एक छोटासा लमहा है ,जो खत्म नही होता
मैं लाख जलाता हूं ,ये भस्म नही होता
नवीन लग्न झालेली मुलगी , नात्यातल्या एका लग्नाला गेली ... लग्ना नंतर
पहिल्यांदाला कुणाच्या लग्नाला जात होती ...थोडी बावरलेली तरी बरीच एक्सआयटेड ...
सगळे नातेवाईक भेटतील ओळखी वाढतील.
सगळ्यांशी हसून बोलत होती ,छान सुरू होता दिवस तिचा
इतक्यात एक बाई आल्या ,सासू चा हात धरून ,
"ऐकलस का ग ? ह्या तुझ्या सासू ने खूप कष्ट काढलेत ,आता तिला आराम मिळायला हवा "
ओठावर हसू कायम ," बरोबर आहे तुमचे"
" नुसतं बरोबर आहे काय म्हणतेस? त्या साठी मी तिला माझ्याकडे नेणार आहे रहायला"
सस्मित चेहऱ्याने
" हो , ठीक आहे"
"ठीक आहे काय, ठीक आहे ? मी घेऊनच जाते बघ तिला माझ्याकडे"
तरीही अंदाज न आल्याने वेडी पोर म्हणून गेली, " अहो , घेऊन जा की ,मी कुठे नको म्हणते आहे, चांगलं महिनाभर ठेवलात तरी काही म्हणत नाही मी "
हेच हवं होतं बहुदा त्या व्यक्तीला
" काय ग तू , काल आली नाहीस तोवर आज सासू ला घराबाहेर काढायला निघालीस ?"
अनपेक्षित हल्ल्याने ती बावरून गेली ,"काय चुकलं माझं ? "
आधाराला सासुकडे पाहिलं तर ती ही तल्लीन त्या बाईच्या मुक्ताफळात , कुणी कुणी नाही सोबत आधाराला तिच्या बाजूचं.
डोळ्यातलं पाणी निकराने परतवत , हसून प्रसंग साजरा केला ....
कुणालाच काही समजलं नाही... फक्त एक सून अबोल झाली कायमची इतकंच....
अर्चना राणे
22/3/2018