सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते. तर अशीच त्या दिवशी पावसाला विश्रांती घ्यायची अजिबातच इच्छा नाही असे दिसले. त्यामुळे छत्र्या, जॅकेट सोबत घेऊन शेवटी बाहेर पडलो. आमच्या मालकांच्या कृपेने आम्हाला एक कार्ड मिळाले होते ज्यात इंटरलाकेनच्या जवळचा काही प्रवास फुकट होता. :) म्हणून मग चालतच विल्डर्सविल स्थानकावर आलो जिथून इंटरलाकेन साठी ट्रेन घ्यायची होती.
इंटरलाकेन (Interlaken) हे दोन मोठ्या लेक्सच्या जवळचे आणि या भागातले सगळ्यात मोठे शहर. युंगफ़्राउ आणि एकूणच बेर्नर आल्प्स बघण्यासाठी इथूनच ट्रेन्स सुटतात. याशिवाय इतर अनेक मोठ्या शहरांशी ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने हे जोडले गेले आहे त्यामुळे पर्यटकांची बरीच गर्दी असते. एका बाजूला थुन लेक (Thun Lake) तर एका बाजूला ब्रीएन्झ लेक (Brienz Lake) आणि मधून वाहणारी आरं नदी (Aare) असे अनोखे निसर्ग सौंदर्य असलेले हे शहर. ब्रीएन्झ लेक हा १४ किमी लांब तर थुन लेक हा १७ किमी लांबवर पसरला आहे. ग्रिंडेलवाल्ड आणि लाउटरबृनेन व्हॅली मधून वाहत येणारे अनेक झरे आणि आर आणि ल्युटशिनं या नद्यांपासून वाहत येणारे पाणी हा ब्रीएन्झच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत. याचीच एक बाजू पुढे थुन लेकला जोडली जाते. दोन्ही तळ्यांच्या काठावर अनेक छोटी छोटी गावं वसली आहेत.
५ ते ७ मिनिटात इंटरलाकेनच्या स्थानकावर पोहोचलो. कुठेही गेलो तरी पावसामुळे फार काही बघायला मिळेल याची खात्री नव्हतीच. मग फार विचार न करता बसने इझेल्टवाल्ड (Iseltwald) या ब्रीएन्झ लेकच्या काठावर असलेल्या गावात जाऊयात म्हणून बस स्थानकाकडे निघालो. नाही म्हणायला दोन चार लोक बस मध्ये होते, तेही सगळे स्थानिक. अगदी २००-३०० घरांची लोकवस्ती असेल या गावात. सुट्टीचा दिवस नव्हता तरीही सगळीकडे शुकशुकाट. तलावातील निळे पाणी, त्यात पडणारा पाऊस, आजूबाजूची हिरवळ आणि खाली उतरलेले ढग ही शेवटी या पावसाळी हवामानाचीच देणगी. फक्त त्यामुळे फारसे फोटो काढण्यासारखे वातावरण नव्हते. तरीही मोह आवरेना.
परतीची बस पुन्हा एक तासाने होती. आता अशा वेळी काय करायचे या प्रश्नाचे उत्तर हमखास ठरलेले असते - कॉफी. एकच हॉटेल दिसलं जवळ, पण बाहेरून पाहिले तर कुणीच दिसत नव्हते. बंद आहे की काय अशी शंका घेत जरा बिचकतच आत डोकावलो तर चार डोकी दिसली आणि बरे वाटले. तळ्यात पडण्याऱ्या पावसाची गंमत पाहात गरमागरम कॉफीचा आस्वाद घेणे म्हणजे निव्वळ सुख.
पावसाने हिरमुसलेले मन परत ताजेतवाने झाले आणि इंटरलाकेनला परत आलो. इथे पूर्व आणि पश्चिम अशी दोन स्थानके आहेत. या दोन्ही स्थानकांच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर हरतऱ्हेची दुकानं आहेत. स्विस घड्याळे, नाइफ़, चॉकलेट्स, स्की आणि इतर हिवाळी खेळांचे साहित्य नि अजून काय काय. इथून फेरफटका मारत विंडो शॉपिंग करत भटकलो. आधीच महागाई साठी प्रसिद्ध असलेल्या देशातल्या अशा रस्त्यांवरची ही दुकाने फक्त बघायला फार छान वाटतं. घेण्यासारखे अर्थात फारसे काही नसते.
रिमझिम पाउस अजूनही सुरूच होता. त्यामुळे अजून आता कुठे जाणार हा प्रश्न अनुत्तरीत होता. शेवटी गप गुमान घरी परत आलो.
संध्याकाळनंतर थोडे हवामान बदलले म्हणून मग जिथे राहात होतो तिथे म्हणजेच विल्डर्सविलमध्ये चक्कर मारायला बाहेर पडलो. सात दिवसात इथे अनेक वेळा फेरफटका मारला त्यावेळी जाणवलेल्या काही गोष्टी आणि एकूणच या गावाविषयी थोडे लिहावेसे वाटले म्हणून दुसऱ्या दिवशीच्या भटकंतीला पुढील भागात ढकलायचे ठरवले.
साधारण २५०० लोकसंख्येचं हे एक टुमदार गाव म्हणजे स्वित्झर्लंडच्या संस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणता येईल. तशी प्रत्येक गावात, प्रदेशात विविधता आहेच पण काही बाबी सगळीकडे आढळतात. केवळ विल्डर्सविल बद्दल बोलायचे झाले या गावातील एकूण जागेपैकी १९.७ टक्के भाग हा शेतीसाठी वापरला जातो तर ५७.४ टक्के भागात जंगल आहे. उर्वरीत जागेपैकी १० टक्के जागेवर घरं किंवा रस्ते आहेत तर इतरत्र काही भागात नद्या, झरे, तलाव आणि काही भाग हा अनुत्पादित आहे. हे सर्व बघता झाडांची लागवड, शेती या गोष्टींकडे दिसणारा स्विस लोकांचा ओढा दिसून येतो. हे गावही म्युरेन किंवा गिमेलवाल्ड प्रमाणेच सजावट स्पर्धेत हिरीरीने सहभागी होतं. सगळ्याच घरांमध्ये बाग, फुलं, स्विस घंटा आणि झेंडे या गोष्टी होत्याच. गावात जागोजागी पाण्याचे हौद दिसले आणि त्यावरही फुलं होतीच. रोज सकाळी उठून हा गायींचा आवाज, दुरून दिसणारी आयगर, युंगफ़्राउ ही शिखरे, पक्षांचे आवाज, आजूबाजूची कौलारू घरे, फळांनी लगडलेली झाडं, संध्याकाळी मावळतीची सूर्यकिरणे आणि रात्री दुरून दिसणारा शीतल चंद्र हे बघणं आणि अनुभवणं हे शब्दात पकडणं कठीण आहे. इथे भटकताना काढलेले काही फोटो.
बुकिंग करताना एक नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट जाणवली की कुणीही पैसे मागितले नाहीत. पत्ता, पासपोर्ट अशी विशेष काही माहिती देखील नाही. हे एका घरातलंच हॉटेल होतं म्हणूनही असेल कदाचित. पण उम्ब्रेल पास वर जिथे राहिलो तिथेही केवळ फोनवर बुकिंग पक्कं झालं. यापूर्वी कुठेच असे पाहिले नव्हते. आम्ही जेव्हा पोहोचलो, तेव्हाही कुणी पासपोर्ट किंवा इतर कुठलेही ओळखपत्र दाखवा असे काहीच विचारले नाही. त्या आजीला पैसे देण्याविषयी विचारले, तर तिने "ते सगळं नंतर बघू" म्हणून काही किरकोळ रक्कम सुद्धा घेतली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारले तर म्हणाली, "तुम्ही जायच्या आधी ते काम करू, त्यात काय एवढे". स्विस लोकांबद्दल जे काही ऐकले होते त्यावरून हे आश्चर्यच वाटत होते.
आम्ही राहिलो त्या घराची बाग तर फारच सुंदर होती. अनेक प्रकारची झाडं तर होतीच, पण बागेत अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्य ठेवले होते, काही मातीच्या वस्तू होत्या, काही लाकडी तर काही गवतापासून केलेल्या. दर दोन झाडांमध्ये काही ना काही होतेच. बरं हे सगळं असंच बागेत मोकळं. घराला कुंपण वगैरे काही नाही. बागेत दहा बारा टेबल, काहींवर फळांच्या टोपल्या तर काहींवर कुंड्या, जवळच कचरापेटी. शिवाय एकंदरीत असे वाटले की जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यातूनच काहीतरी नवीन करायचे असा कल आहे.खालच्या फोटोत एका ठिकाणी जुन्या बुटातून दोन उंदीर डोकावताहेत तर जुनी सायकल फुलांच्या सजावटीला वापरली आहे. या सगळ्याची साफसफाई ठेवणे हे केवढे मोठे काम असेल याचा तर विचार करूनच मला थकायला झाले. आणि हे सगळे आत्ता उन्हाळ्यात एवढे आहे तर नाताळ साठी काय काय केले जाईल याचा विचारच नको. या घराची एक झलक.
इथे जवळच फिरताना एक खुले संग्रहालय दिसले. घरच खरं तर. तिथे आत जाउन पाहिले तर काही खास जुन्या वस्तू दिसल्या आणि त्या गावाबद्दल थोडीफार माहिती देणारे फलक होते. पूर्वीचे गाव कसे होते, काळानुरूप काही गोष्टी कशा बदलल्या, शेती आणि दुध दुभते हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता, त्यात तंत्रज्ञानाने कशी भर पडली हे दर्शविणारी काही चित्रे होती. आपला जसा बैलपोळा तसा हा गायींचा सण साजरा होतो याचा एक देखावा केला होता.
जुन्या काळी वापरण्यात येणारी भांडी ठेवली होती. ही आजही पारंपारिक भांडी म्हणून खास सणांच्या वेळी वापरली जातात असे एका दुकानातल्या आजीकडून कळले.
जर्मन ही प्रमुख भाषा आहे परंतु सुपर मार्केट्स किंवा इतरत्र कुठेही, अगदी लहान गाव असूनही लोक सहजपणे इंग्रजी बोलत होते. सगळी माहिती इंग्रजी मध्ये उपलब्ध होती. शिवाय इटालियन भाषेचा आणि फ्रान्सच्या सीमेजवळ फ्रेंचचा प्रभावही आहे असे दिसले. स्वच्छतेच्या बाबतीत उर्वरित पश्चिम युरोपीयनांपेक्षादेखील स्विस लोक हे अधिक काटेकोर आहेत असे वाचले होते आणि ते सगळीकडे जाणवले.
इथेच सुपर मार्केट मध्ये गेलो असता एक मलेशियन माणूस भेटला. तो मॅरेथॉनसाठीआला होता आणि सोबत त्याची आई होती. तुम्ही कुठले, इथे कुठे राहता, काय करता अशा जुजबी गप्पा त्याने सुरु केल्या. कुणीतरी आपल्या अगदी जवळचे भेटल्या प्रमाणे ते दोघेही आमच्याशी पुढे कितीतरी वेळ गप्पा मारत होते. परतीचा मार्ग एकच होता म्हणून सोबतच निघालो. त्यांचे हॉटेल आले तेव्हा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असे म्हणत त्या दोघांनीही अगदी प्रेमाने आमचे हात हातात घेतले आणि आम्हाला बाय केले. त्यांची माया ओसंडून वाहात होती आणि आम्ही भारावून गेलो होतो. पावसाने दिवसाच्या सुरुवातीला थोडाफार त्रागा झाला असूनही दिवस छान गेला होता.
आरं नदी आणि जवळपासचे काही धबधबे यांची सफर पुढील भागात...
क्रमशः