चैत्र ते फाल्गुन किंवा जान ते डिसेंबर,वैतागवाणे काम म्हणजे,गॅलरीत साठलेला कचरा साफ करणे.चैत्रात गुढ्या,नवनवर्षं शुभेच्छा,मग काय रामनवमी,मग हनुमान जन्म,असे सगळे देव देवता सण वार,मैत्री,प्रेम,भांडणे,व्हालेन्टाईन्स,झाडे ,प्राणी,पक्षी,अवघे चराचर गॅलरीत येऊन पडते.
मग काय,ती सकाळच्या कामात आणखीन एक काम वाढवते.अन्यथा आपलाच फोन ऐनवक्ताला दगा देतो.अति झालं आणि रडू आलं असं हल्ली होऊन गेलय.पावसाळा आला की लगेच कवितांच्या चारोळ्या येऊन सांडतात. सगळी कडे मग हिरवे अंकुर त्याचे काँग्रेस गवत आणि असंख्य ग्रुप्स व व्यक्तींकडून तेच तेच मेसेजेस येऊन गॅलरी म्हणजे तणमाजुरी होऊन जाते.
जयंत्या पुण्यतिथ्या यांना ऊत आला की गॅलरीत गुऱ्हाळी लावावे तसे असंख्य फोटो लटकतात, मग भिंती साफ कराव्या लागतात.
अध्यात्मिक अजीर्ण झालेले लोक आचरण ,व्रतवैकल्य,नाम,याबद्दल इतके सुविचार पाठवतात की असं वाटतं आता बाहेर सत्ययुग सुरू झालंच आहे जणू.कढई ,तवा,झाडे ,पक्षी,माणसे,आकाश,स्वयंपाक,नाती,अगदी गांडुळांवर सुद्धा लोक भावनिक ,जीवनावरील सार सापडल्यासारखे लिहितात.भजने, जगातील आश्चर्ये,व्यक्तिमत्व विकासावरील व्याख्यांने माणुसकी हे सगळे ऐकून बघून पृथ्वीचा स्वर्गच झालाय की काय असा भास होतो.आदर्श व वस्तुस्थिती यांची तफावत गॅलरीच्या बाहेर जाणवते.काहींचे सेल्फी धरण,ताजमहाल,अशा पार्श्वभूमीवर इतक्या रुबाबात टाकलेले असतात की जणू काही हे त्यांनीच बांधले आहे!! सामान्य म्हणून जगण्याचा व असण्याचा फोबिया असतो का इतका?
ऑडिओ,व्हिडीओ,हे तर अजस्र जागा व्यापतात.
ही सगळी अक्षरे,चित्रे, फोटो,विचार,कविता,एक दिवस पित्त उलटून टाकावेत त्याप्रमाणे गॅलरीतून पुसून टाकावेत असे वाटते.आणि गॅलरी स्वच्छ मोकळी होते,परत बकाबक खात सुटायला मोकाट माणसासारखी.
ऐच्छिक व अनैच्छिक स्नायूंचे कार्य जसे चालते तसे गॅलरीस ऐच्छिक स्नायू असायला हवे असे माझे स्वप्न आहे.काही दिवसातच गॅलरी साफ करण्यासाठी कामगार पाहिजेत अशी जाहिरात सुद्धा येईल पेपरात.
कोरी पाटी व स्वच्छ गॅलरी ही हल्ली दन्त कथाच होऊन बसली आहे जणू!