नागपूरवारीत हमखास आणली जाणारी म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्राबर्फी मिळणार नाही.
साहित्यः
तीन वाट्या कोहाळा, दोन वाट्या खवा, तीन वाट्या साखर, अर्धा टीस्पून ऑरेंज इमलशन( कलर + इसेन्स), दोन वाट्या संत्र्याचा रस, संत्र्याची साल किसून दोन टेबलस्पून, वेलची पावडर.
कृती:
कोहाळा किसून घ्या. संत्र्याची साल किसताना त्याचा पांढरा भाग किसायचा नाही. फक्त वरची केशरी साल किसून घ्या. मला तीन मोठी संत्री लागली. संत्र्याचा रस काढून घ्या. आता सर्व साहित्य मोजून एकत्र करा. खवा,कोहाळ्याचा कीस, संत्राच्या सालीचा कीस, रस, साखर, इमलशन, आणि चिमुटभर वेलची पावडर सर्व कढईत एकत्र करून मंद गॅसवर ठेवा. गोळा होऊ लागला की ताटाला तूप लावून थापा. तुम्हाला वडी, बर्फी जे हवे असेल त्याप्रमाणे कमी जास्त आटवा.
आता तुम्ही म्हणाल संत्रा बर्फीत कोहाळा का, तर मी जी प्रसिद्ध बर्फी खाल्ली त्यात घातलेले घटक बॉक्सवर वाचून मलातरी त्यात कोहाळा असतो असे वाटले. आणि मी प्रयोग केला तर परफेक्ट चव आली. बघा तुम्हीही प्रयोग करून!!