आयुष्य किती वेगवेगळ्या धाग्यांनी गुंफलंय! सुखाच्या अत्युच्च शिखरावर असताना कधीतरी अचानक ब्रेक लागतो... तरी अशावेळी थोडं थांबावं आलेल्या दुःखाशी छान मैत्री करावी त्याला त्याचा वेळ घेऊ द्यावा आणि पुढे जात रहावं! नुसतं हे सांगण्यासाठी नाही मी केलंय.. अनुभवलंय आणि बाहेर पडतेय!
16 जूनला दिनानाथला गेले आणि ब्रेस्ट कॅन्सरची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली. कळल्यावर जे होतं तसंच झालं मी पूर्ण कोलमडले... कॅन्सर हा शब्दच असा आहे की आपल्याला अंधार दिसतो फक्त! हळूहळू घरातल्या सगळ्यांनी समजावलं...उभं रहायचं बळ दिलं आणि पुढची दिव्य सुरू झाली. 20 जूनला पेट स्कॅन केलं आणि डॉक्टर नी सांगितलं अगदी प्रायमरी स्टेज आहे पण किमोथेरपी घ्यावी लागेल. लगेच 22 ला पहिली किमोथेरपी झाली. मनात धडधडत होतं... रोज केस विंचरताना वाटे आता जाणार सगळे.. शेवटी मनाला समजावलं हा ह्या ट्रीटमेंट चा भाग आहे.. वहिनीने छान वीग पाठवलाय...नाहीतरी असा कट मी कधी करणार होते? झकास दिसत होते मी.. सावरले होते.. आजूबाजूला दिसणारी असंख्य दुःख पाहून... मी खरंच खूप नशीबवान आहे! ट्रिटमेंट च्या मधे त्रास कमी झाला की नवीन रेसीपी करायची , स्पर्धेत भाग घ्यायचा.. हे चालूच होतं... त्याच्या जोडीला लिखाण, विणकाम हेही सुरू ठेवलं! 10 ऑगस्टला छोटीशी सर्जरी झाली. एखाद्या सेशनला खूप त्रास तर कधी कमी पण इतरवेळी सण, समारंभ, घरातल्या छोट्या कार्यक्रमात सगळं विसरले.. माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणाऱ्या माझ्या दोघी जावा.. अगदी जेवणखाण ते हॉस्पिटल सगळं सांभाळत होत्या. मंगेश दिवसरात्र गाडीसह दिमतीला होताच! लेकही स्वतःचं लहानपण विसरून मला आधार देत होता. समजूतदारपणे वागत होता.आई बाबा सतत मला धीर द्यायला होतेच! नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळेच काळजी घेत होते. एवढं सगळं बळ पाठीशी असल्यावर कॅन्सर सारखा आजार आहे हे सुध्दा विसरायला झालं मला! आता मेन ट्रीटमेंट सम्पलीय... शेपूट राहिलंय तेही लवकरच पूर्ण होईल आणि मी नवीन वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागेन! फक्त यासाठी स्वतःकडे वेळच्यावेळी लक्ष देणं महत्वाचे... ते विसरू नका! आता लवकरच भरपूर नवीन रेसीपी प्रयोग वाचायची तयारी करा बरं... मी येतेय..... नवीन उत्साहात नवीन रेसीपी सह!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle