पुण्यनगरी पुणे:
पुण्याचं नाव घेताच आपल्याला आठवतात त्या पुणेरी पाट्या, पुणेरी बाणा आणि पुण्यावर सर्रास केले जाणारे विनोद! अशा या पुण्यात राहून पुणेकर होऊन तिथे महिनाभर राहण्याची संधी मिळाली आणि वेगळेच पुणेकर उलगडत गेले. फिरायला जाताना पत्ता विचारला तर कोणी उगाच चुकीचे पत्ते सांगून फिरवलं नाही, सन्माननीय अपवाद वगळता रिक्षावाले पण योग्य रस्त्याने नेत होते! एकदाच एका रिक्षावाल्याने म्हात्रे पुलावर मोठा अपघात झालाय आणि रस्ता बंद असल्याचे सांगत सारसबाग, शनिवार वाड्याकडून पुणे दर्शन करून आणले... आता अशा एखाद्या रिक्षावाल्यासाठी सगळ्या पुणेकरांना बोल लावण्याएव्हढे आम्ही कोकणी लोक काही कोत्या मनोवृत्तीचे नक्कीच नव्हेत.
आमच्या पोरी बाळींना पुणेकर नवरा आवडला तर उगाच नंतर हा लेख वाचून त्यांना त्रास नको... हा भविष्याचा विचार आहेच हो! खाण्याची विविधता, मजा तर पुण्यात पाहिली मी! अगदी गल्लोगल्ली स्वच्छ चांगली ठिकाणं, तिथले स्पेशालिटी असलेले पदार्थ.. म्हणजे मी फार काही चाखले नाहीत कारण त्यासाठी असलेल्या रांगेत उभं राहून पाय दुखण्यापेक्षा आपलं घरीच करून खाणं सोपं वाटलं मला!
खरवसा सारखा पदार्थ सुद्धा बारा महिने कसा उपलब्ध होतो अशा काही बाळबोध शंका आल्या मनात...पण असेल बा मिळत म्हणून फार काही ताण दिला नाही.
सारसबाग मी पहिल्यांदाच पाहिली...तिथल्या गणपतीचे स्वेटर घातलेले फोटो पाहून खूपच उत्सुकता होती. सारसबागेच्या परिसराने मात्र नाराज केलं... सगळीकडे, घाण, कागद, भेळेचा कचरा प्लॅस्टिक बाटल्या याचंच साम्राज्य होतं! तळ्यात तर कमळं कमी आणि प्लॅस्टिक बाटल्याच जास्त उगवलेल्या दिसल्या. असो. तळजाईच्या डोंगरावर दोनदा जाण्याचा योग आला. तिथे मात्र पुणे पोलिसांचा खूप चांगला अनुभव आला. मी आणि माझी मुंबईची जाऊ तळजाईच्या डोंगरावर गेलो खरे पण येताना एकही रिक्षा मिळेना. एवढं उतरून जाणं मला शक्यच नव्हतं.. समोर पोलिसांची गाडी उभी होती. जावेने त्याना
रिक्षा थांबवण्याची विनंती केली तर इथे रिक्षा मिळणार नाही ताई... तुम्हाला आम्ही सोडतो खाली...असं म्हणत आम्हाला दोघींना सरकारी गाडीने व्यवस्थित आणून सोडलं! त्यानंतर सुगड गरम करून त्याच्या भाजक्या स्वादाचा तंदुरी चहा दुप्पट दर असला तरीही पिऊन पाहिला आणि व्हिडीओ करून तो सगळ्यांना पाठवूनही झाला.
पुण्यात राहिलीस आणि सुजाता मस्तानी चाखली नाहीस असं कोणी विचारू नये म्हणून भरपूर थंडीत सुद्धा कुडकुडत मस्तानी चाखली! पुण्याच्या अनेक मैत्रीणींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली, खूप नवीन मैत्रिणी मिळाल्या. कधीही वाटलं तर बिनधास्त माझ्याकडे ये रहायला.. असं आमंत्रणही मिळालं. तात्पर्य असं की आता माझं ऐकीव माहितीवर आधारीत झालेलं ठाम मत बदलुन मतपरिवर्तन झालेलं आहे! इतकंही काही वाईट नाही हो पुणे... एकदा अनुभव घेऊन आपलं मत सांगा!
मिनल सरदेशपांडे