"काय गं थकलेली दिसत्येस आज फार? खूप हेक्टीक दिवस होता का?" घरात आल्याआल्या प्रतिमाच्या प्रश्नावर सावलीने नुसतच "ह्म्म" असा त्रोटक रिप्लाय दिला त्यावरूनच प्रतिमाने ओळखलं, "आज स्वारी गंभीर दिसते आहे."
"मग, आज जेडीची काय नवीन खबरबात?" एकीकडे कॉफी घेताना, मुद्दामच गंभीर विषय टाळत प्रतिमाने हलक्याफुलक्या विषयाने सुरुवात केली.
"जेडी? अरे बाप रे! तो तर एक अजबच माणूस आहे. आज नवीन माहिती कळली त्याच्याबद्दल. फेसबूकवर या प्राण्याची म्हणे फेक प्रोफाईल आहेत आणि मायबोलीवर तर ३ डुप्लिकेट आयडी."
"काय करतो काय इतक्या सगळ्या प्रोफाईल्सचं? कसं मॅनेज करतो?"
"काही नाही गं. नुसता ढोल बडवत असतो, फेसबूक फ़्रेन्डलिस्टमधे इतके मित्र आहेत, अन् ब्लॉग पोस्टवर आज इतक्या कमेन्ट्स पडल्या... फालतूपणा नुसता!."
"सावलीऽ हाच सगळी प्रोफ़ाईल्स आळीपाळीने वापरून कमेन्ट्स करत नसेल कशावरून?"
"हं... शक्य आहे. माझा तर त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही. तोच काय, कुणावरच नाही."
हे शेवटचं ‘कुणावरच नाही’ म्हणतानाचा तिचा आवाज काळजात कळ देऊन गेला.
"काय होतय नक्की?" हीच ती योग्य वेळ म्हणत प्रतिमाने मुद्द्याला हात घातला.
“आमच्या काळजीवाहू ताईसाहेबांचा फोन येऊन गेला. या जागेचं काहीतरी करायला हवं म्हणे. आईला जाऊन सहा महिने होतील आता. इतक्या महिन्यांत माझ्या एकटेपणाची काळजी नाही वाटली आणि आता मी माझीच कंपनी एन्जॉय करायला शिकल्यावर आला हिला पुळका! माझा आता तिच्यावरही विश्वास नाही. जगात कुणावरही नाही, तुझ्याशिवाय. मला फक्त तुझी सोबत पुरे आहे. तू रहाशील ना सोबत कायम?" सावलीने हात पुढे करून विचारलं.
तिच्या हाताला आरशातल्या प्रतिमानेही हात लावला तेव्हा कुठे सावली जरा रिलॅक्स झाली. या सगळ्या गडबडीत गार झालेली कॉफी संपवली आणि मग सावली, प्रतिमाला एक स्मितहास्य देत कप घेऊन स्वयंपाकघराकडे वळली; नेहमीप्रमाणे तिच्या एकटीसाठी कुकर लावायला...