हुशार पण दीड हात असलेला नवरा, अठरा विश्व दारिद्र्य आणि दुर्गम खेडेगाव अशा ठिकाणी आई लग्नाला तयार झाली. लग्न होऊन मुंबई सारख्या शहरातून कुर्ध्यात(रत्नागिरी तालुक्यातील एक खेडेगाव)आली आणि कुर्ध्याचीच होऊन गेली. अतिशय कष्ट करून आपला संसार रथ ओढणाऱ्या बाबांना आईने तितकीच खंबीर साथ दिली. वाती करणं, शिवणकाम करणं, वेगवेगळ्या वड्या करणं,पापड फेण्या करणं, कोकणातील अनेक वस्तू तयार करणं असे गृह उद्योग करून आमच्या चौघांच्या शिक्षणासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही. स्वत:चे माहेरचे फारसे नातेवाईक नसले तरीही आईने सासरच्या सगळ्या नातेवाईकांचा प्रेमाने पाहुणचार करून साऱ्यांना आपलंसं केलं. शेजारी, गावकरी साऱ्यांशीच चांगलं नातं जोडलं! अगदी कामाला येणाऱ्या माणसांना प्रेमाने आपल्या घासातला घास देत आयुष्याच्या उत्तरार्धात आजही वयाच्या सत्तर व्या वर्षी तेवढ्याच उत्साहाने लेक सुनेच्या संसाराला हातभार लावते आहे.
आईने माझ्या आजीकडून अनेक पारंपरिक पदार्थ आवडीने शिकून घेतले. कोकणातील बरेच पदार्थ गूळ, ओलं खोबरं आणि तांदूळ या त्रिकुटा भोवती फिरणारे! पण तितकेच खमंग आणि चविष्ट... या पदार्थांची सजावट करायलाही आजीने दाखवलेली प्राजक्ताची देठं वाळवून त्याचं केशर वापरायची पद्धत आईने पुढे चालू ठेवली.
अशा प्रकारे आजी आई कडून आलेला पारंपरिक आणि दिवाळीचा खास पदार्थ देतेय.. गूळ नारळ पोहे!!
गूळ नारळ पोहे : दिवाळी स्पेशल
कोकणात या दिवसात नविन भात तयार होते. याभातापासून ताजे पोहे दिवाळीसाठी तयार केले जातात. भात आदल्यादिवशी भिजत घातले जाते. दुसय्रा दिवशी परडीत उसपून त्यावर आधण (गरम) पाणी ओतले जाते. मग हे भात भाजून त्यापासून पोहे कांडले जात. पूर्वी हे काम घरीच केले जाई. आता पोह्यांच्या गिरणीत होते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी नैवेद्याला गूळ नारळ पोहे हवेतच.
साहित्यः
एक वाटी गावठी किंवा नेहमीचे जाडे पोहे, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, एक चमचा तूप, मीठ, वेलची पावडर. थोडे पाणी, केशर.
कृती: प्रथम पोहे धुवावेत आणि चाळणीवर निथळत ठेवावेत. ओले खोबरे, गूळ आणि चवीला मीठ हे सर्व कढईत एकत्र करावे. पाव वाटी पाणी घालावे. मंद गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला की धुतलेले पोहे घालून नीट मिसळावे. वेलची पावडर घालावी. चमचाभर तूप सोडावे. आणि एक वाफ येऊ द्यावी. प्राजक्ताच्या केशर काड्यानी सजवावे. गरमागरम चविष्ट पोहे केळीच्या पानावर घ्यावेत आणि वर तूपाची धार!!!! अहाहा!! थंडीच्या दिवसात मजा येते हे पोहे खायला. गूळ तुमच्या चवीनुसार कमी घेण्यास हरकत नाही.