साहित्य : चितळेंच गुलाबजाम मिक्सच पाकीट, डार्क,व्हाइट चॉकलेट बार किंवा चॉकलेट सिरप, जेम्सच पाकीट,बडीशोपच्या गोळ्या,स्प्रिंकलर्स, तळणीसाठी तेल
लेकीला mod चे डोनटस खूप आवडतात, मागे मी पूनमने दिलेल्या रेसिपीने घरी डोनट बनवून बघितलेले आणि ते घरी सगळ्यांना आवडलेले सुद्धा पण त्याच्यासाठी जरा निवांत वेळ हाताशी असावा लागतो म्हणून परत काही मी बनवले नव्हते. काही दिवसांपूर्वी एका कस्काय ग्रुपवर एक फॉरवर्ड जोक आलेला की आपला मेदूवडा तिकडे जाऊन चॉकलेट सिरप मध्ये डुबवून त्यांनी त्याच डोनट अस बारस केलं तेव्हा साधना म्हणाली काहीही. एकवेळ गुलाबजाम आणि डोनटसचा संबंध लावला असता तर चाललं असत कारण चव मिळतीजुळती आहे पाकात न डुबलेल्या गुजाची आणि डोनटची. बस तेव्हापासून डोक्यात होत की गुजा मिक्सचे डोनट्स बनवून बघावेत. लेकीच्या बड्डेच निमित्त गाठून ट्राय केलेच आणि जबरी रिझल्ट मिळाला की राव
लेकीला अजून माहीत नाहीये की आईने चितळेंचे डोनटस खाऊ घातलेत ते:donttell:
जर चॉकलेट बार वापरणार असाल तर चॉकलेट बार डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घ्या ( डार्क आणि व्हाइट वेगवेगळे). आता चितळे गुजा मिक्स परातीत काढून पाण्याने गुजासाठी मळतो तस मळून घ्या आणि तळहातावर जाड पुरी थापून घ्या. जितके डोनटस बनवायचे आहेत तितक्या जाड पुऱ्या बनवून झाल्या की लहान वाटीने किंवा बाटलीच्या झाकणाने मधला गोल कापून घ्या म्हणजे डोनटशेप ईझीली मिळतो. डोनट कटर असेल तर तो वापरा.गुजा मिक्स मळून झाल्यावरच कढईत तेल तापायला घाला आणि मग डोनटस बनवून घ्या. तेल तापलं की गॅस मंद करून डोनटस तळून घ्या. तळताना डोनटस तेलात सोडले की त्याच्यावर वरून झाऱ्याने तेल टाकत रहा म्हणजे डोनटस फुलतात आणि एकदा उलटले की हलके दाबत दाबत डोनटस तळून घ्या म्हणजे डोनटस
छान फुलतील आणि हलके, खुसखुशीत होतील.
आता हे बेसिक डोनटस हव्या असलेल्या सॉसमध्ये डुबवून वरतुन हवे ते स्प्रिंकलर्स, जेम्स/ बडीशोपच्या गोळ्या असल्या मालमसाल्याने सजवा आणि एन्जॉय
मी फक्त घरात असलेल्या डार्क चॉकलेट बारपासून बनवलेल्या सॉसने आणि जेम्सच्या गोळ्यांनी, चॉकलेट scraps आणि सिल्वर स्प्रिंकलर्सने सजवलेले डोनटस पण तुम्ही तुमची सगळी कल्पकता वापरू शकता.
गरम चॉकलेट सॉस वापरल्यामुळे सगळे स्प्रिंकलर्स, चॉकलेट scraps घसरत होते डोनटस वरतुन आणि घरातल्या सर्वच मेंबरांनी डोनटस गार होऊन प्रॉपर सजवून चांगला फुटूबिटू काढून न दिल्यामुळे जो एकुलता एक फोटो काढलाय त्यावरच समाधान माना.