वृक्षवल्ली आम्हा ....

वाईज आउल यांचा लेख वाचून मला माझ्या या सोयऱ्यांची आठवण आली...


खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम  वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ?  उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत. तुकारामांची तर ती सोयरीच. खरंच आपलं बोलणं झाडांना समजतं का ?

या बाबतीत मला आलेले दोन विलक्षण अनुभव. घडले तसेच रेखाटले आहेत. त्यांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला नाही. आणखी कुणाला असे अनुभव आले आहेत का हे विचारायचं पण धाडस होत नाही, इतके अविश्वसनीय.

झाडांचं मला लहानपणापासून वेड. नवीन घर बांधलं तेव्हा बागेसाठी हट्टाने चांगली हजार स्क़े. फूट जागा सोडली. फुटाच्या भावात घेतलेल्या अडीच हजार स्क़े. फूट जागेतली इतकी जागा रिकामी सोडलेली पाहून कितीक जणांनी वेड्यात काढले मला. हौसेने बाग केली.  बागेत एक फणसाचे झाड लावले आहे. खरं तर आंबा लावायचा होता. पण आंबे लागले की घरावर दगड यायचे अन  आंबे दुसऱ्याच कोणाच्या पोटी पडायचे ! मग आंब्याचं कोकणी भावंड म्हणजे फणस लावावा असे ठरवले. फणस चोरीला जाण्याची भीती कमी. शिवाय आंब्याइतकाच फणस माझ्या आवडीचा. म्हणून लावला.

तर तो कलमी फणस. नर्सरीतून आणला तेव्हा नर्सरीवाल्यानं मुक्त कंठानं त्याचे गोडवे गायले होते. तसं, प्रत्येक माल-खपाऊ दुकानदार गातोच आपल्या मालाचे गोडवे म्हणून मी काही फारसं मनावर घेतलं नव्हतं. घ्यायचाच होता फणस, घेतलं रोप.

      तिसऱ्याच वर्षी त्याला दोन फळं धरली. आम्ही कौतुकानं त्याला पाणी-खत-बित सगळी शिस्त केली. पाडाला आल्यावर (ते तरी कुठं समजत होतं ? एकाला विचारलं अन ) काढला. आठ दहा दिवसात घरात वास घणघण  घुमू लागला. कापला. अहाहा ! त्यातून सोनचाफी रंगाचे अन अमृततुल्य चवीचे  मोठाले सुंदर गरे निघाले. एक एक गरा एका हाताच्या ओंजळीत मावेल इतका मोठा. ज्यांना ज्यांना दिले ते सर्वजण पुढच्या वर्षी नंबर बुक करून बसले होते फणसासाठी. 

      दुसऱ्या वर्षीही दोन फणस लागले. पण तिसऱ्या वर्षी जणू दृष्ट लागावी तसे झाले. बारीक बारीक फळं धरत अन गळून जात. मोठीच होईनात. खताच्या दुकानात चौकशी केली. त्यांनी एक कसलं तरी खत दिलं ते घातलं. काही उपयोग नाही. त्यावर्षी फणस मिळाला नाही. सलग तीन वर्षे अशीच गेली. मी कुठून कुठून खतं, औषधं आणून घातली. कुणीतरी सांगितलं म्हणून अगदी डाव्या पायाचं चप्पलही त्याला बांधून पाहिलं. पण फणस रुसलेलाच.

 

गेल्या वर्षी डिसेंबरचा महिना. फणसाला बारीक फळं येऊ लागलेली. चार दिवसांनी गळून जात. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालत होते. काहीतरी मनात दाटून आलं. फणसाजवळ गेले. त्याच्या बुंध्यावर एक हात ठेवून तकाकीदार पानांवरून दुसरा हात फिरवताना काहीबाही मनातून उमलून येऊ लागलं...‘अरे छोट्या, तुला काय झालंय बरं ? कुठं दुखतंय ? किती गोड फळं होती तुझी ? का रे कोमेजलाहेस ?फळेनासा का झालाहेस ? काय करू तुझ्यासाठी समजत नाही. औषध माहिती नाही तुझ्या आजाराचं. हे पाणी घालते आहे तेच औषध समज. जगन्नियंत्याच्या कृपेने पुन्हा लाग फळा-फुलायला....’

बादलीतलं पाणी नकळत ओंजळीत  घेतलं.. फणसाच्या बुंध्यावर शिंपडलं.  मग बादली मुळाशी रिकामी केली.

यानंतर सलग आठ दिवस माझा हा कार्यक्रम चालला होता. फणसाजवळ जायचं पाच दहा मिनिटे टेकायचं. त्याच्या पानांच्या पिसाऱ्याकडे पाहत मनात त्याच्याशी बोलत रहायचं.

महिना गेला अन आश्चर्य घडलं. बुंध्यावर  छोट्या पपईएवढी दोन फळे जीव धरून डोकावताना दिसू  लागली. ते हिरवे कौतुक माझ्या डोळ्यात मावेना..

 

दिसामाशी फणसाची फळं मोठी होत गेली. अन त्या वर्षी पुन्हा एकदा गऱ्यांची गोडी आम्हाला चाखायला मिळाली.


 

कुणाला सांगितला नव्हता हा प्रसंग. मनातच ठेवला एका कोपऱ्यात ढकलून. पण फणसाजवळ  गेले, की मनाच्या तळातून वर येतो अजुनी.

असाच आणखी एक प्रसंग.

बागेत ओळीने सिंगापुरी नारळाची तीन झाडे लावली आहेत. एकाच वेळी लावलेली. पण त्यातले शेवटचे झाड अगोदर फळले. तांबूस केशरी बाळसेदार नारळांनी झाड लगडले. बाकीची दोन मात्र लवकर वाढेनात.

 तांबूस केशरी बाळसेदार नारळांनी झाड लगडले. हे नारळ शहाळ्याचे. त्यांचे खोबरे होत नाही. फळ आलेल्या झाडाची शहाळी माझ्या कितीतरी परिचितांनी रुग्णाइत असताना चाखली आहेत. नातेवाईकात, परिचितांत कुणी आजारी पडलं, की आमच्या घरी निरोप येई. ‘शहाळी पाठवा’.

धाकटी दोन झाडे काही फळ धरत नव्हती. मी फणसाची युक्ती वापरायचं ठरवलं.

एक दिवस आड झाडांना पाणी द्यावं लागायचं. मी तिघा नारळांना मनात थोरल्या भावांप्रमाणे नावं ठेवली. फळ आलेला थोरला, त्याच्या शेजारचा थोडा कमी वाढलेला मधला अन सर्वात लहान धाकटा. मग मी त्यांच्याशी पाणी घालता घालता मजेमजेत मनात बोलत असे.

‘थोरल्या तुझी  फळं सुरेख आहेत हो. किती रुग्णांना शक्ती दिली आहे त्यांनी.’

‘मधल्या, तूही थोरल्यासारखाच हो. भरपूर फळं लागणार आहेत तुला..’

‘धाकट्या, भराभर मोठा हो. बघ थोरला अन मधला कसे झालेत ते. त्यांचाच भाऊ ना तू ?’

काही दिवसातच ‘मधला’ फळता झाला. धाकटाही आता जोमानं वाढू लागला.

गेल्या वर्षी बागेच्या कोपऱ्यात बांधकाम काढलं. पुष्कळ प्रयत्न करूनही ‘थोरल्या’ ची जागा बांधकामात न घेणे टाळता येईना. ८-१० दिवस निर्णयात घालवल्यावर अखेर नाईलाजानं मी नारळाचं झाड तोडायला परवानगी दिली.

योगायोग म्हणजे त्यानंतर १५-२० दिवस गवंडी आलाच नाही. दुसरं काम धरलं असेल त्यानं. त्याला फोन करकरून आम्ही वैतागलो. अखेर नाद सोडला. आता दुसरा गवंडी शोधायला सुरु केले. पण लगेचच दुसरा  कुणी मिळेना. मिळालं तरी अर्धं सोडलेलं काम करायला कुणी तयार होईना.

महिना असाच गेला. एक दिवस मी काही कामानिमित्त कराडला  गेलेले. यायला संध्याकाळ झाली. दिवसभर तंगडतोड झालेली. चालत्या बसच्या खिडकीतून  थंड वाऱ्याची झुळूक आली अन कधी डोळा लागला समजलं नाही. गाडीतली झोप ती. झोप कसली, डुलकीच. अर्धवट जाग, अर्धवट गुंगी.

 अचानक काही हास भास नसताना एकदम मिटल्या डोळ्यांसमोर नारळाचं  झाड  उभं राहिलं.  फांद्या झंझावातात सापडल्यासारख्या खालीवर हलत  होत्या. खोड गदागदा हलत होते. एकदम हाक आल्यासारखं वाटलं  ‘वाचव...धाव...’ . एका तीव्र शोकाच्या आवेगाची लाट  मना:पटलावरून घोंगावत गेली.

गुंगी खाडकन उतरली. डोळे उघडले तरी ते चित्र डोळ्यासमोरून हलेना. जणू प्रत्यक्षच समोर घडतंय असं. काही संदर्भ लागेना. मात्र नंतर पुन्हा नाही झोप लागली.

घरी यायला रात्र झाली. पाहिलं तर गवंड्याने येऊन काम सुरु केलेलं. नारळाचं झाड भुईसपाट झालेलं अन त्याजागी अर्धवट बांधकाम उभं राहिलेलं. ‘थोरला’ गेला होता.

लख्खकन संदर्भ जुळला. थोरलाच तो. ‘वाचव’ म्हणून हाक मारत असलेला. पण ती हाक माझ्यापर्यंत कशी पोचली ? अन मला ऐकू कशी आली ? ‘थोरल्या’ला भावना होत्या का ?

काही कल्पना नाही.....

...पण कुणी काही म्हणो. माझी पक्की खात्री आहे,.. ‘ते’ बोलतात माझ्याशी...!

थोरला, मधला आणि धाकटा. यांच्यातला आता फक्त मधलाच तेवढा आहे !  

 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle