अळूची चिंचगुळातली मसाला देठी
तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती!
साहित्यः
अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर.
कृती:
अळूची पाने आपण अळूवडीसाठी वापरतो. पण इथे नुसती देठी वापरायची आहे. अळूची देठी सोलून घ्यावी. छोटे गोल तुकडे करून घ्यावे. तुकड्यामध्ये थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे. वाफवताना एक काळजी घ्या, तुकडे जास्त शिजू देऊ नका. शिजलेले तुकडे चाळणीवर काढून त्यातले पाणी काढून टाका. पाणी काढल्याने देठीला खाज असेल तर निघून जाईल. गॅसवर कढई तापत ठेवा. तेलाची हिंग, मोहोरी, जीरे, हळद घालून फोडणी करा.गॅस बारीक करून फोडणीत लाल तिखट घाला. आता शिजलेली देठी घाला. तुम्हाला पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला. दाण्याचे कूट, खोबरे, गोडामसाला घाला. चिंचेचा कोळ आणि गूळ घाला, चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. गरजेनुसार तिखट, मीठ गूळ आणि चिंच याचे प्रमाण कमी जास्त करा. ही भाजी सणसणीत चांगली लागते.
कोथिंबीरीने सजवून वाढा.