सुपरवुमन स्पर्धा
माझी सगळी फजितीच फजिती झाली तिथे! चार दिवस शुटींग होते. पहिल्या दिवशी कॅट वॉक शिकवले. मला काही केल्या ते जमेना. जरा बर्यापैकी जमू लागले तर पायात काच गेली कारपेटमधली! त्यानंतर अॅरोबिक्स! मला वाटे जाऊन म्युझिक बंद करावे! मग आपले व्यक्तीमत्व आहे त्यात खुलून दिसावे म्हणून काय करावे, यावर लेक्चर! यात ड्रेस, रंगसंगती, दागिने,आणि बरेच काही! आम्हाला तिघीना मिळून एक रूम दिली होती. एक पुण्याची होती आणि एक नाशिकची रेडीओ मिर्ची. जेवण, नाष्टा सारेच चांगले होते. दुपारी पूर्ण शाकाहारी असल्याने मी खुश पण रात्री जेवणात मासे! मी जेवण घ्यायला गेले तर तो त्या चिमट्याने पोळी उचली त्यानेच ते मासे उचली! मी माझ्या हाताने तळातली पोळी घेतली आणि जेवायला बसले तर माझी पुण्याची मैत्रिण माझ्या शेजारी येऊन बसली, ते काटे काढायला लागल्यावर मला काही जेवण जाईना! पहिलीच वेळ होती माझी, त्यामुळे रुमवर आले आणि दोन लाडू गट्टम केले आणि झोपले
दुसऱ्या दिवशी सकाळी पहील्यांदा ट्रेजर हंट! ते मला छान जमले. खजिना मलाच मिळाला आणि त्याचे बक्षीस म्हणून चांदीचा कुंकवाचा करंडा! त्यानंतर पैठण्या नेसून स्टेजवर पहिली एंट्री! आपली माहिती करून द्यायची,
समोर तीन जजेस, एक पाहुणा जज जो रोज बदलायचा. विष्णू मनोहर, निलम शिर्के, शुभांगी लाटकर, आणि
संगिता, आडनाव विसरले मी! पहिल्या फेरीत आपल्या देशातील कोणत्याही भागातला पारंपारिक वेश
आणि त्याबद्दल सर्व माहिती सांगायची होती. आधी अभ्यास करून गेल्यावर पेपर सोपा जातोच. मी छान नऊवारी साडी, कपाळावर पिंजर, हातात बटवा आणि त्या बटव्यात पैसे सुपारी आणि तांदूळ नेलं होतं. आत गेल्याक्षणी सगळ्या जजेसना वाकून नमस्कार केला. माहिती सांगितली. अपेक्षेप्रमाणे जजनी विचारलं बटव्यात काय आहे? म्हटलं...देवळात अभ्यंकर गुरुजींच्या प्रवचनाला जाणारे म्हणून पैसे सुपारी घेतलीय.या फेरीत मला
पूर्ण गूण मिळाले.
दुसऱ्या फेरीत एखादा प्रसंग सांगून तो सहकाऱ्यांच्या मदतीने सादर करायचा. वस्तूंच्या जमवाजमवीसह दोन
मिनीटे! मला रजिस्टर मॅरेज आले, त्यासाठी दोन बायका, दोन पुरूष सहाय्य़क होते. इथून माझ्या फजितीला
सुरूवात झाली. मला या दोन लग्न झालेल्या बायकांपैकी कोणाच्या गळ्यात परक्या पुरूषाला हार घालायला
सांगणे रूचेना! मी दोन पुरूषांचे लग्न लावले. जजेस हसले आणि माझे कारण ऐकताच म्हणाले, विचार करताय
जुन्या जमान्यात असल्यासारखे आणि समिलिंगीला दुजोरा देताय! मी जी खाली मान घातली, सगळेअवसानच गळून गेले.
तिसऱ्या फेरीला जातानाच मी आमच्या निवेदकाला म्हटले, आधी गृहपाठ न देता एकदम पेपर देता येत नाही
मला! तो चिन्मय मांडलेकर होता. या फेरीत एक वस्तू हातात देऊन दोन मिनीटात त्याचे विविध उपयोग
दाखवायचे होते. माझ्या हातात एक दोरी मिळाली. सात आठ उपयोग दाखवल्यावर मी स्तब्ध! समोर प्रेक्षकात
बसलेल्या एका बाईने माझी मदत(?) केली. मला तीने दोरी गळयाभोवती आवळून दाखवली. वेळ कमी
असल्याने मी काहीही विचार न करता ते करून दाखवले. पुढे जजेसनी किती शाबासकी दिली असेल, विचार करा!
शेवटची फेरी होती आपल्या कला दाखवण्याची! यात मी टाकाऊतून टीकाऊ अशा शोभेच्या वस्तू दाखवल्या.
कॅरीबॅगपासून चटई, एक्स रे फिल्म कापून त्यात थर्माकोलचे गोळे ओऊन फ्लॉवरपॉट, पिस्ता साले,
वेगवेगळ्या बियांची फुले! हे आधी बनवून न्यायचे आणि कसे केले ते दाखवायचे!यावेळी शुभांगी लाटकर खूप बोलल्या मला. मला म्हणाल्या अशा विणकाम, सजावट यात फालतू गोष्टींचा जीवनात काय उपयोग? तुम्ही त्यातून अर्थार्जन करता का? मी म्हटलं त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा केलं आता फक्त आवड म्हणून करतेय.
बाहेर आल्यावर त्या मला म्हणाल्या खूप अप्रतिम केलयस तू पण आम्हाला गृहिणींना पुढे न्यायचंच नाहीय. सुपरवुमन ही सर्व क्षेत्रात पुढे जाणारी हवी. असो मला एवढंच वाटलं की आपण इतक्या लोकांच्यात उभं तर राहू शकलो.
यात नेहमीच एक कमेंट मला मिळाली, ती म्हणजे तुमचे हास्य अगदी पदार्थावरील कोथिम्बिरीसारखे आहे.
पदार्थाला जशी कोथिम्बिरीने शोभा येते तसेच तुमचे सादरीकरण भले चुकू दे, पण तुमच्या मनाचा प्रांजळपणा
आम्हाला भावला! तर असे भाव खाऊन शेवटून तिसरा नंबर मिळवून मी रत्नागिरीला परत आले. ही
सुपरवुमनची कहाणी पाचाउत्तरी सफल संपूर्ण!!
अशी ही गोष्ट तुम्ही ऐकून घेतेलीत हेच माझ्यासाठी मोठे बक्षीस आहे.