एक छोटासा लमहा है,जो खत्म नही होता,
मै लाख जलाता हूं, ये भस्म नही होता
अचानक कोसळलेल आभाळ , सावरायला बाप नाही ... आई गोंधळून गेलेली पदरात नुकतंच जन्मलेल्या मुलासोबत अजून थोडी मोठी मुलं...
काय झालंय नक्की हे मोठ्यांनाच नीट समजलं नाही तर मुलांना कुठले समजायचे... जगाचे भोचक प्रश्न आणि प्राप्त परिस्थितीत काय करावे हा कठीण प्रश्न ह्यात अडकलेली आई ....
एक जवळचा नातेवाईक घरी येतो ,तिला म्हणतो "तुमच्या मागे आधीच इतके व्याप आहेत ,मी काही दिवस थोरलीला माझ्याकडे नेतो ,बायको माझी नीट काळजी घेईल तिची"
थोरली 7 -8 वर्षांची ,घर सोडून कधीच कुठे न गेलेली पण त्या परिस्थितीत तिला इतकं समजलं आपण जायला हवं ,आईवरचा एक भार हलका होईल.
निघाली त्याच्या सोबत ... त्याच नुकतंच लग्न झालेले,बायको मोठ्या घरातून आलेली तर तो मध्यमवर्गीय.
थोरलीला घरी सोडून तो गेला कामाला....
दुपारची वेळ होती घरात फक्त त्या दोघी , तिने थोरलीच्या हातात परात ठेवली म्हटलं," मांडी घालून बस नीट "
ती बसली 20 किलो चा मोठा डब्बा आणून तिने समोर ठेवला ,म्हटलं "हे गहू निवडून ठेव"
थोरलीला निवडायचे म्हणजे काय करायचे ?हेच माहीत नव्हतं ...तिने दाखवलं हे असं करायचं नी मांडीवर च्या परातीत गहू ओतले ...
परातीच्या ओझ्याने तिचे इवले पाय दुखू लागले पण इतकं झाल्या शिवाय इथून हलायचे नाही अशी सक्त ताकीद होती ...
बिच्चारी पोर, काळोख होई पर्यंत ते गहू निवडत एका जागी बसून होती ...पाय पाठ कम्बर सगळं ठणकू लागलं तरी हलली नाही ...
निग्रहाने तिने तिथे रहायचे सगळे दिवस पूर्ण केले मगच घरी परतली ...
तोवर तीच जग परत सुरक्षित झालं होतं... तिचे बाबा परत आले होते , ती त्यांच्या गळ्यात पडून इतकंच म्हणाली की "परत कधीच मला सोडून जायचं नाही" ...
"पिल्लू मर्जीने नाही ग गेलो" ...
" तरी ही नाही जायचे ...जायचे तर मला सोबत घेऊन जायचे "
कुणालाच काही समजले नाही फक्त एक मुलगी अचानक घरकामात प्रचंड हुशार झाली इतकंच....
अर्चना राणे
19/4/2018