साहित्य :
१) ५ कोबीची अख्खी कोवळी पाने
२) फ्रिजमधे असतील त्या भाज्या (अंदाजे १ ते १ १/२ वाट्या). मी गाजर, कांदा, ढब्बू मिरची, मटार(शिजवून) या घेतल्या
३) १ क्युब चीज किसून
४) लोणी/ तेल -२-३ चमचे
५) मीठ
६) मिरपूड/ तिखट/ चिली फ्लेक्स
कृती :
१) लोण्यावर/ तेलावर भाज्या जराशा परता. मीठ, तिखट घाला. चीज घालायचे लक्षात ठेवून मीठ बेतात घाला.
२) किसलेले चीज घालून नीट मिसळून घ्या.
३) कोबीच्या पानात हे मिश्रण भरून पान टूथपिक किंवा लवंग टोचून बंद करा. असे सर्व पानांत मिश्रण भरा.
४) मोदकाप्रमाणे वाफेवर १५ मिनिटे उकडून घ्या
हे वाफवण्याआधी
हे तयार
करताना जाणवले की ह्याच्या सारणाची असंख्य वेरिएशन्स करता येतील
१) पास्ता चवीच्या भाज्या
२) मटार करंजीचे मंजूडी पद्धतीचे सारण, किंवा मटार, बटाटा, आल, खोबरं सारण
३) मोमोज चे सारण
४) नॉन वेज सारण/ खिमा इ.
कोबी जून असेल तर शिजल्यावर चिवट होतो. त्याला पर्याय असेल तर सुचवा तुम्हीच! लेट्युसची पाने चालतील बहुतेक
कुठेतरी तत्सम काही कृती २ वर्षांपूर्वी वाचली होती ती आठवून आणि सोपी करून मागच्या वर्षी घडवली पण लेकाने काही आल्हाददायक फीडबॅक न दिल्याने परत केलीच नव्हती. मागच्या आठवड्यात त्याने मला आठवण करून दिली आणि परत कर म्हणून सांगितले.