जवळपास 17 वर्षांनी क्रोशाची सुई हातात घेतली परत काही तरी विणायला... तेव्हा विणता विणता लक्षात आलं ... या सुईने बरंच आयुष्य विणलंय आपलं.. शक्य असेल तिथे परिस्थितीची गाठ अगदी बेमालूमपणे लपवलीय!
दीड हाताने शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून बाबा आम्हा सगळ्यांना शिकवू पहात होते. लहानपणी नेहमी बाबा म्हणायचे... देवाने दोन दोन हात दिलेत ते पुरेपूर वापरा.. तेव्हा मी म्हणायचे, देव सगळ्यांना दोन हातच देतो... पण मला नाहीयेत... खरं होतं त्यांचं....तेव्हापासून शक्य तेवढी मदत करून आपल्या बाबांच्या दीड हाताला हातभार लावायचं काम सगळी भावंडं आपापल्या परीने करतच होतो. सातवीत मिळालेली स्कॉलरशिप बारावीपर्यंत आधार देत होती. त्यात कॉलेजचा नव्वद रुपये पास आणि दहा रुपये पॉकेट मनी एवढं भागत होतं. पण तेवढ्यात कॉलेजचा खर्च भागत नव्हता. चित्पावन संघातून बाबा परतबोलीवर पैसे घेत. तेव्हा इंदिरा विकास पत्र पाच वर्षात दुप्पट होई. संघातून 500 मिळाले की बाबा 250 चं इंदिरा विकास पत्र करत.. म्हणजे पाच वर्षात दुप्पट होऊन मुद्दल परत करता यायची आणि अडीचशे वापरायला मिळायचे.
याच दरम्यान आमच्या समोरच यमुना आजी यायची पुण्यातून.. थोडे दिवस रहायची.. ती उत्तम विणकाम करायची.. आणि आवडीने शिकवायची. तिच्याकडच्या उरलेल्या तुकड्यात विणकामाचा श्रीगणेशा केला आणि मग यातून अर्थार्जन सुरू झालं. अनेक प्रकारची तोरणं, रुमाल यांनी कितीतरी जणींची रुखवतं सजली..आमची शिक्षणाची गाडीही चालू राहिली. यातून पुढे गोल ताटलीवर केलेली स्ट्रॉ ची झुंबर, नळ्यांची झुंबर असे अनेक प्रकार शिकत गेले..मी आणि बहिणी मिळून ते करू लागलो. गावातील जवळपास प्रत्येकाच्या घरी आमची की कलाकुसर विराजमान झाली. रत्नागिरीत फक्त जाड लोकर मिळत असल्याने स्वेटर करता येत नव्हते. पण यमुनाआजी आम्हाला पुण्यातून लोकर आणून द्यायची. त्यातून स्वेटर विणायला सुरुवात झाली. घरातल्या आमसुलं, कुळीथपीठ, आंबा पोळी, फणस पोळी या जोडीने या लोकरीच्या विणीने आत्मविश्वास नक्कीच दिला.. फार मोठा नाही तरी ...थोडा खर्चाचा भार उचलला.. त्यामुळे शिक्षणासोबत आपण पुढच्या आयुष्यात काहीतरी नक्की करू शकू हा आत्मविश्वास दिला.. सोबतीला बाबांचा दीड हाताचा आणि आईच्या गृह उद्योगाचा भक्कम आधार होताच!
काही विणी मनात किती घट्ट बसतात ना..... विणकामा सारख्या ....कधीही आठवल्या तरी....आपल्या सुंदर रुपात अडकवून ठेवतात... आणि सुंदर भूतकाळातही!