अजंठा वेरुळवर कोणी लिहिलंय का भटकंतीमध्ये धागा नाही दिसला, हातात एकच दिवस असेल तर काय बघावे? नगरहून जायचा प्लॅन आहे येत्या वीकेंडला >>
अपडेट
काल वेरूळला जाऊन आलो.
सकाळी 7:30ला नगरहून निघून 10ला वेरूळला पोचलो, मग फ्रेश होऊन गाईडबरोबर कैलास मंदिरापासून सुरुवात केली. सर्टीफाईड गाईड घेतला होता त्याने खूप छान डिटेलमध्ये माहिती दिली.
गाईडची वेळ 2 तासच होती आणि त्यातला बराचवेळ कैलासमंदिरातच होतो, कितीही वेळ तिथे घालवला तरी कमीच आहे, प्रत्येक मूर्तीला काही ना काही अर्थ आहे तो समजल्यावर मूर्तीकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो, आम्हाला सगळ्या मूर्ती जेव्हढ्या निवांतपतणे बघायला आवडल्या असत्या तेव्हढ्या बघता नाही आल्या. त्यासाठी अजून पुन्हा एकदा दोघानीच जाऊ असं मी आणि नवऱ्याने ठरवून पण टाकलं.
कैलास मंदिर एक झलक
कैलासमंदिरातून बौद्ध लेणी बघायला गेलो, तोपर्यंत आमचं पिल्लू कंटाळलं. तो गाईड आम्हाला इथे थांबा, आता फोटो काढा, 15 मिनिटात परत या वगैरे सांगत होता. शिवाय तो जी माहिती सांगत होता ती ऐकण्यात आमच्या लेकीला काही रस नसल्यामुळे तिची सारखी भुणभुण चालली होती, म्हणे हा माणूस आपल्याला बॉस का करतोय? बाकी लोक का त्यांचे ते जातायत? हा माणूस एकटाच का बोलतोय? असे सारखे प्रश्न आणि इकडे तिकडे पळापळ चालू होती त्यामुळे तिथुन लवकर आटोपत घेतलं जैन लेण्यांना जायचं कॅन्सल केलं.
मग वरदाने सुचवलेल्या हॉटेल कैलासमध्ये लंचसाठी गेलो. इथलं जेवण छान होतं आणि जागा सुद्धा स्वच्छ होती. घृष्णेश्वर तिथून अगदीच पाच मिनिटांवर आहे म्हणून जेवून तिथे गेलो. रस्त्यातच निर्माल्य आणि इतर कचऱ्यामुळे एवढी घाण होती की मंदिरात जायची इच्छाच उडाली, तिथे गेल्यावरही मोठी रांग होती. आम्ही त्यामुळे रांगेतून बाहेर पडलो आणि कळसदर्शनावर समाधान मानलं.
तिथून पुढे दौलताबाद किल्ला बघायला गेलो, मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जायलाही बरंच चालावं लागलं. रस्त्यात माकडांच्या झुंडी होत्याच. आमच्याकडे काही खायला नसल्यामुळे आम्हाला काही त्रास नाही झाला.आमच्या जेनांनी अजून पुढे न जाण्याचा निर्णय घोषित केला. त्यामुळे आम्ही मुख्य दरवाज्याच्या इथेच बसलो. नवरामात्र वरपर्यंत गेला पण 2 3 शाळांच्या सहली आल्यामुळे सगळीकडे मुलांच्या झुंडी होत्या आणि जिथे चढू नका, हात लावू नका असं लिहिलं होतं तिथेही जनता बिनधास्त चढून सेल्फी काढत होती त्यामुळे तो वैतागून लगेच परत आला.
मी आणि लेक थोडं वर जाऊन खंदक वगैरे बघून आलो. काही ठिकाणी थोडी डागडुजी केली आहे आणि अजून काम चालू आहे. एक जमेची गोष्ट म्हणजे बाथरूम्स स्वच्छ आहेत.
किल्ला अतिशय पुरातन आहे आणि वेगेवगळ्या काळातल्या स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. शिवाय आता नवीन बांधकाम आणि रिस्टोरेशन पण चालू आहे. दोन तीन ठिकाणी हिरवळ करून छोटी बाग फुलवलीये ते छान वाटतं पण एवढ्या प्रचंड आकारमानाच्या किल्ल्याची अजून जास्त चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला हवी असं वाटलं.
इथून मग आमच्या औरंगाबादच्या स्नेह्यांकडे गेलो. तिथे त्यांच्या घरासमोरच रामकृष्ण मिशनचं नवीन झालेलं छान मंदिर बघायला मिळालं.
त्यांच्याइथे थोडी पोटपूजा करून मग मात्र कुठेही न थांबता घर गाठलं.
जास्त वेळ नसल्यामुळे भद्रा मारुती, हिरण्य रिसॉर्ट वगैरे राहिलं पण जे बघता आलं ते निवांत बघितल्यामुळे छान वाटलं.
सध्या फोनवरून लिहितिये त्यामुळे फोटो नाहीयेत जास्त टाकायला जशी सवड होईल तसे टाकेन.
अशी छोटीशी ट्रिप इथल्या मैत्रिणींच्या सल्ल्यांमुळे छान पार पडली.
प्रतिसादातली पुरवणी माहिती खाली जोडते आहे.
१. कैलास रीझॉर्ट राहायला पण मस्त आहे. कॉटेजेस आणि त्याच्या दारातून लेण्याचा व्ह्यू अशी महान रचना आहे. तेव्हा औरंगाबाद ऐवजी तिथे राहून तिथून आसपासच्या ठिकाणांना भेटी देणं हे करता येऊ शकतं.
२. वेळ कमी असेल तर अजंठा आणि पैठण नक्कीच लांब पडेल..
म्हैसमाळ जमलं तर करू शकता (हिलस्टेशन टाइप आहे) पावसाळ्यात खूप छान दिसतं आता माहित नाही कसं असेल
माझ्या नणंदेने हुरडा पार्टीसाठी हे रीसॉर्ट सुचवलं होतं - https://www.hiranyaresorts.com/ >>>>> हुरडा पार्टी साठी फारच मस्त जागा आहे. टोटल्ली रिकमंडेड !!! जेवण ही मस्त असतं .. देवगिरीकिल्ल्याच्या जवळ च आहे हे.. नक्की जा
पाणचक्की मध्ये काहीही राहिलं नाहीये आता पहाण्या सारखं
देवगिरी किल्ल्या च्या रस्त्यावर छान पेरू विकायला असतात..
३. नगरमध्ये हुरडा पार्टी करायची असेल तर साईबन चांगले आहे. ही साईटः http://mysaiban.com/index.html