२००७ सालातील गोष्ट आहे.
रात्री उशीरा माझ्या मुंबईच्या आत्याचा फोन आला. ही माझी आत्या गेली अनेक वर्ष जाहिराती, मराठी सिनेमे, नाटके, मालिका यात छोट्या भुमिका करते आहे. हे सांगायचे कारण म्हणजे मला आलेला तिचा फोन! झाले काय, ई टीव्ही मराठीवर सुपरवुमन नवी मालिका रियालिटी शो सुरु होणार होता. त्याच्या ऑडीशन दुसऱ्या दिवशी रत्नागिरीत होत्या. आत्याचा आग्रह होता की मी तिथे जावे शाळेत सुद्धा कधी स्टेजवर न गेलेली मी डायरेक्ट टीव्हीवर.... मी आपले हो म्हटले आणि झोपले. परत आत्याचा सुप्रभात फोन खणखणला! तेव्हा मी घरात याबद्दल बोलले. नवरोजी लगेच जा म्हणून मागे लागले. हो..नाही करत मी दहा वाजता नाट्यगृहात पोहोचले. आमच्या घरासमोरच नाट्यगृह असल्याने वेळेत गेले.
मी आपली बऱ्यापैकी फॅन्सी साडी नेसून एका बाजूला खुर्चीत बसून आलेल्या सगळ्यांची मापे काढायचा उदयोग करत होते. हळूहळू बाजूच्या एका बाईशी बोलायला सुरुवात झाली. पूर्ण कोकण विभागासाठी हेच केंद्र होते. साठ तरी बायका होत्या. कोणी डॉक्टर, कोणी वकील, नर्तिका, सगळ्या एकापेक्षा एक हुशार, कोणत्यातरी क्षेत्रात तळपणाऱ्या भरपूर डिग्री असलेल्या... आणि मी तीन ग बरोबर घेऊन गेलेली, गावंढळ , गृहीणी, ग्रॅज्युएट! आत्याचा असा राग आला होता म्हणून सांगू, थोडीतरी कल्पना द्यायला नको? आम्हाला फॉर्म भरायला दिले. त्यात आपली माहीती भरायची होती... बाकीच्या एकमेकीत पुटपुटत होत्या, या गृहीणी काय लिहीणार स्वतःबद्दल? आधीच लटपट करणाऱ्या पायाना हातांची साथ मिळाली. मग म्ह्टले आता आलोय इथवर तर लिहूया..शिवणकाम, विणकाम, बागकाम, घरकाम आणि पाककला! नंबरचे बिल्ले दिले गेले. आता पुढे काय? एकेकाला आत बोलावत होते. कोणीच ओळखीची नसल्याने आणि बोलती बंद झाल्याने आत काय करायचेय याचा अंदाज घेत होते. प्रत्येकाने आत जाऊन एक मिनट बोलायचे आहे.. आता बोंबला!!
काय बोलले ते आठवत नाही, कशीबशी तिथून सुटले आणि पहिल्या दिवसाच्या ऑडीशन झाल्या. सर्वांचे मोबाईल नंबर घेतले, मी आपला नवऱ्याचा नंबर दिला (माझा नव्हताच!) आणि एकदाची घरी आले. कोणीही काहीही विचारले नाही आणि मी सांगितले नाही! आठ वाजता रात्री नवऱ्याचा घरी फोन, तुझे सिलेक्शन झालेय!
मी गा....र!! लगेच आत्याला फोन केला, आता उद्या काय बोलू ते सांग आधी! काही नाही ग, सांग तुमच्या घरघंटी बद्दल, बायकाना कसा घरगुती बिझनेस देता ते! तुझ्या एकत्र कुटूंबाबद्दल बोल! मला हे मी काही करतेय हे आठवलेच नाही,, उद्या आठवेल याची शाश्वती नव्हतीच!
दुसऱ्या दिवशी जरा जरीची साडी नेसून नटून थटून गेले. तीन जजेस समोर प्रश्नोत्तरे झाली, प्रश्न आपल्या फॉर्म्स वरील माहितीवर आधारीत होते. एक पाकृ. झटपट होईल अशी, आणि तीन चार प्रश्न विचारले. मी हसतमुखाने (म्हणजे ते हसतच असते त्यामुळे फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.) सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आज हात पाय साथ देत होते. आणि थोड्याच वेळात सहा नावे जाहीर झाली. मी पाच नंबरला होते. अक्षरशः रडूच फुटले मला, त्या टीव्ही वरच्या कार्यक्रमात कसे जिंकलेले रडतात तसेच!!!
आणि मी हैद्राबादला रामोजी फिल्मसीटीला शुटींगला गेले. तेथे जी अनेक मोठमोठी माणसे भेटली त्यानी अमुलाग्र बदल झाला माझ्यात! छोट्या खेडेगावातली बावळट मी, खूप काही शिकले तिथे.. थोडक्यात सुपरवुमनच झाले म्हणा ना!!
आता तुमच्याशी हे बोललेय पण मला आता तशी समजू नका हं, आता मी ती स्पर्धा शेवटपर्यंत नसेल जिंकली पण प्रत्येकीत एक सुपरवुमन असतेच की, फक्त शोधावी लागते इतकेच!!!!!!!!!!