुंडाळत असते सदैव प्रश्नांची टोकं, धाग्यांचे गुंते . शोधत राहते कारणं, परिणाम, रात्रीच्या अंधारात चाचपडल्यासारखी.
पण दिवसाच्या उजेडाची आणि रात्रीच्या काळोखाची भेट होत असतेच, संधीप्रकाशात. आपणही शोधूया ना आपला असा मेळ, आपला असा संधिप्रकाश. होईल ना हे शक्य ? इतकी दोन भिन्न व्यक्तिमत्व आपण .
ह्याला उत्तर म्हणून तू केवळ माझा हात पकडलास. आणि काही न बोलता मला सगळी उत्तरं मिळाली. प्रश्नांच्या राशी रित्या झाल्या . प्रश्नांना आता जागाच नव्हती. तुझ्या माझ्यावरच्या आणि माझ्या तुझ्यावरच्या विश्वासाने ती जागा व्यापली होती. घट्ट धरलेल्या हातांनी आता आपला प्रवास सुरु व्हायचा होता.
के तेरी झूठी बातें मैं सारी मान लूँ
आँखों से तेरे सच सभी, सब कुछ अभी जान लूँ
तेज है धारा, बहते से हम आवारा
आ थम के साँसे ले यहाँ
ये मोह मोह के धागे..
डोळे बोलतात, सगळं सांगतात. माझ्या गालातलं खट्याळ हसू बघून तुलाही ते कळतं म्हणाला होतास ना ? कळलंच असेल कि मी तुझे डोळे वाचू शकते. तुझ्या नजरेची भाषा आता परिचित आहे मला. कळतंय मला, जे बोलतोस, सांगतोस ते कधी-कधी खरं नसतं . मी नसतेच जगातली सगळ्यात सुंदर मुलगी. कधी कधी फार फार रागही येतो ना माझा ? कधी माझ्याही नकळत दुखावतोस. पण तरी तुझे शब्द त्यावेळी दुसरं बोलतात. पण त्यामागची मला जराही न दुखवायची भावना पोचते माझ्यापर्यंत. कारण माझे अश्रू पाहवत नाहीत तुला. पण डोळे सांगतात ना मला. मला माहितीये, मी वाचते डोळ्यात तुझ्या. नजरेला नजरेची भाषा कळू लागल्यावर शब्दांचा पसारा का मांडायचा ? शब्द अडसर आता. बस एकमेकांचा हात पकडायचा, अगदी घट्ट आणि पुढे चालू लागायचं. तुला माझा आणि माझा तुला आता आधार आहे ना. येतील काही वादळं, काही संकटं, खवळलेल्या तुफान दर्यासारखी. पण तरुन जाऊ आपण. एकमेकांची साथ आहे ना, हातात हात आहे ना, तुला विश्वास आहे ना ?
कधी वाटेलही आपल्याला की नाहीच एखाद्या प्रश्नातून बाहेर निघणार, पण करू आपण तरीही प्रयत्न. पुढे जाणं थांबणार नाही. तू आणि मी आता तसं होऊ देणार नाही. जरा एकमेकांचा आधार घेऊ, विसाव्यासाठी काही क्षण थांबू. पण पुन्हा चालायला लागू. आता अर्धा रस्ता पार केल्यावर का थांबणार आहोत ?
के ऐसा बेपरवाह मन पहले तो ना था
चिट्ठियों को जैसे मिल गया, जैसे इक नया सा पता
खाली राहें, हम आँख मूंदें जाएँ
पहुंचे कहीं तो बेवजह
ये मोह मोह के धागे...
आता तर प्रश्न सुद्धा घाबरवत नाहीत. तुझी सवय झालीये मला. आणि तुला माझी. अगदी बारीकश्या प्रश्नांपासून ते अगदी जीव दडपून टाकणाऱ्या प्रश्नांना आणि माझ्या मनाला आता पत्ता माहित झालाय, कुठे विसावा शोधावा ह्याचा. तू आहेस ना. काही प्रश्न उत्तर शोधतंच नसतात मुळी. ते शोधत असतात फक्त एक विसावा. निर्दय उन्हात एक हक्काची सावलीची जागा. आता तुझ्या-माझ्या प्रश्नांना माहित झालंय, चालून-चालून, दमून -भागून, थकून कुठे जरा वेळ विसावा घ्यायचा, थांबायचं ते. आणि फक्त प्रश्नांनाच कशाला, तुझ्या-माझ्या आयुष्यातल्या अगदी रोजच्या साध्या साध्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायलाही तुला-मी आणि मला-तूच आता सर्वप्रथम आठवतो. आता वचन दिलंय, ठरवलंय ना तर ह्या सगळ्यांतून, आयुष्याच्या कठीण रस्त्यातून, मांडलेल्या पसाऱ्यातून वाट काढायची. बोटं आपली एकमेकांत गुंफलेलीच राहू देत. नीयतीने आपल्याला एकत्र आणलं असेल, आणू दे. विधिलिखित, नीयती, असलं काही असेल किंवा नसेलही.
पण आता आहोत आपण दोघे, आपली साथ, आपला विश्वास आणि आपला रस्ता. काही कारण असेल का खरंच ह्या प्रवासाचं ? असेना का आणि नसेना का. आता तर तुझ्यावाचून मला प्रश्नांना भेटायचंच नाहीये आणि उत्तरंही पडताळून पहायची नाहीयेत. हा प्रवास, हा रस्ता, ही सोबत, हा घट्ट धरलेला हात हेच आता जास्त आवडायला लागलं आहे. आणि मला खात्री आहे तुलाही अगदी असंच वाटतंय . मग आपण नक्कीच पोहोचू कुठेतरी. रस्त्यावरच प्रेम जडल्यावर, सोबतीचाच मोह, गारुड पडल्यावर कुठे पोहोचू ह्याची चिंता कशाला ?
When journey itself is so beautiful
with warmth of your presence
who cares about destination?
It has to be beautiful.
If not, who cares?
We will make it beautiful.
Who thought these invisible strings
surrounding and binding us together
by some invisible force
will result in such a beautiful journey.
आता ते मोहाचे धागे राहिलेच नाहीत. त्यावरचं मोहाचं आवरण तर तुझ्या माझ्यासाठी कधीच गळून पडलंय. आता आपल्या दोघांना बांधून ठेवायला कसल्याच धाग्याची, मोहाची, गरज उरली नाहीये. आपल्या दोघांची सदैव साथ हे आता कधीही न बदलणारं सत्य झालंय. ह्यात बदल नाही, तर हे सत्य स्वीकारण्यासाठी परिस्थितीला जे काय धागे गुंफायचे आहेत ते गुंफू देत. आपल्याला बंधनात पाशात अडकवायला आता कुठल्याही बाह्य गोष्टींच्या आधाराची गरज नाहीये. आता धाग्यांची आणि कसलीच गरज उरली नाहीये. आता उरलीये ती तुझी-माझी साथ, तुझा-माझा विश्वास. आता तर ह्या हृदयीची भाषा त्या हृदयाला कळू लागलीये. आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझे हसू बघायलाही आता तूच हवा आणि माझे आसू पुसायलाही आता तुझीच साथ हवी.
कुठे थांबले जर कधी घाबरून, काहीच न आकळून जर कधी सैरभैर व्हायला झालं, कधी वाटलं मला की आता मी पुढे जाऊच शकणार नाहीये तर थोडा वेळ जवळ घ्यायला, वेडू म्हणायला, समजवायला, तू करू शकतेस म्हणून सांगायला, धीर द्यायला आता तूच हवास .
खचलेल्या मलाही तूच हवास
अन जिंकलेल्या मलाही तूच हवास
तुलाही अगदी असंच वाटतं ना ? माहितीये मला. तुला जाणून आहे मी. आता हातात हात आहे, नजरेत विश्वास आहे आणि आपण जसे चालू तसे वाटा मळणारा रस्ता आहे, मग कशाची भीती ?
आता कसलीच खळबळ नाहीये. सगळी माझी खळबळ, असंख्य दिशांनी धावणारे विचार, थांबतात, शांत होतात ते तुझ्यापाशी, तुझ्या साथीनी. किती सुंदर आहे हे ! आहे तयार मी आता तुझ्याबरोबर कुठेही, कितीही वेळ, कसाल्याही परिस्थितीत चालायला. तू पण ना? दिशा अशी सापडेलच अचूक आता आपल्याला. 'चल निघूया', आपण दोघांनीही एकाच वेळी म्हटलेलं ऐकलं रस्त्यानेही.
~ देवयानी गोडसे
चित्रपट : दम लगा के हईशा
गीतकार : वरुण ग्रोवर
