शिबिराहून परत आलो. हे चौथं शिबिर, व्यवस्थेमधलं तिसरं. दर शिबिर काहीतरी नवीन शिकवतं, नवनवीन अनुभव देतं.वेगवेगळ्या स्तरातील संपूर्ण भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही आपला comfort zone सोडून आलेली लोकं असतात. काही नेटवर माहिती काढून आलेली असतात ते अगदीच अनभिज्ञ असतात तर काही संपर्कातून आलेली असतात त्यांना जरा तरी कल्पना असते शिबिराबद्दलची.
माझ्याकडे इतरही खाती असतात पण 'शिबिरमित्र' हे नक्कीच असतं :) डोंबिवलीच्या बावीसजणी होत्या. त्यात ज्योती पाटकर (सामाजिक/भाजप कार्यकर्त्या) होत्या त्यांच्या कामाचा आवाका बघून अचंबित झाले. काही डोंबिवलीकरीण मी पिंपळदला असताना तिथलं काम पाहायला आल्या होत्या. ओळखीचे चेहरे दिसल्याचा तो सुखद धक्का होता त्यांच्या व माझ्यासाठी. आनंद दोन्हीकडून व्हावू लागला. नेहमीप्रमाणे शिबिराचे सात दिवस कसे गेले ते कळलेच नाही. घरी गेल्या गेल्या काहींजणींच्या प्रतिक्रियाही आल्या, त्या देतेय.
शिबिराच्या आठवणी ताज्या आहेत तोवर त्या व्यक्त कराव्यात असे वाटले.
ह्या शिबिरा मुळे देशभक्ती ,त्याग ,समर्पणाची भावना मनाला प्रॆरणा देत राहतील. घरातील comfort zone सोडून सर्वाबरोबर सामोपचाराने रहाणे,श्रमदान,प्रार्थना,स्त्तोत्र,भजन,शिबिरगित,घोषणा ह्या सगळ्या मुळे देशभक्तीचि ऊर्जा निर्माण झाली.
Cultural programme ची तयारी,घोषणा तयार करण्यात बुद्धीला चालना मिळाली.
परिसर तर मनाला सुखावणारा होता. बुचाचि सुगंधी फुले, डौलदार लयीत वावरणारे मोर मनाला आनंद देऊन गेले.
निष्काम भावनेने काम करणारे कार्यकर्ते बघून कौतुक वाटले.
Meditation ,योगासने करताना शिबिराचा ऊपयोग होईल.
तुम्हा सर्वाच्या आठवणी मनाला आनंद व उल्हास देत राहतील.
पुन्हा भेटूच.
सुवर्णा देवधर
(मामी)
शेवटच्या दिवशी संगमावर मागे शिला स्मारक
केंद्राचं शिबिर संपवून पाॅंडेचरीला जायला आम्ही दोघं व संध्याताई (जीवनव्रती) अरविंदजी (कार्यकर्ता) पुण्याला जायला सकाळी पाच वाजता निघालो. आमच्या ट्रेन नागरकोविलहून होत्या. त्या दोघांची ट्रेन वेळेत निघाली. आमची दोन तास करता करता अनिश्चीत लेट झाली. शेवटी अकरा वाजता तत्कालमध्ये तिकीट काढून परत कन्याकुमारीला निघालो. आधीची तिकीट नेटवरून कॅन्सल केली. तीन तासापेक्षा ट्रेन लेट झाली तर पैसे कापत नाहीत. परत असताना अतिवृष्टीची कल्पना आली . दहा दिवस प्रसारमाध्यमांशी कट्टी होती त्यामुळे केरळावर काय संकट ओढवलंय ह्याची कल्पनाच नव्हती.
दुसर्या दिवशी निघालो. विल्लुपुरम व तिथून प्यासेंजरने पाॅंडेचरीला पोचलो. इथे श्री अरबिंदो आश्रमाचं स्वाध्याय शिबिर होतं. इथलं शिबिर केंद्रापेक्षा अगदीच वेगळं असतं. दोन प्रवचने व बाकी वेळात पर्यटन. पण मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे मातृमंदिरात ध्यान!
मातृमंदिर: अध्यात्म व विज्ञानाचा संगम
आॅरेविल जिथे फक्त मानवता हाच धर्म असेल अशी वसाहत वसवण्याची संपूर्ण कल्पना माताजी (श्री अरबिंदोच्या सहयोगिनी) ह्यांची! युनेस्कोच्या मदतीने भारतात वसवलेली ही एकमेवद्वितीय वसाहत जिथे वेगळं चार्टर आहे. मातृमंदिर म्हणजे विस्तीर्ण बंजर जमीनीवर फुलवलेलं अक्षरश: नंदनवन! तिथे फक्त अति प्रचीन असं वडाचं झाड होतं. जेव्हा मातृमंदिराचा आराखडा तयार होत होता तेव्हा हे झाड मध्ये येत होतं व त्यामुळे मातृमंदिराला धोका होता पण माताजींनी त्या झाडाला प्रार्थना केली व झाडाने आपली मूळं विरूध्द बाजूने वळवली, असं म्हणतात.
हे ते झाड नाही पण एवढचं मोठं तेही झाड आहे.
आम्ही पांडेचरी गावातल्या सेंटरवर उतरलो होतो. मातृमंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते ,ती करण्यासाठी आॅरेविला गेलो. नोंदणीपूर्वी तिथे एक लघुमाहितीपट दाखवतात. तो पाहून नोंदणी केली. दोन दिवसानंतरची सकाळची वेळ मिळाली. मातृमंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघता येतो पण दुरूनच. नयनरम्य परिसर! आता उत्सुकता लागून राहिली होती ती आतून बघण्याची! सकाळी प्रवचने ऐकून समुद्राकाठी भटकंती व समाधी दर्शन असा दिनक्रम होता.दोघांचीही चेतना एकच असल्याने समाधी एकाच ठिकाणी आहे. रोज दिवसातून तीनदा समाधीवर तिथल्याच बागेतील फुललेल्या वेगवेगळे फुलांचे डेकोरेशन असते. सतत लोक दर्शनासाठी येत असतात व ध्यान करतात. आश्रमाच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम चालतात. उदबत्या, परफ्युम बनवणे, मार्बल प्रिंटींग, भरतकाम इ. महाग असल्यामुळे फारशी खरेदी केली नाही.
आज मातृमंदिरात जायचं होतं. आॅरेविलला पोचल्यावर परत एक लघुपट दाखवला. बसने मातृमंदिराच्या जवळ गेलो. वक्तशीरपणा इतका की घड्याळ लावून घ्यावे. वेळ झाल्यावर आपलं सामान व पादत्राणे जमा केली. आम्हाला एक गोर्रा गाईड मिळाला. त्याने आम्हाला एका डेरेदार कडूलिंबाच्या झाडाखाली दगडाच्या बाकावर बसवले ,माहिती व करा व न करा सांगितल्या व शंकांचे निरसन केलं. एक टप्पा पार केला. मुख्य मंदिराकडे जायला निघालो. तिथली हिरवाई , कडूलिंबाची झाडे,बगीचा , बागडणारी फुलपाखरे व पक्ष्यांचा चिवचिवाट पाहून ही जमीन बंजर होती, विश्वास बसत नव्हता. शांतता/मौन पाळायला सांगितलेलेच होते आणि तिथल्या वातावरणामुळेही सगळेच भारावून गेले होते ,निशब्द झाले होते. मातृमंदिर प्रवेशाची मानसिक तयारी होत होती.
मातृमंदिराच्या खालच्या संगमरवरी कमळाच्या पाकळ्यांवर व मधोमध एक स्फटिक अशी रचना असलेल्या गोलाकार भागात सगळ्यांना उभं करून परत तिथल्या रचनेची अगदी हळू आवाजात माहिती सांगितली. आणखी एक टप्पा पार झाला. मुख्य मातृमंदिर/ध्यान मंदिराच्या बाजूला बारा वेगवेगळ्या व्हर्च्युजच्या रुम्स आहेत तिथे फक्त तीनचार लोकांना बसून ध्यान करता येतं. आम्हा जेनेराॅसिटीच्या रुममधून एका गोलाकार रुममध्ये प्रवेश करतो झालो. अंधूक प्रकाश! तिथल्या पांढर्या शुभ्र बाकड्यांवर पांढरे शुभ्र टर्किश टाॅवेलवर बसून पांढरे शुभ्र मोज घातल्यावरच आत प्रवेश ! आणखी एक टप्पा पार! उत्सुकता शिगेला पोचली. आता आपण गोलाकार चढत्या वक्राकार मार्गाने वर चढत जातो. एकेक टप्पे पार करत जात असतो तसतसे मन शांत , निर्विचार होत जाते. ह्या छोट्याश्या प्रवासात शांततेची सवय होऊ लागते व आवडूही लागते. मंद निळसर प्रकाशात मुख्य गाभार्यात येतो. .स्वच्छ निटनिटकी भारतीय व खुर्च्यांची आसन व्यवस्था, गोलाकार दोन रांगेतली ! मध्यभागी एका काचेच्या पेटीत असलेल्या स्फटिकावर यंत्राद्वारे /संगणकाद्वारे एकवटवलेली सूर्यऊर्जा पडत असते. सगळे साधक आसनस्थ झाले की हळूहळू दिवे मंद होत जातात व आता फक्त स्फटिकाचा प्रकाश ! ध्यान करायला कष्ट करावे लागतच नाही.. सहजानुभव! शब्दातीत अनुभव !
ह्या अद्भूत जगाची सफर संपूच नये वाटत होती.. बाहेर आल्यावर बोलण्याची इच्छाच होत नव्हती. समोरच एक अॅम्फी थिऐटर होतं तिथे सगळ्या पर्यटाकांना बसवून त्याच्याविषयी माहिती सांगितली. तिथे एका कोपर्यात एक कळी होती. जेव्हा हे मातृमंदिर तयार झालं तेव्हा (२८ फेब्रुवारी १९६८) १२४ देशांच्या दूतांनी आपआपल्या मातृभूमीहून आणलेली माती त्या कळीत टाकली होती. रंगमंचाखाली मेकअप रूम आहे. माताजी पर्फेक्शनच्या भोक्त्या होत्या व निसर्गप्रेमी तर होत्याच हे तिथल्या प्रत्येक गोष्टीत ठायीठायी दिसून येतं.
आता आजूबाजूला फिरायला मोकळीक असली तरी जेवायच्या वेळेपर्यंत सेंटरवर परतायचे असल्याने जास्त फिरत बसलो नाही. पण ते वडाचं झाड जवळून बघायचं होतं. अजस्त्र पसरलेलं अजून एक झाड बाहेरही होतं. त्यापैकी कोणतं अजस्त्र आहे सांगता येणं कठीण आहे पण हे झाड म्हणजे दंतकथा नाही, त्याची सत्यता पटते.
मंगळवारी इथे सुटी असते.सकाळची दोन प्रवचने झाली की मोकळा वेळ होता . देवधर्स तरूण आजीआजोबांबरोबर शंभर किमीवर असलेल्या महर्षी रमण आश्रम बघायला गेलो. वाटेत जिंजी लागलं.
देवधर काकाकाकू मागे जिंजीचा किल्ला
मराठा अधिपत्याखाली असलेलं तेच जिंजी ना गुगलून खात्री करून घेतली. फोटोवरच समाधान मानावे लागले. असो! वाटेत एक भव्य मंदिर लागलं पण परतताना पाहायचे ठरवले. छोट्याश्याच ह्या आश्रमात पर्यटक/साधकां/अभ्यासुंसाठी राहण्याची सोय होती. त्याला जोडूनच गुरुकुल व चाळीसेक देशी गाईंची गोशाळा. इथल्या आश्रमातही लोकं येत होती, समाधीसमोर बसून ध्यान करत होती. असंख्य परदेशी पर्यटक पाहून भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे आध्यात्मिकता व योग ह्यात शंका नाही. थोड्यावेळ मंडपात ध्यानस्थ बसायचा प्रयत्न केला.
रमण महर्श्री आश्रम
वाटेतलं ते भव्य, भव्य नव्हे तर ते अजस्त्र शिवमंदिर बघितलं. चार दिशेला चार सारखी प्रवेशद्वार , कुठून आलो कुठून गेलो कळायला मार्ग नाही. बॅटरी रिक्शा घेतली म्हणून बरं नाहीतर पायाचे तुकडेच पडले असते. दगडी कोरीव काम अगदी अप्रतिम!
रात्री रागीडोसा, अप्पम, स्ट्यु, नारळाचे दूध असं बाहेरच टिपीकल चविष्ट सौदेंडियन जेवून सेंटरवर परतलो.
केंद्राच्या शिबिराला आलेली ऑर्कियॉलॉजिस्ट सयन्ती पाँडेचरीचीच. कन्याकुमारीत ठरवल्याप्रमाणे एक दिवस तिच्या घरी गेलो. काही घरांमध्ये गेल्याबरोबर खूप प्रसन्न वाटतं! त्या लिस्टीत सयन्तीचं घर ॲड झालं! तिच्या घरात शिरल्याबरोबर समोर असलेल्या भल्यामोठ्या पुस्तकाच्या कपाटाने स्वागत केले. काफी विथ अखंड गप्पा! सयन्ती तिच्या खजिन्यातील एकेक युनिक पुस्तकं काढून दाखवत होती त्याबद्दल सांगत होती पण जेवायला व खरेदीला जायचे असल्याने फक्त वरवर चाळली. त्यात एक खूप जूनं पाककलेचं पुस्तक होतं, त्यात पाककृत्या तीन भाषेत शिवकालीन मराठी, तामिळ व इंग्रजीत होत्या. त्याच पुस्तकात 'संभाजीवरून सांभार' चा उल्लेख आहे.
वाचायला वेळ नसल्याने काही पानांचे फोटो काढले. टळटळीत उन्हात रिक्शाने ऑथेन्टिक तामीळ थाळी खायला गेलो. साधंसच जुन्या पध्दतीचं शाकाहारी हॉटेल होतं. किंमत बघून आश्चर्यच वाटलं. अन्लिमिटेड सुग्रास जेवणाची थाळी केवळ एकशेदहा रुपयात! खिसा व पोट सुखावले.
पुढच्या ट्रीपमध्ये तंजावरचे सरस्वती महाल दाखवायला सयन्तीच आम्हाला घेऊन जाणार, असे तिच्याकडून आश्वासन घेऊन ह्या गोड मैत्रीणीचा निरोप घेतला.
आज दुसरा गट मातृमंदिरात गेल्या कारणाने प्रवचने दुपारी तीनला होती व उन्हाचा दाह (सयन्तीच्या भाषेत प्लीजंट मोसम) ह्या कारणाने झटपट खरेदी करून वेळेत सेंटरवर पोचले. ह्याही शिबिराचे सात दिवस कसे गेले ते कळलंच नाही पण मनाला चुटपुट लागून राह्यली जिंजीचा किल्ला व महर्षींच्या साधना स्थळाला भेट द्यायचे राहून गेले. ।।पर्यटन करू नये अभ्यासेविणा।।
तर अशी कन्याकुमारी - पाॅंडेचरी डायरी!