सृजनाच्या वाटाबद्दल वाचले. म्हंटलं माझी एक आवडती जागा शेअर करुया. पूर्वीच लिहिलेला लेख आहे हा..
आज सकाळी उठुन अचानकच कुठे तरी फिरायला जाऊया विचार करायला लागलो.आमच्या रायगड जिल्ह्याचं एक बरं आहे एका दिवसात जाऊन परत येता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत. मग जवळच अलिबागला जाऊन येऊ ठरवलं.
पुणा हायवे आमच्या गावाच्या अंगणात तर गोवा हायवे परसात आहे.जातानाचा आमचा रसायनी ते आपटामार्गे खारपाडा रस्ता माझा अतिशय आवडता रस्ता आहे.दुतर्फा गर्द झाडी,डोंगर,बाजूने लांबून छान पण जवळून पूर्ण प्रदूषित नदी!
एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत. वडखळला मिसळ वडा स्टाॅप घ्यावाच लागतो असा अलिखित नियम आहे! वडखळ पोयनाड गेलं की छानसा दोन्ही बाजूनी झाडी ,कौलारू घरं असं टिपिकल कोकणी दृश्य दिसायला लागलं की समजायचं पळी गाव आलं!
अलिबागच्या दिशेने प्रवास करताना उजवीकडे अगदी जुन्या पध्दतीचं उतरत्या कौलाचं छोटंसं घर .त्यावर डि सॅमसन सोडा फॅक्टरीचं नाव दिसेल. दुतर्फा गाड्या लागलेल्या असतीलच.
आत गेलं की जुनाट लाकडी बाकडी,जुन्या सोडा बाटल्या असा कारभार, अगदी माफक किंमती लिहिलेला दर फलक बघून बिचकू नका.आपण अगदी बरोबर ठिकाणी आलो आहोत!
अलिबाग भागात अनेक शनवार तेली म्हणजेच ज्यू कुटुंबं स्थायिक झालेली आहेत. त्यातलेच एक दिघोडकर.त्यांच्यातल्या डॅनियल दिघोडकरांनी या जागी १९३८ मध्ये ब्रिटिशांना आवडेल असे शीतपेय म्हणून आईसक्रिम सोडा बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी युरोपातून ८० वर्षापूर्वी मशिन आयात केली.पण त्यावेळी जवळचे तीनविरा धरण नव्हते. मग अंगणात विहिर खोदून त्या विहिरीचे पाणी वापरून त्यांनी आपल्या सीक्रेट फाॅर्म्युलाने हा सोडा बनवायला सुरूवात केली. तीच पध्दत आजतागायत त्यांच्या तिसऱ्या पिढीने सांभाळून ठेवली आहे. अगदी आजही त्याच पध्दतीने सोडा बनवला जातो.मुख्य म्हणजे आता हे दुकान त्यांनी परंपरा म्हणून सुरु ठेवले आहे.यातून धंदा करणे हेतू नसल्याने अजूनही हे माफक दरात देणे त्यांना परवडते आहे. इतर सोड्याची जळजळ या सोड्यात जाणवत नाही. आईसक्रिमचे माधुर्य आणि सोड्याचा फिझीनेस यांचे लाजवाब मिश्रण त्यांना साधले आहे .इथे निरनिराळ्या प्रकारचे सोडा मिळतात.फळांच्या फ्लेव्हरचा,मसाला सोडा आणि माझा आवडता आईसक्रिम सोडा. हल्ली घरी न्यायला पेट बाटली मात्र मिळायला लागली आहे.
माझ्या मुलाने आधी प्यायला नव्हता हा सोडा.यावेळी बाटली मिळाल्याने घरी आणता आला.मुलाला अतिशय आवडला.मग म्हंटलं मैत्रिणींबरोबर शेअर करूचया हे चविष्ट प्रेक्षणीय स्थळ.अलिबागला जाताना घ्याच एकदा आस्वाद.
( ही जाहिरात नाही!)