आम्ही शेतकरी कामकरी:
कोकणातल्या बहुतेक छोट्या शेतकऱ्यांच्या घरात असायचं तसंच बालपण गेलंय माझं! मातीच्या भिंती, सारवलेल्या जमिनी, गरज असेल तिथे झाप लावून केलेला आडोसा, कौलारू घरं, ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाक घर, बाजूला गोठा! गावाच्या मध्यातून फक्त पावसात भरपूर अगदी दुथडी भरून वाहणारी छोटीशी नदी..नदीच्या दोन्ही बाजूला शेती, त्यापुढे माड पोफळी, घर आणि त्यावर डोंगराकडे आंबे फणस! म्हणजे आताच्या बजेटनुसार पाच एकर च्या आतले तरीही मनाने सधन शेतकऱ्याच्या घरात जन्मले हे माझं भाग्य!
आमच्या शेतात उपळ आहे त्यामुळे पावसाळा भर कुठेही जायचं तर गुडघाभर पाणी असायचंच. पाणी थोडं कमी झालं की हे उपळीचे झरे मस्त दिसायचे. अक्षय्य तृतीयेला घराभोवती लावलेले भोपळे, काकडी, चिबुड, पडवळ, दुधी यांचे वेल पावसात हळूहळू वाढायला लागायचे. शेतात दाढ(भाताची रोपं) पेरून झाली की ती काढण्या पासून आमची लुडबुड सुरू व्हायची. दाढ काढून त्याचे मूठ बांधून मागे टाकत जायचे. आम्ही मुलं ते गोळा करून एकत्र करत असू. तोपर्यंत धो धो पाऊस सुरू असायचाच. शाळेत पंधरा दिवस सुट्टी असायची लावणीची... गुडघाभर चिखलात पाय रुतवत नांगराच्या मागे जायचं..बैलांना पण कळायचं बहुतेक नांगर कोणी धरलाय. ..असे पळायचे की धावत जावं लागेल! कधी कधी आत्याने पाठवलेले गमबूट आलटून पालटून घालायचे. एका हातात मूठ धरून चार चार काड्या घेऊन भात लावत मागे मागे यायचं. चिखलात रुतलेला पाय मागे घेत जायला मज्जा यायची. लावणीच्या वेळी मुलींना पण हाफ पॅन्ट घालायला मिळायच्या.. त्याचाच कोण आनंद! लावणी झाल्यावर आई मस्त भाकरी करायची... अगदी नांगरणारा सुद्धा आमच्याकडेच जेवायचा. एक बैल घरचा आणि दुसरा बदलीवर आणायचा.. त्याला लागेल तेव्हा आपल्याकडचा द्यायचा.
पंधरा, वीस कोठीत बघता बघता भात डोलू लागायचं! त्याचे बदलणारे रंग इतके सुंदर असायचे..पोपटी, हिरवा, हळूच डोकावणाऱ्या लोंब्या.. मग पिवळा! मग शेतातील एका कोठीत( मळ्यात) शेणाने सारवून केलेल्या खळ्यात भात झोडणी करायची, मोठ्या लाकडी ओंडक्यावर! गोल फिरवून त्या पेंढ्या धोपटायला मजा यायची. भाताचं कोठार, कणग्या भाताने आणि आता वर्षभर बघायला नको म्हणून आमची मनं आनंदाने भरून जायची! त्यानंतर मुगवणी! म्हणजे आत्ताच्या भाषेत पार्टी परंतु पार्टीला काय तर घाटलं, तांदळाची भाकरी आणि हरभऱ्याची उसळ! माझे बाबा ही उसळ मस्त करायचे... खाताना नाका..डोळ्यातून पाणी यायचं... तरीही उसळ खायचीच!
भात काढलं की मुळा, लाल माठ, अलकोल हे मिरच्यांच्या मध्ये पेरायचं. मध्ये शिंपण्यासाठी सरळ पाट, गोल, परत सरळ.. त्या पाटाच्या कडेला धने.. कोठीच्या कडेने वाली, गवार, भेंडे! उन्हाच्या कवडश्यावर सकाळी लाकडी शिंपण्याने पाणी शिंपायचं! मधेच चुकून पडलेली एखादी बडीशेप ...त्याचे गोड तुरे, कोवळे मुळे, वालीच्या शेंगा खात खात पाटात सतत पाय धुवायचे...परत मातीत लाल व्हायचे! कुळीथ, पावटे, कधी शेंगदाणे, तुरी सगळं असायचं शेतात! हे सगळं त्या पंधरा वीस मळ्यातलं वैभव वर्षभर पुरेल इतकं.. अगदी शेणखतावर वाढलेलं ताजे अन्न मिळायचं विकायला नाही पण स्वतः साठी भरपूर व्हायची भाजी! हे सम्पतेय तोवर दारातली चिंच पोत्याने चिंचा द्यायची! त्या निवडायच्या, सोलायच्या, काटळायच्या, मीठ लावून गोळे बांधायचे! तोपर्यंत आंबे, फणस, रातांबे, तोरणं, करवंद यायचेच! एक पीक दुसऱ्या पिकाला खो देत पुढे पुढे येत रहायचं.. धरणी आई सेवा करणाऱ्या आपल्या बाळांना काही कमी पडू द्यायची नाही...की आमचा आनंदच छोट्या गोष्टीत होता कोण जाणे!
निसर्ग चहुबाजूने साथ द्यायला उभा होता त्यामुळे कुठल्या योजना मिळाल्या नाहीत म्हणून वेगळा विचार मनात यायला वेळच नव्हता शेतकऱ्याला. देणाऱ्याने देत जावे.. तसं तृप्त बालपण दिलं या कोकणाने... लाल मातीचे ऋणानुबंध शब्दात बांधणं कठीण आहे ते आठवणीतच राहु द्यायचे... बकुळीच्या सुगंधासारखे!
मिनल सरदेशपांडे