मूगडाळ हलवा

'मूगडाळ हलवा' युट्युबवर शोधल्यावर खंडीभर पाककृती मिळाल्या, त्यातली कुणाल कपूरची पाकृ मला 'अपील' झाली, ती केली तर खूपच छान हलवा झाला. त्यात मी बरेच बदल केले.

त्या बदलांसहीत ही पाककृती.

साहित्य:

मुगाची डाळ - १ वाटी
रवा - १ चमचा
बेसन - १ चमचा
तूप - १ वाटी
साखर - १ वाटी
पाणी - १ वाटी
काजू, बदाम, पिस्ते - प्रत्येकी १ मूठ
केशर, वेलची पूड

कृती:

१. मुगाची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात किमान तीन तास भिजवून घ्यावी. मग तासभर तरी गाळण्यावर उपसून ठेवावी.
२. उपसलेली डाळ मिक्सरमधे पाणी न घालता वाटून घ्यावी.
३. नॉनस्टिक कढईत एक वाटी तूप गरम करून त्यात रवा बेसन छान परतून घ्यावं, मग त्यात वाटलेली डाळ घालून परतत राहावं.
४. बारीक गॅसवर डाळ परतत राहावी, ती सगळं तूप शोषून घेते त्यामुळे हात दुखला तरी डाळ परतणं थांबवू नये आणि लवकर भाजली जाण्यासाठी गॅस मोठा करू नये.
५. खूप खूप परतल्यावर डाळीचा रंग बदलायला सुरूवात होईल.
६. तोवर बाजूच्या गॅसवर एका पातेलीत साखर आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवावं. उकळी आली की लगेच गॅस बंद करावा, साखरेचा पाक करायचा नाहीये. त्यातच वेलची पूड आणि केशर घालायला हरकत नाही.
७. बाजूच्या गॅसवरची डाळ आता परतताना हाताला हलकी लागेल. बेसनाचे लाडू करताना बेसन भाजत आल्यावर कसं हलकं होऊन त्याला तूप सुटू लागतं, अगदी तसंच डाळीला तूप सुटून ते सगळं मिश्रण आता खदखदू लागेल.
८. मिश्रणाचा रंग खमंग आला की त्यात सुकामेवा घालून साखरेचं पाणी थोडं थोडं सावकाश घालावं आणि मिश्रण हातावर उडणार नाही अश्या बेताने ढवळणं चालूच ठेवावं.
९. दोन मिनिटं झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आली की गॅस बंद करावा.
१०. मूगडाळ हलवा तयार आहे.

मी केलेले बदलः
१. मी दोन वाट्या डाळीचा हलवा केला.
२. त्यात १०० ग्रॅम खवा घातला. हा खवा मिश्रणाला तूप सुटू लागल्यावर घातला.
३. आधी आगाऊपणा करून तूप कमी घेतलं होतं, पण ते जेवढ्यास तेवढं लागतंच हे माझ्या लक्शात आलं. कारण डाळ परतत राहाणं कठीण होऊन बसलं होतं.
४. गरम असताना हलवा चांगला लागला, पण आता गार झाल्यावर खूपच कोरडा झाला आहे. त्यावर दूध शिंपडून आणि जरा तूप घालून मावेत गरम केल्यावर फार म्हणजे फारच सुंदर लागतो आहे.

अधिक टिपा:
१. तुपाची काटकसर करू नका.
२. डाळ परतताना हात भरून येणारच आहेत, पण कष्टाचे फळ गोड आहे.
३. युट्युबवर कुणाल कपूरची रेसिपी पाहून घ्या. डाळ कशी तूप शोषून घेते, किती परतायचं, तूप सुटल्यावर डाळ कशी खदखदू लागते, कुठल्या पायरीला साखरेचं पाणी घालायचं हे एकदा बघून घेतल्यावर हलवा छान होईल.

20181018_145022.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle