माझी सध्याची मदतनीस पूर्वी इस्राईल मधे होती. मागच्या आठवड्यात तिच्याशी गप्पा मारताना पिटा, फलाफल, हमस वगैरे विषय निघाले. तिला पण खूप आठवण येत होती खाण्याची, आणि युरप प्रमाणे तोक्यो मधे हे पदार्थ सगळीकडे मिळत पण नाहीत चांगले. मी घरी करते म्हणल्यावर मला म्हणली करूयात का आपण, मी पण मदत करते. मग लगेचच घाट घातला. सगळ्या कृत्या आंतरजालावरच्या मिक्स आहेत. कुणाचे हे तर कुणाचे चे असे करून माझी ट्राईड आणि टेस्टेड कृती बनली आहे.
पिटा
चांगला ताजा पिटा ब्रेड मिळत असेल जवळपास तर अजिबात हे करू नका. हे आम्हाला मिळत नाहीत म्हणून केलेले/करावे लागणारे उद्योग आहेत.
साहित्य:
२.५ मेजरिंग कप कणिक/मैदा/ऑल पर्पज फ्लार
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टीस्पून साखर
१ टीस्पून मीठ
३ टीस्पून कोमट पाणी
१ पॅकेट (५ ते ६ ग्रॅम)इन्स्टंट यीस्ट (ताजे, म्हणजे एक्सपायरी डेट न उलटलेले आणि न फोडलेले पॅकेट)
अजून थोडे ऑलिव्ह ऑईल.
कृती
१. अगदी कोमट पाण्यात साखर विरघळवून घ्यायची. त्यातच यीस्टचे पूर्ण पाकीट घालून ढवळून ५-१० मिनिटे ठेवून द्यायचे.
यीस्ट ताजे असले तर छान फुलून येते. फुलून/फसफसून आले नाही तर यीस्टमधले जीव मेले आहेत समजून परत सुपरमार्केट कडे जावे.
२. मैदा/कणीक या मधे १ टेस्पून ऑऑ आणि मीठ घालून नीट ढवळून घेऊन त्यात वरील यीस्ट चे मिश्रण सगळे घालावे. नीट हलवून, लागेल तसे पाणी घालून पीठ कणकेपेक्षा थोडे सैल मळून घ्यावे.छान तुकतुकीत मळून, हाताला चिकटेनासे झाले की ऑऑ लावलेल्या काचेच्या मोठ्या बोल मधे ठेवावे. बोल ला ऑऑ लावल्याने चिकटत नाही. पीठाला पण वरून पण नीट ऑऑ लावून, बोल क्लिंग रॅपने झाकून १ तास उबदार जागेत ठेवून द्यावा. (शूम्पीच्या इडलीप्रमाणे थंडीत हे प्रकार नव्याने करायला जाऊ नये)
३. १ तासाने पीठ मस्त फुगून येईल, फर्मेंट झाल्याने. त्याला मनसोक्त ठोसे मारून, मूळ पदाला आणावे. भरपूर मळून घेऊन त्या पीठाचे ८ समान भाग करून नंतर गोळे करून, मधे थोडे अंतर ठेवून, ओल्या कापडा खाली झाकून परत १ तास ठेवून द्यावेत.
४. तासाभरात ते गोळे परत फुलून येतात. एक एक गोळा घेऊन, पोळपाटावर सुमारे ७-८ इंच व्यासाची पोळी लाटून घ्यावी. पीठाला इलास्टीसिटी खूप असल्याने, पोळी परत परत आकुंचन पावते पण आपण हार मानू नये. लाटायला शक्यतो पीठ फार वापरू नये.लाटलेली पोळी तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्यावी. मस्त फुगते. फुगले नाही तर आत पॉकेट तयार होत नाही. तव्यावर भाजायचे नसेल तर, अवन २००डिग्री से. ला प्रीहिट करून घ्यावा आणि अवन पेपर पसरून त्यावर तयार पोळी ठेवून ५-६ मिनिटे भाजून घ्यावे. ते पण फुगतात आणि छान खरपूस होतात.
५. सगळे तयार पिटा एका स्वच्छ किचन टॉवेल मधे ठेवून द्यावेत. खाताना १-१ पिटा, बरोबर व्यासावर अर्था कापून त्याचे २ भाग करावेत आणि त्यात तयार झालेल्या पॉकेट मधे फलाफल किंवा शावर्मा वगैरे भरून खावे. पिटा उरलेच तर त्याच्या त्रिकोणी पट्ट्या कापून अवन मधे खरपूस भाजून पिटा चिप्स बनतात. आवडत्या डिप बरोबर खाऊ शकतो.
फलाफल
साहित्यः
१ मेजरिंग कप छोले/काबुली चणे रात्रभर किंवा ८ तास भिजवून
१ छोटा कांदा बारीक चिरून
३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून
१ मूठभर पार्स्ले (नसली तरी चालते)
१ मूठभर कोथिंबीर
२ टीस्पून जीरे पूड
२ टीस्पून धने पूड
१ टीस्पून मिरपूड
१ टीस्पून स्मोक्ड पापरिका/ कायेन पेपर किंवा नेहेमीचे लाल तिखट
१ टेबलस्पून मैदा (मिश्रण मिळून यायला किंवा अंदाजाने ब्रेड चा चुरा)
१ टेबलस्पून लिंबाचा रस
कृती
१) सगळे पदार्थ फूड प्रोसेसरच्या भांड्यात घालून ग्राईंड करायचे. अगदी पेस्ट नाही आणि अगदी खडबडीत नाही असे वाटून घ्यायचे. बोल मधे काढून नीट मिक्स करून चव बघून अॅडजस्ट करायची आणि १/२ तास फ्रीज मधे ठेवून द्यायचे.
२) १/२ तासाने फ्रीज मधून काढून छान एक सारखे बॉल्स करून भर तेलात अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. मस्त क्रिस्पी झाले पाहिजेत.
३) शॅलो फ्राय करू शकता पण ते जास्तच तेलकट लागतात असे माझे मत. बेक करून पाहिले नाहित.
सॅलड
लेट्यूस, कोबी, गाजर, काकडी, कोथिंबीर आणि पुदिना आवडत असल्यास कांदा सगळे लांब-लांब चिरून किंवा किसून घ्यायचे. नीट मिक्स करून बोल मधे ठेवायचे.
सॉस/ड्रेसिंग/डिप
१) पेपर टॉवेल वर निथळत ठेवून दह्यातले पाणी काढून घ्यायचे अथवा ग्रीक योगर्ट वापरायचे. दही नीट फेटून त्यात चवीप्रमाणे मीठ,मीरपूड, लिंबाचा रस, लिंबाची किसलेली सार, किसलेला लसूण आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा. हे झाले ड्रेसिंग
असेंब्ली
१/२ पिटाच्या पॉकेट मधे १ किंवा २ फलाफल जरासे मोडून घालायचे, आवडीप्रमाणे सॅलड आणि डिप वरून घालून खायचे.
१) करायला वाटते तेवढी खटपट नाही पण हाताशी वेळ पाहिजे आणि तळण करायचे आणि खायचे धाडस पाहिजे.
२) कॅनमधले छोले वापरू नका, फलाफल क्रिस्पी होत नाहित.
३) पिटा न करता, हाय प्रोटीन स्नॅक्स म्हणून नुसते फलाफल खाऊ शकता.