मे २०१८ - कुटं कुटं जायाचं - शिवथरघळ

बरीच वर्षे शिवथरघळी बद्दल ऐकले होते पण काही ना काही कारणाने आणि मह्त्वाचे म्हणजे थोडे आडवळणी असल्याने राहून जात होते.
मागच्या वर्षी दुबईतल्या दासबोध मंडळातर्फे , ९-१३ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी शिवथरघळ येथे १ आठवड्याचे शिबीर आयोजित केले होते. इथेच बरीच वर्ष राहणारी ही मुले , एकदम तिथे कशी राहातील ह्याची धाकधूक होती , पण तरी नाव घातले होते. तर त्यांना सोडायला आम्ही मिनी बस करून शिवथरघळला पुण्याहून भोर मार्गे वरंधा घाटातून गेलो होतो. साधारण १२५ किमी अंतर आहे. ताम्हीणी घाटातूनही जाता येते. पण पुण्याहून ते अंतर जास्त पडते.

भोरमधला राजवाडाही चांगला जतन केला आहे आणि बघण्यासारखा आहे.

वरंधा घाट हा एक वेगळाच थरारक अनुभव होता. एक दोन वळणे अक्षरशः ठोका चुकवतात. पण उजव्या बाजूची दरी व दूर वर दिसणारे किल्ले हे अतीव सुंदर दिसते ...

वरंधा घाट
20170730_182146.jpg

घाटातली भजी , बटाटेवडा व चहा न चुकवावा असाच... आम्ही गृपमध्ये सगळ्यांना मिळून घेतले होते त्यामुळे किती पोटात गेले त्याचा हिशोबच नाही , त्यामुळे अपराधीपणा न बाळगता मनसोक्त खाल्ले आणि वर वाफाळता चहा... मी चहाची भोक्ती नाही पण त्या पावसाळी हवेत खूप छान वाटत होते चहा प्यायला ..

घाट संपला कि उजव्या बाजूला शिवथरघळ ६ किमी अशी एक पाटी आहे. ती वाट खूप अरुंद आहे आणि शिवाय तिथली वळणे Whew मी पळत्/चाल्त येते पण खाली उतरवा असे झाले होते. समोरून गाडी आली तर वाट अरुंद असल्याने खूप भीती वाटते. त्यामुळे त्या वाटेने जाऊ नये असे मी सांगेन .. जर घाट उतरून तोच रस्ता चालू ठेवला तर , साधारण १५-२० किमी वर उजवीकडे परत एक फाटा आहे , ( ज्या गावाच्या जवळ हा फाटा आहे त्या गावाचे नाव विसरले. पण तिथून महाड २५ किमी राहिले होते ) आणि तो सरळमार्गी आहे. मुलांना आणायला गेलो , तेव्हा ह्या वाटेने गेलो.

मुक्काम आल्याचे पटकन कळत नाही , आणि एकदम कमानच दिसते

घळ थोडी वर आहे आणि पार्किंगपासून थोडे वर चढून जावे लागते. पायर्या केलेल्या आहेत.

घळीच्या इथला धबधबा
rsz_20170730_155031-effects.jpg

धबधब्याच्या मागेच घळ आहे.

20170805_134003.jpg

इथे एक आहे कि , जेवण तिथे करणार असाल तर आधी कळवावे लागते. हे खूप दुर्गम जागी आहे त्यामुळे सामानाची ने आण हे खूप मोजून मापून केले जाते. लँड्लाइन आहे पण ती लागत नाही , मोबाईलला तर रेंजच नसते. पूर्णपणे आंतरजालापासून दूर होतो. पण तरी तिथे गेल्यावर ह्या सगळ्याची आठवण आली नाही.

तिथे प्रचंड माकडे आहेत. माणसाळलेली आहेत आणि अजिबात काही करत नाहीत
20170805_132352.jpg

जावळीच्या चंद्रराव मोरे ह्यांचा वाडा घळीपासून वर २ किमी चढत गेल्यावर आहे. वेळेअभावी जाता आले नाही. पण तसे नियोजन करून जाता येईल.

शिबीराचा मुलांचाही अनुभव खूप छान होता. आणि ह्यावर्षी सुद्धा तो जायला तयार आहे ह्यातच सगळे आले. जरा आडवळणी जागा आहे पण तिथली अनुभूती प्रत्येकाने घ्यावी अशीच.

हे खालचे २ फोटो बघा

डावीकडचा , साल्झ्बर्गला जातानाचा आहे आणि उजवीकडचा शिवथरघळ ला जातानाचा.
collage.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle