माझ्या नवर्यानं एक लिस्ट तयार ठेवली आहे - असे देश की ज्यात भारतीय पासपोर्ट असेल तर व्हिसा लागत तरी नाही किंवा व्हिसा ऑन अरायवल मिळतो. आनंदाची बातमी अशी की ही लिस्ट दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. इथे आहे ती लिस्ट : https://en.wikipedia.org/wiki/Visa_requirements_for_Indian_citizens
सर्बिया तर केव्हाचं फोकसमध्ये होतंच. त्याला कारण हे की व्हिसा न काढताही चटकन ठरवून थोड्या दिवसांकरताही ट्रिप होऊ शकते. बरं बाकी सेटप युरोपचा - छोटी गावं, आटोपशीर शहरं, सुंदर सुंदर जुन्या इमारती, उदंड इतिहास, शहरांतर्गत पायी फिरता येईल अशी अंतरं, कॅफेज, सिटी सेंटर्स, खाऊपिऊ करत आरामात विंडो शॉपिंग करता करता तिथल्या स्थानिक जीवनाचा आस्वाद घेण्याची सोय.... हे आमचं आनंदनिधान. खूप धावाधाव करून समस्त टुरिस्ट स्पॉटस बघायची उस्तवार आमच्यानं होत नाही.
सर्बिया अगदी तसंच होतं. ते आठ दिवस फार फार मस्त घालवले आम्ही. लहानसा देश पण किती वैविध्य आहे. ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स, रशियन, तुर्की अशी सरमिसळ झालेली संस्कृती. सर्बियाचे चलन आहे दिनार म्हणजे बघा. अजूनही सगळं आलबेल नाहीये.
रशियन सिरिलिक लिपी पण त्यात काही वेगळी अक्षरे. मी आठवून आठवून रशियन लिपी वाचायचा प्रयत्न करत असताना अचानक ठेच लागायची ती अगम्य अक्षरं आली की.
देशाची राजधानी बेलग्रेड आणि त्यानंतरचं दोन नंबरचं शहर नोवी ग्राड या दोन शहरांना आम्ही भेट दिली. दोन्ही शहरं डान्युब नदीकाठी वसलेली. बेलग्रेड मध्ये तर दोन दोन नद्या सावी आणि डान्युब आणि त्यांचा संगम. ही डान्युब नदी इतके दिवस फक्त जर्मनीची होती माझ्यासाठी. ती अचानक लेकुरवाळ्या बाईगत अंगाखाद्यांवर, हाताशी, बगलेत असे बरेच देश बाळगून असल्याचा साक्षात्कार झाला. शेवटी काही झालं तरी युरोपातली वोल्गा खालोखालची सर्वांत लांबलचक नदी आहे ती.
देशाची राजधानी असली तरी बेल्ग्रेडमध्ये ती महाविशाल मेट्रो शहरांतली प्रचंड धावपळ नाही. भर आठवडयात दिवसभर शहरातला मध्यवर्ती चौक कसा आरामात फिरणार्या लोकांनी गजबजलेला असायचा. आम्ही अगदी भर सिटी सेंटरमध्येच एका हॉटेलात राहिलो होतो. त्यामुळे उडी मारली की त्या चौकात हजर. काय मस्त मजा आलीये तिथे भटकताना. रस्ता क्रॉस केला की समोर नॅशनल म्युझियम. किती सुंदर तो ही. सिटी सेंटर म्हणजेच त्या मध्यवर्ती चौकाचा पूर्ण परिसर केवळ पायी चालणार्यांसाठी.
सर्व प्रकारची दुकानं, कॅफेज, आर्ट गॅलरीज, रेस्टॉरंट्स वगैरे तर होतीच पण त्यावरच्या इमारती काय देखण्या.
हा भला मोठा परिसर फिरून दुसर्या टोकाला पोहोचलं की एक रस्ता ओलांडून तिथल्या छोट्याश्या किल्ल्याचा परिसर सुरू - कालेमॅगडन फोर्ट्रेस. हा भलामोठा परिसर. त्यात एक छोटा किल्ला. आणि बाकी बाग, लहान मुलांना खेळण्याची जागा, अनेक टेनिस कोर्ट्स, मिलिटरी म्युझियम, सुवेनिअर शॉप्स. इथून दिसणारे शहराचे आणि सावी-डान्युबच्या संगमाचे विहंगम दृष्य तर केवळ अनमोल. संध्याकाळी आम्ही सनसेट क्रूझ केली या नद्यांवर.
संगम. डावीकडून वाहणारी सावी आणि ती लांबवर दिसणारी डान्युब :
क्रूझ - टर्टल बोट :
सर्बियन कावळा. आकारानं मोठा आहेच पण दोन रंगात असतो. :
इथल्या एका सी फूड रेस्टॉरंटमध्ये लारा आणि मी डिनरला गेलो. आम्ही सी बास निवडला आणि त्यानं तो मासा आणून दाखवला. मग आम्ही जे ऑर्डर केलं त्याव्यतिरिक्त अॅपेटायझर म्हणून त्या माश्याचंच कर्पाचिओ ( carpaccio ) बनवून आणून आम्हाला खिलवलं त्यानं. आणि मग मेन कोर्स म्हणून ग्रिल्ड फिश विथ व्हेजिटेबल्स आले. निव्वळ अफलातून चव होती आणि मग आमची ती संध्याकाळ त्यानं अगदी आनंदी करून टाकली.
जेवणानंतर आम्ही त्या मस्त थंड हवेत, लांबचलांब भटकत राहिलो आणि रात्री उशीरा हॉटेलवर गेलो.
बेलग्रेडमध्ये तरी भाषेचा प्रॉब्लेम अजिबात आला नाही. बहुतकरून तरूण पिढीला इंग्लिश व्यवस्थित बोलता येतं. टॅक्सीवाल्यांना अगदी जुजबी येतं पण काम होऊन जातं. बेलग्रेडचा Museum of Contemporary Art बघायला गेलो होतो.
म्युझियमचे आवार
तिथून आम्हाला नदी ओलांडून शहराच्या दुसर्या टोकाला असलेल्या सेंट सावा चर्चला जायचं होतं. तिथे असलेल्या एका छोट्या टपरीत चौकशी केली तर टॅक्सी पकडायला बरंच लांब असं मेन रोडपर्यंत जावं लागणार हे लक्षात आलं. तिथलं लोकल टॅक्सीचं अॅपही काही मदतीला येईना. आम्ही त्या म्युझियमच्या बाजूच्या रस्त्यावरून आजूबाजूची विस्तृत बाग, त्यात ठेवलेल्या कलाकृती, खेळणारी मुलं वगैरे बघत मुख्य रस्त्याच्या दिशेनं जात असताना पुढे एक कार थांबलेली दिसली. आम्ही जवळ गेल्यावर ती चालवणारा माणूस उतरून आमच्याकडे येऊन त्याच्या गोडश्या सर्बियन अॅक्सेंटमध्ये पण इंग्रजीत म्हणाला की तुम्हाला सेंट सावा चर्चला जाताय ना? तुम्ही तिथे चौकशी करत होतात ते मी ऐकलं. बसा कारमध्ये, मी सोडतो. अरे भाऊ, असं कसं आम्ही कुणाच्या कारमध्ये घुसणार? हे काय आक्रीत. आम्ही याला कसं कटवावं या विचारात. तर तो मागेच लागला, म्हणे काळजी करू नका मी घेऊन जातो तुम्हाला. मी एकदम जंटलमन आहे. गाडीत डोकावलं तर त्याची छोटीशी मुलगी लाजून बसली होती. मग आम्ही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. माणूस खरंच भला दिसत होता. तर त्या पठ्ठ्यानं आम्हाला गप्पा मारत मारत खरंच चर्चपर्यंत आणून सोडलंन की. त्याला खरंतर कुठेतरी दुसरीकडेच जायचं होतं त्याच्या मोठ्या मुलीला पिकअप करायला पण त्याच्याकडे वेळ होता तर त्यानं हे सत्कार्य केलं. देव त्याचं भलं करो.
हे ते चर्च. या चर्चचं खरं नाव आहे सेंट सावा टेंपल कारण याचा कळस गोल आहे, नेहमीच्या चर्चसारखा उभा सुळका नाहीये. आणि हे चर्च गेले १०० वर्षं बांधलं जातंय. अधूनमधून युद्ध्हामुळे काम बंद पडलं होतं आणि अजूनही ते पूर्ण झालं नाहीये. बाहेरून परिपूर्ण दिसतं पण आतमध्ये बांधकाम सुरूच आहे. याबद्दल इथे हा एक लेख वाचता येईल. :
चर्च आतून.
तीन दिवस इथे राहून मग तासादीड तासाच्या अंतरावर असलेल्या नोवी सादला पोचलो. इथेही डान्युब होतीच आणि गंमत म्हणजे एक मोठा किल्लाही होता. आणि त्याहून गंमत म्हणजे आमचं हॉटेल त्या किल्ल्यातच होतं. काय सुरेख जागा होती ती. रुममधून नदीचा देखावा. हॉटेलही फार म्हणजे फारच सुरेख. मला अशी हॉटेलं आवडतात. त्यांना आपलं असं एक व्यक्तीमत्त्व असतं आणि ते खूपच हटके असतं. नेहमीची चेन हॉटेल्स कंफर्टेबल असतात कारण त्यात आपल्याला लागणार्या गोष्टी हमखास असतातच. पण अशी बुटिक हॉटेल्स असतात ती एक्ल्प्लोअर करायला मजा येते. इथल्या मॅनेजरनं आम्हाला इथल्या वेगवेगळ्या खोल्या दाखवल्या. प्रत्येक खोली वेगळी. किल्ल्यातल्या खोल्यांचं हळूहळू रुपांतर करून हॉटेल बनलंय. खाली किल्ल्यात फिरायला येणारी लोकं भटकत असायची, हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये खाली खुर्च्यांवर बसलेली असायची, साडेचारलाच सूर्यास्त व्हायचा पण लोकं खूप वेळ रेंगाळत असायची, मग रात्री एकदम शांतता. तो किल्ला आणि त्याचा परिसर फार मस्त होता.
हॉटेल आणि परिसर :
हॉटेल एंट्र्न्स आणि आतमधे :
ब्रेकफास्ट स्प्रेड, ब्रेकफास्ट रूम, आमची रूम आणि खिडकीतून बाहेरचे/खालचे दृष्य :
नोवी सादमधील किल्ल्यातील संध्याकाळ :
किल्ल्यातील क्लॉक टॉवर :
त्या पुलाखाली दिसतोय तो खंदक आहे.
खंदक :
सोनेरी संध्याकाळ :
शक्य आहे त्यांनी सर्बियाला अवश्य भेट द्या. लवकरात लवकर. कारण आता तो युरोपियन युनियन मध्ये सामिल होऊ घातलाय मग मात्र व्हिसा लागेल. शिवाय अतिशय स्वस्त आहे सर्बिया. भारतीय रुपयांपेक्षा चलन स्वस्त आहे त्यामुळे आपल्याला सगळं स्वस्त वाटतं. अगदी चांगलं हॉटेलही आवाक्यातल्या दरात मिळेल. टॅक्सी जरा महाग वाटते मात्र. पण इतक्या स्वस्त्यात युरोपचा फील घेण्याकरता सर्बियाला जरूर जा.