ह्या गोट्याच तयार पीठही मिळत म्हणे. पण मागच्या वर्षी अहमदाबादला गेलो होतो तेव्हा काकुने हे गोटे केले होते घरी तयार पीठ न वापरता. घरी आल्यावर दोन तीनदा केले पण पाककृती लिहायची राहूनच गेली. काल एका गटग करता केले त्यांनाही खूप आवडले. त्यांनीही कृती विचारल्यावर इथे टाकायची आठवण झाली. सध्या बाजारात भरपूर मेथी आहे. काकुने सांगितलेली व मी कृतीत आणलेलीच कृती देतेय.
साहित्य : दोन वाट्या रवाळ कणिक, दोन चमचे बेसन, दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी, दोन चमचे दही, धणे व मिरे एक चमचा भरड, मीठ, हिरवी मिरची व साखर चवीनुसार. हळद शास्त्रापुरती, चिमुटभर सोडा. तळणासाठी तेल.
कृती: सोडा सोडून सगळे साहित्य एकत्र कालवून गरजेनुसार ( जरा कमीच) पाणी घालावे. मेथीला पाणी सुटतं. दहा मिनीटं मुरू द्यावं. गरज वाटली तर अजून पाणी घालावे. भज्यांच्या पीठाची कन्सिस्टंसी हवी. सोडा घालून गोल गोल भजी गरम तेलात सोडावी. मध्यम आचेवर तळावी.