साहित्यः
१ कप सूर्यफुलाच्या बिया
१ कप जवस
१ कप तीळ
१ कप सुकं खोबरं
१/२ कप गूळ
दहा-बारा खजूर
दहा-बारा जर्दाळू
दहा-बारा अंजीर
दहा-बारा मनुका/बेदाणे/किसमिस
कृती:
सूर्यफुलाच्या बिया, जवस, तीळ, सुकं खोबरं सगळं वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मधून एकत्र बारीक करून बाजूला काढून घ्या.
खजूर, जर्दाळू, अंजीर सगळ्याचे तुकडे करून तेही गूळासोबत मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
हे सगळं नीट मिसळून घ्या आणि लगेच लाडू वळा. गरज पडल्यास तुपाचा हात लावू शकता.
हे प्रमाण अगदी काटेकोर पाळले नाही तरी चालतं, एखाद-दोन घटक कमी जास्त/नसले तरी चालतं. मुख्य काही कोरडे घटक आणि काही अंजीर-खजूर असे ओलसर आणि गोडवा देणारे घटक यांचं साधारण गुणोत्तर जमायला हवं. या प्रमाणात मध्यम आकाराचे अठरा ते वीस लाडू झाले.
यात जवस्/तीळ/सुर्यफुलाच्या बिया याऐवजी दाणे, काजू, अक्रोड हे सुके घटक वापरून पूर्वी लाडू केले होते, पण ते अजूनच हेवी होतात. यावेळी घरात हे बाकीचं साहित्य होतं म्हणून प्रयोग केला. लेकाला गूळ-तूप पोळी कुस्करून खूप आवडते, त्यात पोळीसोबत गुळाऐवजी हा एक लाडू घातला की तेवढेच थंडीचे बाकीचे घटक पोटात जातात याचं समाधान आणि जास्त पोटभरीचं होतं.
फोटो उद्या टाकते.