अंदमान डायरीज भाग १
अंदमान डायरीज भाग २
डिस्क्लेमरः लेख वर्षभरापुर्वी लिहिलाय. इथे आता आणलाय
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय. या बेटांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपल्याला जालावर मिळेलच , मी मात्र माझ्या नजरेतुन अनुभवलेला आणि भावलेला अंदमान तुम्हाला दाखवणार आहे.
आम्ही शक्यतो टुर कंपनीसोबत फिरणं टाळतो त्यामुळे कसं आपल्याला वाट्टेल तेव्हा वाट्टेल तस फिरता येतं. म्हणून या प्रवासाला लागते ती पुर्वतयारी तशी ६ महिने आधी सुरु झाली होती. डिसेंबर मधे आम्ही आमच्या सुट्ट्यांचा अंदाज घेऊन तिकिटं बुक केली आणि अंदमान बेटांचा अभ्यास सुरु केला. काय करावं, काय करु नये हे वाचलं. आणि आम्ही साधारण कसे आणि किती फिरणार हे ठरवलं.
www.andamans.gov.in आणि अजून एक nic ची साईट आहे त्यावर अभ्यास केला. शिवाय inter island प्रवासाची माहिती घेण्यासाठी www.and.nic.in ही साईट. खूप छान दिलय त्यांनी डिट्टेलवार.( शिवाय मी जेव्हा पोर्ट ब्लेअर मधल्या टुरिजम डिपार्टमेंट मधे गेले होते तेव्हाही तिथल्या कर्मचार्यांनी न कंटाळता सगळी माहिती दिली आणि शंका दूर केल्या होत्या माझ्या.)
आता फक्त शरीर तिथे पोचायचं राहिलं होतं. मन तर कधीचच पोचलं होतं. शेवटी हो ना करता ९ मे उजाडला. आणि सकाळी ७.२० च्या विमानाने आम्ही चेन्नै ला निघालो. पोर्ट ब्लेअर साठी आमचं विमान १०.४० ला होतं. तेवढ्यात जे काही कस काय अन चेपु खेळुन घ्यायचय तेवढं घेतलं. कारण तिकडे फक्त बीएसेनेल , ऐर्टेल अन वोडाफोन हे तीनच सर्विस प्रोवाईडर आहेत. आणि २जी स्पीड बडी मुश्किल से मिलती है अस होटेलवाल्याकडुन कळलं होत ठरलेल्या वेळी आमचं विमान निघालं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय
विमानतळाकडे निघालं. दिडेक तासाने काही पाचूची बेटं दिसु लागली.
विमानतळ जवळ आल्यावर क्यामेरे बंद केले. आमच्या गोव्यासारखाच हासुद्धा डिफेन्स एअर्पोर्ट आहे. सामान घेण्याचे सोपस्कार केल्यावर अंदमानच्या पर्यटन विभागाचा हेल्पडेस्क वर प्रिपेड टॅक्सी , बाईक रेंटल वगैरे ची चौकशी केली आणि विमानतळाबाहेर जाऊन टॅक्सी करुन गेलो. इथेच अंदमानी लोकांच्या नियमप्रियतेचा पहिला अंदाज आला. पठ्ठ्याने प्रिपेड टॅक्सी च्या दरापेक्षा एक रुपया अधिक घेतला नाही. तेवढ्या अंतरासाठी आमच्या गोव्यात ५०० रुपडे सहज घेतले असते इथल्या टॅक्सीवाल्यांनी.
सेल्युलर जेल च मुळ स्वरुप सात आरे असलेल्या स्टार फिश सारखं होतं. त्यातले तीनच आरे उभे आहेत. एका आर्याच्या जागी सरकारी इस्पितळ उभं आहे. मधल्या मनोर्याच्या खांबांवर तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांची नावं आहेत. या इमारतींची रचना अशी होती की एका इमारतीतल्या कैद्यांना समोरचे कैदी दिसू नयेत. फोटोत व्हरांड्यासमोर समोरच्या खिडक्या दिसतायेत. त्या खिडक्यांनाही
उतरती छपरे. आणि खोलीत त्याही उंचावर. म्हणजे फक्त उजेड आणि हवा थोडीफार येणार. काळ्या पाण्याची शिक्षा... आणि या इमारती कैद्यांकडूनच बांधून घेतल्या होत्या.