लोणी कढवण्यातलं अध्यात्म ....एका अमेरिकन स्त्रीच्या दृष्टीकोनातून (भाषांतरित)
जराशी प्रस्तावना :
मागील वर्षी अमेरिकेतल्या मुक्कामात जेव्हा वेळ मिळाला तेव्हा वाचन केलं. त्यातच घरी येणाऱ्या योगा मॅगझीनचाही समावेश होता.
संपूर्णपणे योगाला वाहून घेतलेलं अमेरिकन योगा मसिक. त्यात २००९ सालच्या एका मासिकात एक लेख आढळला. एका अमेरिकन महिलेने लिहिलेला.
काही कारणाने तिला लोणी कढवून तूप करण्याच्या पद्धतीची नव्यानेच माहिती झाली. आणि ती तिला खूपच आवडली आणि उपयुक्त वाटली. गरज ही शोधाची जननी आहे...म्हणतात ना!
आणि या नव्याने सापडलेल्या लोणी कढवण्याच्या पद्धतीत ती कशी मनापासून रंगून गेली याचं रंजक वर्णन इथे सापडते. आणि कोणत्याही कामात तुम्ही अगदी तन मन धनाने एकरूप होता तेव्हा तुम्ही जणु देवाच्या जवळ जाता, तुम्हाला जणु काहीतरी दैवी साक्षात्कारच होतो. असा या लेखाचा सूर आहे. या लेखावरून हेही जाणवते की या महिलेने प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा याचा अगदी अभ्यास नसेल पण निदान माहिती तरी करून घेतलेली दिसते.
आणि लोणी कढवताना घेण्याच्या काही प्रिकॉशन्स तिने सोप्या शब्दात वाचकांपर्यंत पोचवल्या आहेत. तिने खूप मोठ्या प्रमाणात क्रीम घुसळून जे प्रचंड प्रमाणातलं लोणी कढवलं त्यामुळे तिला या प्रोसेसमधल्या सगळ्या खाचाखोचा छान समजल्या होत्या असंही जाणवतं!
आपल्या सर्वस्वी भारतीय पद्धतीच्या, वर्षानुवर्षं चालत आलेल्या एका प्रक्रीयेचे नव्यानेच आणि तिर्हाईत नजरेने केलेले वर्णन मला खूप इन्टरेस्टिन्ग वाटलं आणि या कामातलं तिला गवसलेलं अध्यात्मही!
याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा आणि आपला प्राचीन आयुर्वेद यांचा अभिमानही वाटला.(या लेखाच्या निमित्ताने परत एकदा!)
यावरून खूप पूर्वी वाचलेला दुर्गा भागवतांचा एक लेख अंधूक आठवतोय.. चुलीजवळ बसून पाकसिद्धी करणाऱ्या एका अन्नपूर्णेचं चित्र त्यांनी फ़ार मनोहारी रेखाटलं आहे.
चुलीतल्या जाळाच्या उष्णतेमुळे त्या स्त्रीच्या चेहेऱ्यावरची प्रसन्न लाली, तिच्या अवती भोवती पसरलेली पाकसिद्धीची सामग्री! यात मिसळण्याच्या डब्यातले हळद तिखटाचे लाल पिवळे रंग आहेत.
भाजीपाल्यांचे हिरवे पोपटी रंग आहेत. अशी ही मनापासून पाकसिद्धी करण्यात रंगून गेलेली अन्नपूर्णा! एक सर्वांगसुंदर परिपूर्ण स्त्री!
थोडेसे महत्वाचे: या लेखाच्या भाषांतरासाठी परवानगी घेण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण संपर्कच होऊ शकला नाही. म्हणून हा लेख इथे "असाच" अपलोड करत आहे.
=================================================================================
वसंत ॠतूचं आगमन जवळ आलं तरी माझ्या विस्कोन्सिन प्रांतातल्या मॅडीसन या गावावर निसर्गाने रेकॉर्ड ब्रेकिंग (न भूतो न भविष्यति) बर्फ वर्षाव चालूच ठेवला होता.
वर्षातला हा काळ माझ्या नवऱ्याच्या कामात ढवळाढवळ करतो. माझा नवरा हा बायोडिझेल ट्रकमधून दुधाचा व्यवसाय करणारा आधुनिक काळातला दूधवाला आहे.
त्याने आपला ट्रक हॉस्टन गाईसारखा दिसावा म्हणून काळ्या पांढऱ्या रंगात रंगवला आहे.
मागील वर्षी वसंत ॠतूत एका आठवडा तो रस्त्यावर ट्रक चालवूच शकला नाही. त्यामुळे आमच्या घराच्या मागील दारी क्रीमचे ६० पिंटस बर्फात तसेच पडून राहिले. चार जणांचं कुटुंब फ्रेश क्रीम खाण्याची चैन किती दिवस करणार? फ्रेश क्रीम खाऊन खाऊन किती खाणार?
मला माहिती होतं की या चविष्ट पदार्थाचं जर काही केलं नाही तर हे नक्की वाया जाणार.
तेव्हाच माझ्या योगाच्या ग्रुपमधल्या काही मैत्रिणींनी मला या क्रीमचं क्लॅरीफाईड बटर बनवण्याची कल्पना सुचवली.
अनसॉल्टेड लोण्याला उष्णता देऊन तूप बनवतात. अश्या पद्धतीने उष्णता देऊन कढवलेल्या लोण्याचे तीन घटकांमध्ये विघटना होते.
हे ते तीन घटक……. लॅक्टोज(साखर), मिल्क प्रोटीन आणि फॅट.
मंद आचेवर लोण्यातली आर्द्रता नष्ट केली जाते. मग साखर आणि प्रोटीन बेरीमध्ये रूपांतरित होऊन भांड्याच्या तळाशी साठत जाते.
नंतर तयार तूप गाळून घेऊन ही बेरी बाजूला काढली जाते.
यानंतर जे तूप मिळते ते अत्यंत सात्विक आणि सुमधुर असे असते.
तुपाचा स्मोकिंग पॉईन्ट 485°F ( 252°C) इतका उच्च असल्याने कोणताही पदार्थ परतण्यासाठी किंवा तळण्यासाठी तूप हा लोण्याला अगदी उत्तम पर्याय होऊ शकतो.
तुपाच्या जबरदस्त स्वादामुळे आपण याचा वापर कोणत्याही पदार्थासाठी सीझनिंग म्हणून करू शकतो.
तुपाचं सीझनिंग (फोडणी) आपण अगदी ओटमील्सपासून ते भातापर्यंत, तसेच वाफवलेल्या भाज्यांपासून विविध प्रकारच्या करीजमध्येही वापरू शकतो.
इतकंच काय पण आपण याचा वापर ब्रेडवर (ब्रेड स्प्रेड) लावण्यासाठी सुद्धा करू शकतो.
तूप हे लॅक्टोज फ्री असल्याने पचायलाही हलके असते.
Down to the essence
सम्पूर्ण भारतात तूप हे शुभ शकुनाचे आणि पावित्र्याचे, मांगल्याचे प्रतिक मानले जाते.
भारतीय घरातील औषधांच्या कपाटात आणि स्वयंपाकघरातही तुपाच्या बरणीला अनन्यसाधारण महत्व आहे.
फक्त काही थोडी खबरदारी घेतली तर तूप वर्षभर फ़्रीजबाहेरही टिकते. तूप जर डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आणि आर्द्रतेपासून लांब ठेवले तर वर्षभर चांगले टिकते.
तरी काही लोक तूप फ़्रिजमध्येही ठेवतात.
"आयुर्वेदात भारतातली पाच हजार वर्ष पुरातन अशी रोग निवारण पद्धतीची जी परंपरा आहे, त्यानुसार तूप हा जितका अन्नपदार्थ म्हणून जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्वाचे तुपाचे औषधी गुणधर्म आहेत." असं कन्याकुमारी आयुर्वेद एज्युकेशन अॅन्ड रिट्रीट सेंटर, मिलवॉकी इथल्या सर्टिफाइड आयुर्वेदिक प्रॅक्टीशनर रीमा शाह म्हणतात.
"हा माणसाचं तेज वाढवणारं एकमेव महत्वाचा अन्न पदार्थ आहे. तेज किंवा ओजस म्हणजेच जीवन जगण्याची उर्जा जी आपणा सर्वांमध्ये असतेच!"असंही त्या पुढे स्पष्ट करतात.
शाह यांच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन पुराणांमध्ये आपल्याला तुपाचा उल्लेख सापडतो.
या पुराणांमध्ये तुपाचा तेजाविषयी, महत्वाविषयी खूप दाखले सापडतील. आपल्या महान भारतीय महाकाव्य महाभारतात, ज्याच्यात भगवद् गीताही आहे, तुपाचं वर्णन …जीवनाचं सार किंवा जगाला धरून ठेवणारा धागा असं केलं आहे.
"प्राचीन वेदांमध्ये तूप हे दैवी शक्तीचं रूपक/प्रतीक आहे."असे कॅलिफोर्निया स्थित बॉलीनास या शहरातील आयुर्वेदिक प्रेक्टीशनर पीटर मलाकॉफ म्हनतात.
"ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या निर्मितीत दैवी शक्ती लपलेली असते, आणि तीच शक्ती निर्मितीचा अर्क असते, तसेच तूप हे दुधामध्ये लपलेले असते, आणि तुपाला् दुधाचा अर्क किंवा सार समजले जाते." असेही मलाकॉफ म्हणतात.
The right churn
अमेरिकेत तुम्ही नॅचरल फ़ूड स्टोअर्स मधून किंवा ऑनलाइन ऑर्डर करून तूप मागवू शकता. पण खूपसे लोक घरीच लोण्याचं तूप बनवू शकतात.
मलाकॉफ यांच्या म्हणण्याप्रमाणे …. तीव्र संप्रेरके, कीटकनाशके आणि प्रतिजैविके जर टाळायची असतील तर तुम्ही ऑर्गेनिक पांढऱ्या लोण्यापासून सुरुवात करू शकता.
अर्थातच आता माझी पहिली पायरी म्हणजे माझ्याकडच्या असलेल्या क्रीमपासून लोणी बनवणे. मी एका जुना काउंटर टॉप मिक्सर वापरून रात्रीच्या शांत वेळी काम करण्याचे ठरविले.
मिक्सरची पाती फिरत होती त्यामुळे भांड्यातलं क्रीमही फिरत राहीलं.
तोपर्यंत मी एकीकडे स्वयंपाकघरातली बारिकसारिक कामे उरकंत राहिले आणि एकीकडे मिक्सरवरही लक्ष ठेऊन होते.
जेव्हा मिक्सरच्या नेहेमीच्या आवाजात थोडा आणखी बदल होऊन एका आवाजाची भर पडायची तेव्हा मी तिथे असलेल्या ताटल्या जरा लांब ठेवायचे.
जिकडे तिकडे मिक्सरममधला द्रवपदार्थ उडला होता. ओट्यावर, जमिनीवर सगळीकडे!
सगळा नुसता गोंधळ, पण तरीही मला लोणी काढता आलं, हेही नसे थोडके!
मी क्रीमच्या जवळ जवळ १९ बॅचेस घुसळल्या. त्यानंतर मला ताकात तरंगणाऱ्या लोण्याच्या गोळ्याचा इशारा देणारा मिक्सरचा एक जबरदस्त आणि वेगळा आवाज बरोब्बर समजायला लागला.
अगदी पहाटेपर्यंत सुद्धा माझं काम संपलेलं नव्हतं. पण नंतर मात्र मला, फ्रीजमधल्या त्या २४ पौंडाच्या लोण्याच्या गोळ्याच्या विचाराने छान झोप लागली.
Hot stuff
नंतरच्या २ संध्याकाळी माझ्या घरी काढलेल्या लोण्याला तुपात रूपांतरित करण्यासाठी समर्पित होत्या. घरातले सर्वात मोठे भांडे लोण्याने भरले.
मग गॅस चालू केला.
मग लोणी एकसारखं वितळू लागलं. मग गॅस बारिक केला. जेणेकरून लोण्यातलं लॅक्टोस आणि प्रोटीन हे फॅटपासून वेगळं होईल
जेवढा वेळ लोणी गॅसवर आहे, तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. लक्ष ठेवा आणि ऐकत रहा. लोणी गॅसवर असताना ते उकळत राहील आणि एका प्रकारचा तडतडणारा आवाजही लोण्यातून येत राहील. मग हळूहळू ते शांत होईल.
लोणी जेव्हा उष्णतेवर उकळत असते, तेव्हा ते ढवळण्याचा मोह आवरा. हे खूप महत्वाचे आहे. लोणी उकळताना अगदी त्याच्यातून जरी बुडबुडे येत असले तरी जर तुम्ही हा मोह आवरला तर लोण्यातील लॅक्टोस आणि मिल्क प्रोटीन यांच्यापासून सोनेरी रंगाचा तो अर्क म्हणजेच तूप आपोआपच वेगळा होइल.
या सगळ्या प्रक्रीयेला २० मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत कितीही वेळ लागू शकतो. ते तुम्ही किती लोणी कढवताय, भांडे किती मोठे आहे अश्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.
तूप तयार झालंय की नाही हे बघणे फार सोपे आहे. पातेल्यातल्या लोण्यात आता सगळं शांत आहे आणि बुडबुडे नाहीसे झालेत. एक छान सुगंध सगळीकडे पसरलाय.
आता मी गॅस बंद करून लोण्याचं पातेल खाली उतरवते आणि ते अर्धा तास तसेच ठेवते. एकदा ते स्थिर झाले की डबल केलेल्या पातळ फडक्यातून ते गाळून घेते. हे तूप स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद बरण्यांमध्ये भरून ठेवते.
भारतात तळाशी साठलेल्या बेरीचा वापर तुपाचे दिवे लावण्यासाठी करतात. पण माझ्या स्वयंपाकघरात ही बेरी म्हणजे माझ्या कुत्र्यांची मेजवानी!
Divine flow
गरम तुपामुळे बरणीच्या झाकणावर वाफ धरली जाऊ नये म्हणून, मी बरण्या बंद करण्याआधी तूप पूर्णपणे थंड होऊ देते.
याबाबत मलाकॉफ म्हणतात, "असे केल्याने आर्द्रता बाहेरच रोखली जाते आणि तूप वर्षभर टिकते."
तूप चमच्याने काढून घेताना सुद्धा स्वच्छ कोरडा चमचा वापरला पाहिजे.
तुपाचा मेल्टिंग पॉईंट रूम टेम्परेचर इतकाच असल्याने तूप रुम टेम्परेचरला कधी लोण्याइतके पातळ तर कधी ऑलिव्ह ऑइल इतके पातळ असते. १ पौंड लोण्यापासून साधारणपणे पाऊण किलो तूप बनते.
मी १७ पिंटस तूप मिळवलं. जर यात आणखी थोडं सांडलेलं, थोडं गाळताना वाया गेलेलं, थोडं नमुन्यादाखल वगळलेलं असंही धरलं तर ते १८ पिंटस असू शकतं.
तीन दिवस माझ्या डेअरीतलं सगळं क्रीम वापरून मी त्या क्रीमचं रुपांतर जेव्हा त्याच्याच सर्वात शुद्ध स्वरूपात केलं, तेव्हा लोणी कढवून तूप करणे म्हणजेच देवत्वाशी नातं जोडणं असं मलाकॉफ का म्हणतात हे कळलं .
माझे स्वत:चेच विचार या सर्व प्रक्रियेत खूपच शांत झाले. या प्रक्रियेमुळे माझ्यात एक अविचल असा अवेअरनेस आला जो तुम्हाला अंतत: चिंतनाच्या किंवा ध्यानाच्या दिशेने घेऊन जातो.
…ज़ी प्रक्रिया खूप अविरत काळ चालते अश्या एका प्रक्रियेत भाग घेताना माझ्या मनाला एका प्रकारच्या शांततेची जाणीव होत होती.
आणि मी जणु स्वत:लाच पहात होते …… गाळणीतून खाली झिरपणारं तूप आनंदात निरखणारी मी, याच्या दाटपणाचं कौतुक करणारी मी आणि या द्रवरूप सोन्याच्या साध्या सरळ प्रवाहापासून प्रेरणा घेणारी मी!