जागतिक कर्करोग दिवस:
आज 4 फ्रेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून थोडंसं... आज जवळपास दहा घरांमागे एका घरी याचे पेशन्ट आढळतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते आहे. बऱ्याच वेळा त्याची कोणतीच लक्षणे आढळत नाहीत त्यामुळे समजेपर्यंत फार उशीर होतो.
स्त्रियांच्या बाबतीत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात त्या म्हणजे घरातल्या असंख्य गोष्टी जसे की सणवार, परीक्षा, लग्नकार्य या सर्वात त्या आपला त्रास लपवतात. हे झालं की तपासू, ती परीक्षा होऊ दे, किती सारखं बारीक बारीक गोष्टी डॉक्टरांना दाखवत राहणार अशा अनेक सबबी सांगितल्या जातात. ज्याला आपण आपला जोडीदार मानतो त्याच्याच पासून होणारे त्रास सांगायची लाज वाटते म्हणून ते लपवून ठेवणं अशा गोष्टी आजही घडताना दिसतात.
मैत्रिणींनो, मला एक गोष्ट सांगा आपण ठणठणीत तर सगळं छान.. मग स्वतःकडे इतकं दुर्लक्ष कशाला? आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवा, थोडासा जरी फरक जाणवला तरी तज्ञांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, सल्ला फक्त तज्ञांचाच घ्या, आमच्यावेळी नव्हते सारखे डॉक्टर लागत... तिला पण अशीच गाठ होती पण फायब्रॉइड्स होत्या... लगेच कशाला जायला हवंय... अमुक एक जडिबुटी देऊन बरं करतो या आणि अशा सल्ल्यांपासून दूर रहा!
सल्ला देणारे नंतर आपले त्रास भोगायला येणार नाहीत.
आपल्या दुर्दैवाने जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर त्यावर लगेच उपचार सुरू करा. आज जवळपास सगळ्या प्रकारचे कॅन्सर १००% बरे होतात. फक्त त्यासाठी रुग्णाची त्याकडे पहायची सकारात्मकता मोठा हातभार लावते. मला काहीही होणार नाही, मी पूर्ण पणे यातून बाहेर पडेन असा ठाम विश्वास असू द्या... आपल्या मनाला आवडत्या गोष्टीत गुंतवा.. लक्षात ठेवा उद्याची सुंदर सकाळ तुमची वाट पहात आहे!
काही महत्त्वाच्या सूचना:
१)रुग्णाला भेटायला जाणाऱ्या माणसाने चुकीचे सल्ले देऊ नयेत.
२) आपल्या नातेवाईकांपैकी कोणी या आजाराने गेलं असेल तर त्याचे वर्णन रुग्णासमोर करू नका. अशा गोष्टींमुळे रुग्णाची आधीच नाजूक असलेली मानसिक स्थिती ढासळू शकते.
३) आपल्याला सोशल मीडिया वरून मिळणाऱ्या अगाध ज्ञानाचा प्रयोग अशा रुग्णावर करू नका, लक्षात ठेवा आपण तज्ञ नाही.
४)रुग्ण पूर्ण बरा होऊन त्याच्या रुटीन मध्ये स्वतः चे दुःख विसरू पाहत असेल तर हा तो कॅन्सर पेशन्ट असं त्याला डिवचून परत आठवण करून देऊ नका.
५) रुग्णाला शक्य असेल तर बहुमूल्य वेळ द्या, त्याला त्यातून बाहेर पडायला मदत करा.
एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेवा.... प्राप्त परिस्थितीला सामोरं जर आपल्यालाच जायचंय... तर रडत कशाला... हसत सामोरं जाऊया!
हे सगळे अनुभवाचे बोल आहेत... आजच्या दिवशी सर्वांशी शेअर करतेय...
आपणही सुखाचं आयुष्य जगा आणि इतरांनाही जगू द्या!
मिनल सरदेशपांडे