गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
साहित्य:
एक वाटी तांदूळ पिठी,
दीड वाटी पाणी,
एक चमचा लोणी,
मीठ.
पारीसाठी:
नेहमी पोळ्याना भिजवतो तशी कणिक
कृती:
पाणी उकळत ठेवा. त्यात चवीला मीठ आणि लोणी घाला. उकळी येऊ द्या.
उकळी आली की तांदूळ पिठी मिसळा. मोदकासारखी उकड काढून घ्या.
थोडी गार झाली की छान मळून घ्या.
तेल, मीठ घालून नेहमीप्रमाणे दीड वाटी कणिक मळून ठेवा.
उकड गार झाली की कणकेच्या गोळीएव्हढीच उकडीचीही गोळी घ्या.
पुरणपोळीसारखी कणकेत भरून घ्या.
तयार उंडा कणकेवर लाटा.
आणि नेहमीच्या पोळीसारखीच भाजा.