तुंबाड: अंगावर येणारी लालसा(थोडे स्पॉयलर्स अलर्ट)

"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.
.
'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.
.
'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.
.
आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.
- अनुराधा कुलकर्णी
.
(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle