एक छोटासा लमहा है .... भाग १

एक छोटासा लमहा है ,जो खत्म नही होता
मै लाख जलाता हूं, ये भस्म नही होता....

बाकी कुटुंबाला शक्य नाही तरी बापाकडे हट्ट करून एकटीच स्वतःच्या गावी आलेली , 12-13 वर्षांची मुलगी ...
बापाने पण जीवाचा तुकडा आपल्याच लोकांच्यात तर जातोय म्हणून मना विरुद्ध का होईना पण जायची परवानगी दिलेली ,लाडक्या लेकीला काही कमी पडायला नको म्हणून तिच्या सोबत भरपूर खाण्यापिण्याच्या गोष्टी , तिच्यासाठी तर दिल्याच पण तिथे असणाऱ्या बाकी सगळ्यांसाठी ही दिल्या...

ही निघाली तिच्या स्वप्नातल्या साहसी प्रवासाला... डोळ्यावर चढलेली झोप उतरायच्या आधी गावी पोहचली देखील ...
भलतीच खुश होती ती ,कानात वार भरल्या सारखी गावभर हिंडायची, गुर चरायला न्यायची ,नदीत डुंबायची तिथल्या तिच्या भावंडांसोबत धमाल मस्ती सुरू होती तिची

सकाळी न्याहरी ला भाकरी , जेवायला मातीच्या भांड्यात केलेला डाळ भात ,चुलीच्या शेजारी बसून खायचा ...
तिच्यासाठी तर स्वर्ग सुख होतं ,रमली होती ती छान तिथे

एकदा ती खेळत होती नी बघता बघता सगळी भावंड गायब झाली फक्त गावातली इतर मुलं उरली , नेहमीच व्हायचं असं पण त्या दिवशी बहुदा सगळी भावंड एकत्र गायब झाली म्हणून तिच्या लगेच लक्षात आलं कदाचित ,कुठे गेले सगळे म्हणून ती घरी निघाली ,वाटेत तिने ठरवून टाकलं ,चांगलं खडसावून सांगायचे त्यांना की परत असं मला एकटीला सोडून गायब व्हायचे नाही ...

घराची पायरी चढली तर सगळी सामसूम ,"अरे गेले कुठे सगळे" म्हणत ती एक एक खोल्या शोधत पोहचली स्वयंपाक घरात ...तर तिथे काळोखात सगळे गोल करून बसले होते नी घरातली कर्ती बाई त्यांना ,तिच्याच बापाने पाठवलेला खाऊ आग्रहाने खाऊ घालत होती ....
ती सुन्न...
तिला बघून सगळेच सटपटले... बोललं कुणीच काही नाही

दुसऱ्याच दिवशीच्या गाडीने ती तिच्या घरी परत आली , बाप आश्चर्य चकित," 2 महिने येत नाही म्हणून गेलेली लेक , इतक्या लवकर कशी आली "
" तुमची आठवण आली" म्हणत ती त्यांच्या गळ्यात पडली ते ही खुश ,फक्त एक मुलगी आयुष्याचा धडा शिकली इतकंच...

अर्चना राणे
18/4/2018

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle