हे आमच्याकडचं "Slice of Monsoon"..
आमची स्वतःची लहानशी पावसाची सर...
भारतातल्या ज्या अगणित गोष्टी आम्ही इथे मिस्स करत असतो त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे मुसळधार पाऊस... खरं तर ओव्हरआल पाऊसच! त्यामुळे जेव्हा असं काहीतरी करूया हे डोक्यात आलं तेव्हा एक दिवसही वाया न घालवता आम्ही ही सर करायला बसलो आणि काही तासात पूर्णही झाली कि...
काही तास लागले कारण आम्ही बऱ्याच गप्पा मारत बसलो.. आम्ही म्हणजे मी आणि नवरा! पाऊस बनवायचा म्हणजे पावसाच्या गप्पा आल्याच... एकमेकांसोबत साजरे न केलेले आमचे २५-२७ पावसाळे आठवून त्यातले किस्से सांगत बसलो बराचवेळ. नाहीतर तासाभरात आरामात होईल ही कलाकृती.
तर काय केलं.. एक लाकूड घेतलं: हे आमच्या अति-आवडत्या योसेमिटीतलं लाकूड आहे. कुठल्या झाडाचं वगैरे माहित नाही. योसेमिटीत भटकत असताना कधीतरी हातात घेतलं होतं तशीच येऊन गाडीत बसले. गाडीत सीटच्या खाली बरेच दिवस राहिलं होतं. एक दिवस गाडी साफ करताना सापडलं आणि उगाचच इतका आनंद झाला. हे टाकून देणं शक्यच नव्हतं!
दोरे आणि मणी: गेल्यावर्षी आम्हांला फ्ली मार्केट ज्वेलरी बनवायची हुक्की आली होती. तेव्हा हे दोरे आणि मणी थ्रीप्ट स्टोर मधून घेऊन आलो होतो. एक-दोन कानातले केल्यावर आमचा उत्साह मावळला आणि वर्षभर ह्या दोन्ही गोष्टी खोक्यात पडून होत्या. ह्यात वापरल्या गेल्या.
लहान हार्ट्स: आमच्या लहान भाचीसाठी आम्ही वेगवेगळ्या आकारातल्या पंचिंग मशीन्सचा सेट आणला होता. हे एक हार्टच्या आकाराचं आम्हीच ठेवून घेतलं होतं. (तेसुद्धा कित्येक महिने वापरलं नव्हतं) दुधाच्या मोठ-मोठ्याला प्लास्टिक बाटल्या असतात इथे. दर आठवड्याला ती बाटली टाकणं जीवावर येतं माझ्या.. त्यातल्या बऱ्याच बाटल्यांच्या मी कुंड्याही केल्यात. विचार केला, दुधाच्या बाटलीलाच पंच करूयात. आणि त्यातून ते हार्ट बनवले.
हार्ट आणि मणी दोऱ्यात गुंफून लाकडाला बांधले आणि झालं आमचं स्लाईस ऑफ मान्सून तय्यार!