हि रेसिपी कोकणातील पारंपरिक आणि सर्वांच्या आवडीची आहे. कोकणात नारळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे सहज बनविणे शक्य होते. जर तुम्ही कोकणात भेट देत असाल तर तेथील पाहुणचारात तुम्हाला नक्कीच ह्या रेसिपीचा आस्वाद घ्यायला मिळेल.
ह्या रेसिपीमध्ये तांदूळ, गुळ आणि नारळाचा वापर केला असल्यामुळे हि रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि लहान मुले सुद्धा नूडल्स समजून आवडीने खातात.
आपण ह्या रेसिपीत नाचणीचे पीठही तांदळाच्या पिठाएवजी वापरू शकतो.
साहित्य:
१५० ग्रॅम तांदूळ, १ ओला नारळ, १५० ग्रॅम गुळ, १ चमचा वेलची पावडर, मीठ चवीनुसार. चकलीचे यंत्र (मध्यम शेवेची जाळी), मोदक उकाडायचे भांडे.
शेवेची कृती:
आदल्या दिवशीच तांदूळ धुवून सुकवायचे आणि घरघंटीवर बारीक दळून आणावे.
प्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळत ठेवावे, त्यात चवीनुसार मीठ टाकावे. पाणी उकळले त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि सतत ठवळावे. आणि मग झाकण ठेवून शिजू घ्यावं.
मग एका परातीत उकडलेले पीठ काढून चांगले नरम मळून घ्यावे.
तोपर्यंत मोदक उकाड्याच्या भांड्यात २ ग्लास पाणी तापत ठेवावे. आता चकलीच्या साच्यात शेवेची जाळी टाकून उकडलेले पीठ गोळा करून भरावे आणि यंत्राच्या साहाय्याने केळींच्या पानावर शेव काढून घ्यावी. शेव उकडायला मंद आचेवर ठेवावी. ७/८ मिनिटात शेव उकडते.
नारळाच्या दुधाची कृती: एक ओला नारळ किसून घ्यावा. त्यात पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून एका सुती कपड्यात टाकून रस काढून घ्यावा. रस काढल्यावर पुन्हा एकदा त्यात पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवावे. आणि पुन्हा रस काढावा. नंतर त्यात बारीक केलेले गुळ टाकून एकजीव करावे. आणि शेवटी त्यात एक चमचा वेलची पावडर टाकावी.
आता तयार शेवया आणि नारळाचे दूध केळीच्या पानावर वाढावे.
शेवया नारळाच्या दुधात भिजवून खावावे.
धन्यवाद
सौ. वनिता विजय वेंगुर्लेकर (माझी आई)
(वेंगुर्लेकर्स रसोई - मराठी ब्लॉग )
https://vengurlekarsrasoi.blogspot.com/