कोकणातील पर्यावरण स्नेही गणपती उत्सव:
कोकणात गणपती उत्सव ही एक ऋणानुबंध जपणारी परंपरा! भातशेती लावून पिकं डौलदार डोलू लागतात आणि मग वेध लागतात गणपतीचे. आधी चार दिवस साफसफाई, घरझाडणी करून घेतली जाते. टेबल फॅनला दोरा बांधून पताकांच्या कागदाच्या सायल्या करायच्या. देवांच्या शेजारी एक लाकडी उभ्या आडव्या पट्ट्यांची मणपी असतेच. ती साफसूफ करायची. त्या मणपी खाली एक टेबल ठेवलं की झालं.
गणपतीची खरी सुरुवात होते ती आवरणा पासून.. हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं'! सकाळी अर्ध शेण आणि अर्धी माती एकत्र करून थोडं मिश्रण घेऊन मस्त बोटांच्या नक्षीचं सारवण हे माझं आवडतं काम. एक तास तरी जायचा माजघर सारवायला पण महिनाभर परत जमीन सारवायला लागायची नाही. सारवण वाळलं की आरास करायला सुरुवात. आरास करण्यासाठी आजूबाजूला मिळणारी कवंडळं आणि कांगणं किंवा कांगण्या वापरलं जायचं. गोल फळासारखं दिसणाऱ्या कवंडळा चे रंग दिवसागणिक बदलत जातात. द्राक्षाच्या घडासारखी कांगणं मणपीला बांधायची. मणपीपासून टेबलपर्यंत सायल्या सोडायच्या. आणखी लागल्याच तर माडाच्या झावळ्या वापरायच्या.
गणपतीच्या मागे वर्षानुवर्षं जपून ठेवलेलं चक्र तांदूळ भरलेल्या ग्लासमध्ये खोचायचं. एक लाईटची माळ बाजूनी लावायची . एवढी सोप्पी आरास! तरीही गणपतीपण आनंदाने रहायचा आणि आणणाऱ्यांचा उत्साह तेवढाच ओसंडून वहायचा!
सगळं करू झालं की आईला विचारायचं.. आज आवरणं कशावर? मग आईने केलेल्या सांज्याच्या पोळीवर ताव मारून शेतात पळायचं..दुर्वा काढायला. कधी कधी पांढऱ्या दुर्वा मिळायच्या. पत्री, दुर्वा काढून झाल्या की हरताळकेची तयारी.. उपास.. फक्त शहाळ्याचे पाणी, फळं, शिकरण यावर कशीबशी दुपार व्हायची . बाबांनी केलेल्या पिठलं भाताचा वास आला की उपास पण बारगळायचा, बाबा ठामपणे सांगायचे जेव तू... मी बघीन तुला चांगला नवरा!
रोज नवीन रांगोळी आणि आम्हा तिघी बहिणींचा वेगळा पाट! गणपतीत वेगवेगळे प्रसाद, उकडीचे मोदक आणि सगळ्यांकडच्या आरत्या! आरतीनंतर काय प्रसाद मिळणार हे आम्ही हळूच बघत असू. आरती नंतर पोहे हवेतच आणि पोह्यांवर काफी..(कॉफ़ी नाही हा!). संध्याकाळी सगळीकडे गणपती बघायला जायचं... एक गणपतीला एकाने पैसे ठेवायचे आणि बाकीच्यांनी नुसता नमस्कार. साखर फुटाणे नि कडक बुंदीचे लाडू हा प्रसाद जमवायला पिशवी न्यायची सोबत! विसर्जनाच्या दिवशी ओलं खोबरं आणि साखर असा नैवेद्य! सगळी फळं फोडी करून एकत्र करायची, तोच प्रसाद. कुठेही थर्माकोल नाही की प्लॅस्टिक नाही... भरमसाट मिठाई नाही तरीही गणपतीचा आनंद कधी कमी झाला नाही.
आरतीच्या लयीत वाजणाऱ्या झान्जा, एखादा तबल्याचा ठेका, उदबत्तीचा मंद सुगंध गणपतीच्या चेहऱ्यावर थोडं जास्तच आनंद आणायचा.. आणि आम्हाला द्यायचा वर्षभराचा उत्साह!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle