साहित्य:
१ वाटी तांदूळ (कुठलेही)
१ वाटी मूग
पालकाची पाने - मूठभर
मेथीची पाने - मूठभर बारीक चिरून
कांदापात - बारीक चिरून मूठभर
मीठ, हिंग, जिरेपूड, ओवा
कृती
आदल्या रात्री तांदूळ आणि मूग थोड्या कोमट पाण्यात भिजत घालावेत. घरातले मूग संपलेत म्हणून मी मोडाचे मूग वापरले. त्यामुळे सकाळी उठून अर्धातास गरम पाण्यात भिजवले फक्त.
सकाळी उठून मूग, तांदूळ आणि पालक मिक्सरमधून बारीक गंधासारखं वाटून घेतलं.
आपापल्या मगदुराप्रमाणे धिरडी करणार की दोसे यावर ते किती घट्ट वा किती सरसरीत ठेवायचं ते ठरवा. माझी कुवत धिरड्यांपर्यंतच असल्याने मी सरसरीत करून घेतलं. भरपूर पाणी घालून पातळ केलं की लुसलुशीत होतात. (पाणी कमी पडलं तर गिच्च होतात आणि तोठरा बसू शकतो)
त्यात मीठ, हिंग, जिरेपूड आणि थोडा ओवा घातला. त्यातच बारीक चिरून मेथी आणि कांदापात घातली. दहापंधरा मिनिटे ठेवून दिलं.
धिरड्याचं पीठ नेहेमीच पाचेक मिनिटं व्य्वस्थित ढवळून घेते मी. म्हणजे आत सगळीकडे हवा शिरून छान जाळी पडते.
मग नॉनस्टिक तव्यावर एक थेंब तेल सोडून धिरडी घातली
चटणी
भाजलेले दाणे, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि साखर थोडं पाणी घालून मिक्सरमधून गिर्र फिरवून घेतलं. चटणी तयार
अशी ही कर्बोदेके, प्रथिने आणि चोथा उर्फ फायबर्स ने परिपूर्ण असलेली धिरडी चटणी. या बरोबर एक वाटी दही खाल्लं की आणखी कॅल्शियम आणि इतर पौष्टिक घटकांची पण सोय होईलच.
लहान मुलांना मस्त साजूक तूप लावून खायला घाला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण खा - फार चविष्ट लागतं ते प्रकरण.
उत्साही सुगरण मंडळींनी हिरव्या भाज्यांऐवजी गाजर-टोमॅटो, बीट, भोपळा-पिवळा बेलपेपर-हळद इत्यादी घटक पदार्थ बदलून विविध रंगांची वेगवेगळी किंवा एकत्र रंगीबेरंगी धिरडी आणि मॅचिंग रंगीत चटण्या करा. हाकानाका. :)