तिसरा भाग लिहायला बराच वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व! पण त्याचे झाले असे.. की मला काही केल्या त्या पहिल्या ड्राईव्हिंग टेस्टनंतर काय झाले ते आठवत नाहीये. म्हणजे त्यानंतर अजुन दोनदा ड्रायव्हिंग टेस्ट झाली. आणि त्या दोन्हीत मी फेल झाले. कशा हे आता आठवत नाही. परीणामी मला एका लेखी परीक्षेवरचे तिनही चान्सेस गमावल्यामुळे परत एकदा लेखी परीक्षा द्यायची वेळ आली. केव्हढी ती नामुष्की!! पहिली लेखी परीक्षा इतकी सहज व लगेच पास झाल्याने आलेला कॉन्फीडन्स, दर बिहाईंड द व्हील परीक्षेमुळे कमी कमी होत चालला होता. पण ते सारं विसरून नव्याने परीक्षा देणे गरजेचे होते. कारण मी राहात होते त्या कॅमरिओ गावात काही विशेष पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही, खुद्द गावात सगळी दुकानं होती असंही नाही. त्यामुळे कॉस्को, इंडीयन ग्रोसरी ह्या गोष्टी विकेंडलाच, नवरा असतानाच कराव्या लागाय्च्या. नवर्याला काही शॉपिंगची विशेष आवड नाही त्यामुळे मॉलमध्ये जाणं, निरूद्देश भटकणं हे त्याला बोर व्हायचे आणि मी मिस करायचे. आमची कॅमरिओची लायब्ररी अफाट सुंदर होती, पण आम्ही राहात होतो तिथून पार दुसर्या टोकाला. त्यामुळे तिथेही मला जाता यायचे नाही. वर लिहीले तसे पब्लिक ट्रान्स्पोर्ट फार नव्हते. असलेच तरी मी प्रचंड घाबरट पोरगी असल्याने मी कधीच तो ऑप्शन ट्राय करून पाहिला नाही. ह्या सगळ्यामुळे गाडी चालवण्याची निकड प्रचंड होती पण तेच काम होत नसल्याने कंटाळा व निराशा मात्र वाढत चालली होती. तरीही, ते सर्व विचार मागे टाकून लेखी परीक्षा परत दिली व परत एकदा गाडी चालवण्याची प्रॅक्टीस करू लागले.
आता थोडं डीएमव्ही बद्दल लिहीले पाहिजे. अमेरिकेत आल्यापासून सगळीकडे अगदी एफिशिअंटली कामं होताना दिसत होती. सगळीकडेच एफिशियंसी! मात्र डीएमव्हीत पाऊल टाकल्याबरोबर लक्षात आले हेच ते सरकारी काम जे मी मिस करत होते इतके दिवस! जोक्स अपार्ट, आता मला व्यवस्थित कळले आहे की डीएम्व्हीत कामांना का वेळ लागतो किंवा ती लोकं इतकी का खडूस असतात! मी इतक्यांदा वार्या केल्या आहेत तिथे, एक गोष्ट नक्की की हॅट्स ऑफ टू देम! परंतू हे झाले आताचे विचार. तेव्हा त्याकाळात डीएमव्ही माझ्यासाठी शत्रूपक्षातच असायचा. तिथल्या त्या भल्या थोरल्या रांगा, ती सगळी प्रोसिजर, खडूस कर्मचारी, ती पेटंट स्पीकरमधून ऐकू येणारी अनाउन्समेंट "नाऊ सर्व्हींग जी४२०८ अॅट विंडो नंबर १३" वगैरे... फार डिप्रेसिंग होते ते तेव्हा. मी माझ्या माझ्या अडचणींमध्येच असल्याने मला ते डिप्रेसिंग वाटायचे पण आता जेव्हा डीएमव्हीत जावं लागते तेव्हा एक म्हणजे थँक्स टू स्मार्टफोन्स आणि व्हॉट्सॅप, आणि दुसरं म्हणजे लोकांचे निरीक्षण करणे किंवा आजूबाजूच्या लोकांबरोबर कसं डीएमव्ही भिक्कार वगैरे चर्चा करणे हे आता जमते. तेव्हा काही आयफोन नव्हता ना आजूबाजूच्या लोकांबरोबर स्मॉल टॉक करता यायचा.
एनीवे.. तर ह्या डीएम्व्हीत अपॉईंटमेंट मिळणं ही फार अवघड गोष्ट असते. निदान तेव्हा तरी होती. पूर्वी घेतलेल्या थाउजंड ओक्समध्ये अपॉ लगेचची मिळेना मग विनेटका नावाच्या लांबच्या गावातली घेतली. तिथे मी बरी चालवत होते कार. एका ठिकाणी डावीकडे वळायच्या लेन मध्ये येऊन थांबलो होतो. लाल गोल होता. आणि मी गाडी पुढे घेऊ लागले! :surprise: इन्स्ट्रक्टर बाईचा चेहरा असाच झाला. काय करतीयेस तू! रेड आहे! म्हटले हो!! पण नो टर्न ऑन रेड लिहीले नाहीये! सो मी गेले पाहिजे. मी आजच सकाळी वाचून आले आहे! :thinking: त्या बाईने घाबरून हँडब्रेक लावला.तिथल्या तिथे क्रिटीकल मिस्टेकवर गोल काढला. मला आता पेरिफिरल व्हिजन मधून देखील क्रिटिकल एरिया पाठ झाला होता. आमची वरात परत डीएमव्हीकडे. नापास, नवरा चिंताग्रस्त, हाताची घडी वगैरे.
झाले असे होते. नो टर्न ऑन रेड लिहीले असेल तर लाल दिवा लागला असताना देखील वळता येते हे बरोबर होते. पण एक बारीकसा तपशील मी विसरत होते, तो म्हणजे हे सर्व उजव्या वळणासाठीच अॅप्लिकेबल असते. डाव्याला असे वळणे म्हणजे अक्षम्य गुन्हा! त्या बाईच्या चेहर्यावरच्या भितीचा अर्थ मला नवर्याबरोबर डिस्कस करताना लागला! की आपण काय दिव्य मुद्द्यावरून पार डीएमव्हीच्या बाईशी भांडून आलो! :uhoh: :hypno:
नंतर अजुन दोन वेळा (अर्थातच) मी टेस्टला वेगवेगळ्या ठिकाणी गेले व ह्यावेळेस मात्र मनात घोकले होते की अजिबात क्रिटिकल मिस्टेक्स करायच्या नाहीत! काय आश्चर्य! नाहीच केल्या! परंतू बारक्या बारक्या १५ एक चुका केल्या उदा: स्पीड खूप हळू असणे, स्टॉपला व्यवस्थित न थांबणे, चौकात सगळीकडे न बघणे अन् काय काय! परीणाम -> नापास!
हा बघा पेपर. ह्यात प्रत्येक वळणावर, स्टॉपवर, अजुन काय काय असे मार्क्स ठरवलेले असतात.
हे असं सारखं व्हायला लागल्यावर मी शेवटी विचार केला की असं का होत आहे बुवा? इतके पण आपण लुझर नाही आहोत! एक ड्रायव्हिंग टेस्ट देता येऊ नये?? काय चुकतंय नक्की? मग बर्याच विचाराने असं लक्षात आले की कार! ही कार चुकीची आहे. मॅन्युअल गिअर्स असल्याने अर्धं लक्ष तिकडेच असायचे माझे. मग रस्त्यावरच्या इंटरसेक्शनला चारीबाजूने बघा, ब्लाईंड स्पॉट बघा हे सर्व नाट्यमय आविर्भाव करणं माझ्याच्याचे कमी होत होते. (हो! तुम्ही चौफेर लक्ष ठेऊन असलात तरी ते खूप ऑब्व्हिअस व्हायला हवे. मान १५ वेळा सगळीकडे वळायला हवी! ) मग नवर्याशी बोलले. म्हटलं अरे बाबा, आपण एखादी सेकंड हँड पण ऑटोमॅटीक कार बघूया का? त्याला अजिबातच पटले नाही! की हे काय कारण असू शकते का? मग तो विषय मागे पडला.
मीनव्हाईल आम्हाला गुड न्यूज मिळाली! निळोबा पोटात आल्यापासून मी ह्या सगळ्या स्ट्रेसफुल विचारांना लाथच मारली. आणि टोटली प्रेग्नन्सी एन्जॉय केली! गाडीचा विचार पूर्णपणे मागे टाकला तरी डोक्यात आता बाळ येणार म्हणजे गाडीची गरज वाढत चालली आहे हे कळत होते. शेवटी नंतर बघू म्हणून सध्यातरी विषय बंद केला.
तोवर मी दिल्या होत्या दोन लेखी परीक्षा व ६! बिहाईंड द व्हील ड्राईव्हींग टेस्ट्स!!
हे आकडे भयंकर होते खरे. पण मी जॉब करत होते तेथील एक काका त्यांनी ९ वेळा टेस्ट दिल्याचे व दुसरा एक मुलगा ६-७ वेळा टेस्ट दिल्याचे सांगायचा. त्यामुळे हा प्रिटी मच नॉर्म आहे असं समजून मी मनाची समजूत काढली आणि सध्यातरी हा विषय बंद असं ठरवून टाकले..