आत्ताच माहेरी आईच्या हातच्या भरपूर फेण्यांवर ताव मारून आले. इथल्या खुपजणींच्या आवडीचा आणि निगुतीने करण्याचा पदार्थ आहे. इथे व्यवस्थित अल्युमिनियम भांड्यात करायची रेसिपी आहे पण आम्ही जरा पारंपरिक पद्धत वापरतो तशी इथे लिहिते.
साहित्य:
तांदुळाचं पीठ - साधारण अर्धा किलो (गावठी जरा सुवासिक तांदुळाचे जात्यावर दळलेले बारीक पीठ वापरले. त्यामुळे तुम्ही शक्य तितके बारीक पीठ चाळून घ्या.)
ठेचलेली हिरवी मिरची - आवड आणि ताकतीनुसार :P
ठेचलेले जिरे - १-२ टेस्पू
मीठ - आवडीनुसार
सायीचे दही - भरपूर! थोडे फेण्यांसाठी बाकी तोंडी लावायला.
चांदीवडयाची/पळसाची पाने - जितक्या फेण्या हव्या तितकी.
मोदकपात्र/steamer
कृती:
१. तांदुळाचे पीठ एका मोठ्या पातेल्यात साधारण ८ ते १० तास सरसरीत भिजवून ठेवा, ते आंबून थोडं फुगेल.
२. आता त्यात मीठ, हि. मिरची ठेचा आणि जिरे घालून नीट ढवळा. पाणी कमी वाटत असेल तर अजून थोडं घालून ढवळा. मिश्रण डोश्याच्या पिठापेक्षा पातळ हवं.
३. आता सगळी पाने नीट धुवून, पुसून घ्या. एक पान घेऊन त्याला सायीचं दही (ग्रीसिंग केल्यासारखं) लावा.
४. डावेने मिश्रण पानावर ओता, पान हातात धरून मिश्रण गोलाकार पसरवा.
५. मोदकपात्रात पाणी घालून चाळणी ठेऊन गॅसवर ठेवा. पाणी उकळले की चाळणीवर हलक्या हाताने तयार पान ठेऊन झाकण लावा. पाच मिनिटात उघडून बघा, फेणी शिजून जवळपास पारदर्शक झाली असेल. लगेच पान बाहेर काढून ठेवा, दुसरे पान शिजायला लावा.
६. थोडं गार झाल्यावर हलक्या हाताने फेणी सोडवून काढा आणि नुसतीच किंवा सायीच्या दह्याबरोबर खा.
७. ह्या गरमागरम खाण्यातच मजा आहे त्यामुळे आई किंवा इतर प्रेमळ व्यक्तीला करायला लावा आणि तुम्ही बसून ताव मारा