प्रवास...

वरदाला घरी येऊन उद्या एक महिना पूर्ण होईल. तिच्या घरी येण्याचा प्रवास म्हणजे आमचा पालक होण्याचा प्रवास. जो खरं म्हटलं तर आम्ही आमचं नाव नोंदवलं तेव्हा, म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्येच सुरू झाला. आमच्या मनात...
तिचं अस्तित्व आम्हाला कळलं ऑक्टोबर २०१८ च्या सुरुवातीला. तर तिथपासूनचा आमचा प्रवास लिहिते आहे. म्हटलं तर काही उत्सुकता दाखवलेल्या मैत्रिणींसाठी, पण खरं म्हटलं तर स्वतःसाठीच. आणि मनात असलेल्या इतर अनेक लेखांप्रमाणे हाही विषय राहून जाउ नाही म्हणून मी स्वत:लाच ही तारीख दिली होती. तोवर जरातरी सेटल होऊ अशी आशाही मनात होतीच.
मला काही आटोपशीर, मुद्देसूद लिहिता येत नाही. मनात आलेलं सगळंच मला मैत्रिणींना सांगावंसं वाटतं. मग होतोच फापटपसारा. वाचा आता नि काय! जमेल तसं लिहून टाकत जाते. सगळं काही सलग एका बैठकीत लिहून टाकायचं म्हटलं तर संपलंच!

काराकडे नाव नोंदवून २२ महिने झाले होते. ४-६ महिन्यांपासून आम्ही रोज आमचा नंबर आज लागेल की उद्या अशी वाट बघत होतो. बाहेर जायचा प्रत्येक बेत, खरेदीचा प्रत्येक विषय किंवा कोणताही कार्यक्रम असो, मूल घरी आल्यावर सगळं बदलेल, मग हे बदल होतील, इतक्या सहजपणे उठून निघता येणार नाही बाहेर, असे विचार दोघांच्याही मनात तरळून जायचेच. कधी आम्ही बोलून दाखवत असू तर बरेचदा नाही.
आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो सुदिन उजाडला! दुपारी नवऱ्याचा फोन आला, अग, आपल्याला मेल आली आहे. मेलमध्ये बाळाचा फोटो आणि मेडिकल रिपोर्ट आहे. त्याच्याशी बोलताबोलताच रडू यायला लागलं. फोन ठेवून भरपूर रडून घेतलं. जरा वेळात नवरा घरी आला. त्याला मिठी मारून परत एक डोळे गाळण्याचं सेशन झालं.
मग दोघांनी मिळून तिचा फोटो पाहिला, सगळे रिपोर्ट पाहिले. ओळखीच्या दोन डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवून शंका विचारल्या. आम्हाला ४८ तासात आम्ही इंटरेस्टेड आहोत की नाही ते कळवायचं होतं. आपलं ‘हो’ ठरेस्तोवर कोणाला सांगायचं नाही असं आम्ही पक्कं ठरवलं होतं आम्ही, पण कसचं काय! नणंदेचा फोन आला होता सहज, नि मी न रहावून तिला सांगून टाकलं. संध्याकाळी मंदिरात गेलो, थँँक्यू म्हणायला आणि बाहेरच जेवलो. जेवता जेवता न रहावून आम्ही दोघांच्या आईबाबांना आणि माझ्या भावालाही फोन करून सांगूनच टाकलं. आईचे बेत लगेच मापं दे, फ्रॉक शिवायला घेते वगैरे सुरू झाले. तिला आठवण करून दिली की अभी दिल्ली बहोत दूर है!
दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकल रिपोर्ट समाधानकारक वाटल्याने आम्ही या मुलीत इंटरेस्टेड असल्याची मेल पाठवून दिली. नवरा ऑफिसला गेल्यावर मी दुसऱ्या दिवशीची रेल्वेची तिकिटंं तत्काळमध्ये बुक करून टाकली. घर बंद करणं, सामान भरणं या दृष्टीने तयारी सुरू केली.
तिला बघितल्याशिवाय कपडे आणि इतर खरेदी करायची नाही हे पक्कं होतं म्हणून, नाहीतर तीही तयारी लगेच सुरू झाली असती. फक्त तिच्या खेळण्यांसाठी दोन कप्पे आणि कपड्यांसाठी अर्धं कपाट रिकामं करून तिथलं सामान दुसरीकडे जिरवणंं एवढंं करून ठेवलं.
दुपारी नवऱ्याचा फोन आला की आपल्याला दहा दिवसांनंतरची अपॉॉइंटमेंट मिळाली आहे. माझी इतकी चिडचिड झाली की विचारता सोय नाही. कधी एकदा मुलीला बघतेय असं झालेलं असताना इतके दिवस मधे? का? कशाला? आम्ही तयार आहोत की लगेच यायला. त्यावर, ‘शक्य तितकी लवकरची दिली आहे तारीख म्हणे!’ हे ऐकून चडफडले. आत्तापर्यंत जी प्रोसेस ऐकून होते त्यात या मुलाखती द्याव्या लागत असल्याचं कुठेच ऐकलं नव्हतं. त्यामुळे नंबर लागला की जायचं आणि सगळं ठीक असेल तर मुलीला घेऊन यायचं अशी मनाची समजूत. म्हणून तर ही चिडचिड. पण इलाज नव्हता.

(क्रमशः)

कारामध्ये रजिस्टर करताना, तुम्ही जिथे रहाता तिथली एक एजन्सी निवडावी लागते, ती मध्यस्थ स्वरूपात काम करते. आमच्या बंगलोरच्या एजन्सीने, आम्ही रजिस्टर केलं तेव्हाच आमच्याकडून पुढे लागणाऱ्या १७६० कागदपत्रांची फाईल बनवून घेतली होती. त्यामुळेही आम्ही जय्यत तयारीत होतो (असं आम्हाला वाटत होतं). पण या एजन्सीनं, म्हणजे श्रीवत्सने त्यांना हव्या असलेल्या कागदपत्रांची लिस्ट पाठवली आणि आम्ही खडबडून जागे झालो. आम्हा दोघांच्या बऱ्याच टेस्ट करायच्या होत्या, ज्यावरून आम्ही शारीरिकदृष्ट्या ठणठणीत असल्याचं सिद्ध होईल. दोन वर्षांपूर्वी गुंतवणुकी वगैरेचे जे कागद दिले होते, त्यांचे आत्ताचे स्टेटस द्यायचे होते. शिवाय स्वतःचं घर घेतलं त्याची, कागदपत्रे द्यायची होती.
याचा एक किस्साच झाला. आम्ही नवीन घरी राहायला येऊन आता सव्वा वर्षाहून जास्त काळ झाला आहे. इकडे शिफ्ट झाल्यावर आम्ही आमच्या एजन्सीमध्ये जाउन आमचा पत्ता बदलला असल्याचं सांगितलं. अगदी ऑनलाईन पण बदल केला. पण एजन्सीमधल्या बाईंनी आग्रह केला की आम्ही पत्ता बदलू नये. पत्ता बदलल्यास परत होम स्टडी रिपोर्ट करावा लागेल आणि या भानगडीत आमचा नंबर लागायला उशीर होऊ शकतो, असं म्हणाल्या. आम्ही दुसर्‍या एका एजन्सीमधल्या सोशलवर्करशी बोललो, त्यांनीही पत्ता बदलू नका असंच सांगितलं. पत्ताबित्ता काय फार महत्त्वाचा नसतो, तुम्ही आधीच्या घरीच रहाता आहात असं सांगा, असाच सल्ला मिळाला. आम्ही मुकाट्याने ऑनलाईन केलेला बदल पूर्ववत केला होता.
आणि आता श्रीवत्समधल्य, म्हणजे जिथे आमचा नंबर लागला होता तिथल्या सोशल वर्करने मात्र पहिला प्रश्न विचारला की तुम्ही नोकरी किंवा घर काही बदललं आहे का? मिळालेल्या सल्ल्यानुसार आम्ही नाही म्हणून सांगितलं. आणि आता कागदपत्रांच्या यादीत लेटेस्ट भाडे करार पावती मागितली होती. आणि त्याचं पत्त्यावर आमचं पोलीस व्हेरिफिकेशन होणार. आली का पंचाईत?
आम्ही नुकतेच शिफ्ट झालोय सांगावं, की असा असा सल्ला मिळाला सांगावं? आणि पहिल्या फोनला खोटं उत्तर दिलंय हे कोणत्या तोंडानं कबूल करायचं? नक्की काय करावं सुचेना. त्यात हे ऐकून त्यांनी मूल द्यायचंच रद्द केलं तर? दोन दिवस झोप-खाणंपिणं काही सुचत नव्हतं. सल्ला घ्यायला भावाला फोन केला तर त्यानेही खोटेपणा अज्जिबात करू नका असंच सांगितलं ( जे खरंतर आम्हालाही नीट माहिती होतं, पण तेव्हा डो़की जागेवर नव्हती एवढच.) शेवटी हिय्या करून सगळं खरं कबूल करून आता काय करू, असं त्या सोशल वर्करलाच विचारू या असं ठरवलं. एकदा यावर दोघांचं एकमत झाल्यावर आमच्या सोशल वर्कर मॅडमना फोन केला. तर त्या दिवसभर मीटींगमध्ये होत्या. आम्ही फारच हवालदिल झालो होतो. आमचे इतके फोन आले होते बघून त्यांचाच उलटा फोन आला.
मग आम्ही नवीन घर घेतलं म्हणून आता पत्ता बदलला, असा असा सल्ला मिळाला, आमचं चुकलं, वगैरे सगळं एका दमात सांगून टाकलं. त्यांनी आश्वस्त केलं की ठीक आहे, तुम्ही तुमच्या एजन्सीकडून लेटरहेडवर जुना पत्ता बदलून नवीन हा झालाय असं लिहून आणा. आणि नवीन घर तुमच्या नावावर असल्याचे कागद आणा.
इतकं हुश्श झालं की काय सांगू! मी परत एकदा रडले, पण या वेळी थोडीशीच!
आता बाकीची गम्मत सुरू झाली होती. मध्ये दहाएक दिवस असल्याने शेजारीपाजारी, मैत्रिणी वगैरेना भेटणं होत होतं. त्यात आम्ही पुण्याला जातोय असे उल्लेख येत होते. आम्ही जनरली गणपतीत पुण्याला जाउन आल्यावर डायरेक्ट मार्च-एप्रिलमध्ये जातो. यंदा दिवाळीत जाणार होतो हेही काही जणांना माहिती होतं. मग आता ऑक्टोबरमध्ये परत कसे आणि का चाललो? बर मी तरी ठीक आहे, अनिरुद्ध पण सुट्टी घेउन? सगळं ठीक आहे हे आम्हीच सांगत होतो. खरं कारण सांगू शकत नसल्याने काम आहे, आल्यावर सांगूच असं थातुरमातुर बोलत होतो. लोकांना बुचकळ्यात पाडून आम्ही चाललो होतो. पुण्यात गेल्यावर पण हीच प्रश्नोत्तर झाली बऱ्याच वेळा.
पोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंटर्व्ह्यू असल्याने आम्ही दोघं पूर्ण संध्याकाळभर फाईल्स तयार करत बसलो होतो. ओरिजिनल कागद वेगळे, काही ओरिजिनल, काही ओरीजनल नोटरी ठप्पावाले अशी एक फाईल, त्याच्या झेरॉक्स केलेल्या फाईल. काहींवर नोटरी, काही झेरॉक्स अटेस्टेड, काही स्टँप पेपरवर अशी बरीच कॉम्बीनेशन्स होती. सकाळी नीट नाश्ता करून, बरोबर पाणी घेउन, देवाला-मोठ्यांना नमस्कार करून, आम्ही निघालो. एकदम शाळा-कॉलेजमध्ये असतानाच्या परीक्षांची आठवण आली. ही पण होतीच मोठी, सगळ्यात मोठी परीक्षा. आई-बाबांचाही फोन येऊन गेला शुभेच्छा द्यायला!
जवळपास पूर्ण आयुष्य पुण्यात घालवून, शेकडो वेळा पुणे स्टेशनवर जा-ये करूनही ‘कोपऱ्यावर ससून आहे’ यापलीकडे त्याबद्दल माहिती नव्हती. अगदी गेट नक्की कुठे आहे तेही पक्कं माहिती नव्हतं. योग्य त्या गेटमधून आत गेलो. वेळेत पोचून हुश्श करत आमचा नंबर लागायची वाट बघत बसलो. नवरा टाईमपास आणि छंद दोन्हीचा मेळ साधून ससूनच्या आवारातल्या जुन्या इमारती निरखून आला. तो एक बोर्ड वाचत होता, तर इतका वेळ इथे काय करताय म्हणून गार्ड त्याला हुसकवायाला लागला होता, म्हणाला असं काही इथे येऊन करत नाही कोणी. ( बाय द वे, एका इमारतीला गांधीजींचं नाव दिलं आहे, कारण त्यांच्या पोटाच्या विकारावर इथे उपचार केले गेले. फारच फनी वाटलं मला ते.)

(क्रमशः)

आमच्याप्रमाणेच नंबर लागायची वाट बघत बसलेल्या शेजारचीने गप्पा मारायला सुरुवात करून मला तिची सगळी स्टोरी सांगितली आणि मलाही विचारली. तिच्याशी बडबड करत बसल्याचा फायदा म्हणजे एक तर पोटातला गोळा जरा विसरायला झाला आणि शारिरीक तंदुरुस्तीबद्दल हे संस्थावाले लोकं किती सजग आहेत तेही कळलं. (या जोडप्यातील नवऱ्याचं वजन अचानक वाढलेलं असल्याने त्याला काही विशेष टेस्ट करून घ्यायला सांगितल्या होत्या. आणि त्यावरचे उपचार करून घेतल्यावर समाधानकारक रिपोर्ट आणलेत की मगच पुढची प्रोसेस करू, तोवर बाळ राहील संस्थेत. आणि समाधानकारक नाही आला रिपोर्ट तर मूल देणार नाही असं सांगितलं होतं त्यांना.)
आमचे मेडिकल रिपोर्ट व्यवस्थित असल्याने त्याचं काही टेन्शन नव्हतं. पण अनिरुद्धचं काम वेगळ्या प्रकारचं, त्यातही ट्रस्टबरोबरचं असल्याने अडचणी येउ शकत होत्या. तसा अनुभव होता आधी. आमचा नंबर लागल्यावर आत गेलो. त्या सोशल वर्करने कधी आलात, कुठे उतरला आहात वगैरे सहज गप्पा मारत सुरुवात केली. आम्ही भरलेले फॉर्म्स आणि आमची सर्टिफिकेट्स यातील माहिती, तारखा जुळतायत ना हे बारकाईने तपासलं. एकदोन किरकोळ तपशील चुकले होते ते बदलले. आमची इतर माहिती विचारली, मूल वाढवण्याबद्दल काय विचार आहेत, घर कसं आहे, शेजार आहे का, कसा आहे, याबद्दल प्रश्न विचारले. घरी कोणकोण आहे, सगळे राजी आहे ना?, दोन्ही पालक वर्किंग असले तर मूल दिवसभर कोण सांभाळणार वगैरे सगळं विचारून घेतलं. साधारण दीडेक तास चालू होती ही मुलाखत. मग त्यांनी ‘आता चार वाजता डॉक्टरांशी अपोइंटमेंट आहे, तोवर जेवून या.’ असं सांगितलं. म्हणजे पहिला टप्पा पार पडला हे कळून आम्ही हुश्श केलं.

दुपारी डॉक्टरांशी भेट झाली. त्यांनी आमची दिनचर्या, फिटनेस, इमीजिएट फॅमिलीमध्ये कोणाकोण आहे आणि त्यात कोणाला काही आजार वगैरे आहेत का चौकशा केल्या. मुख्य म्हणजे आम्हाला यानंतर स्वतःचं मूल झालं तर आमचे या मुलाबाबत काय विचार असतील ते त्यांना जाणून घ्यायचं होतं.
सोशल वर्करसारखेच डॉक्टरपण खूपछान, गप्पा मारल्याच्या अविर्भावात सहजतेने बोलत होते, त्यामुळे दडपण न येता छान गप्पाच झाल्या जणू. यांनीही आम्हाला पास केलं.
या मुलाखतीच्या आधी एक गंमत झाली. ही मुलाखत श्रीवत्सच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर होती आणि पहिल्या मजल्यावर मुलांचा प्ले एरिया होता. तिथे एका दत्तक गेलेल्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी चालू होती. त्यासाठी सगळी मुलं बाहेर मस्त तयार होउन खेळत होती. वरदाच्या आसपासच्या वयाच्या सात-आठ मुली होत्या. आम्ही आपली लेक कोणती असेल याचे अंदाज बांधत होतो. चष्मा दोन-तीन जणींना होता. सगळ्यात जास्त पळापळ करणारी आणि हसरी, हीच होती. हीच असेल का आपली? हीच असू दे म्हणून मनोमन प्रार्थना केली. इतक्यात कोणीतरी तिला हाक मारली म्हणून तिने ‘ओ’ दिली आणि आमची खात्री पटली. आम्ही काही बोलूच शकलो नाही. एकमेकांचा हात धरून पाणावल्या डोळ्यांनी एकटक तिच्याकडे बघत बसलो.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle