हवाई- भाग ८ - मॅजिक सँड बीच आणी माऊली बीच

सकाळी उठल्या उठल्या प्रथम जाणवले ते म्हणजे आता तीनच दिवस राहिले. मेक द बेस्ट ऑफ द टाईम लेफ्ट असे म्हणुन नवरयाला, मुलाला पांघरुणाच्या बाहेर काढले. लोळणे हाच खरा बेस्ट टाईम खरं म्हणजे, शिवाय रोज मीच शेवटी उठायचे. पण आज माझ्या अंगात शिस्त संचारलेली. तरी बरे, हॉटेल अॅक्टिवीटीजमध्ये ५.३० चा एक सनराइझ वॉक होता आणी आम्ही तो ८ दिवसात एकदाही करु शकलो नव्हतो :P सन पार पडद्यातुन आत डोकावु लागल्यावर आम्ही उठणार. आजही तेच झालेले. आवरुन नाश्ता करायला गेलो. तेथे रोज लहान चिमण्यांसारखे पक्षी दिसायचे. टेबलावर राहिलेले अन्नकण वेचुन खायला पक्षी नंबर लावुनच बसलेले असायचे आणि काय वाट्टेल ते खायचे. एकदा चोच बुडवुन ऑरेंज ज्युस पिणारी चिमणीही पाहिली. हॉटेलच्या बाहेर पडेतो १०/१०.३० वाजलेले. बीचची ड्राइव्ह तासाभराची होती. पार्किंगपर्यंत चालत जाताना एक आजोबाआजी तणतणताना दिसले. आजोबांच्या हातात गाडीची चावी होती आणि ते ओरडुन आजीला म्हणाले "स्टॉप युअर ड्रामा, आय एम गोइंग"आणि पार्किंगकडे चालु लागले. आम्हाला अगदी कानकोंडे झाले आणि वाईटही वाटले. हवाईत येऊन भांडायचे नाही हा आपला नियम सांगु या का ह्यांना असे मी नवरयाला विचारले पण वाघ मागे लागल्यासारखा तो पुढे पळत सुटला. त्याला अशा सोशल सिच्युअशन्सचे प्रेशर येते. मुलगा भोचक नजरेने वळुन वळुन आजींना पाहत होता त्याचे मुंडके सरळ केले आणि वळुन, पापण्या मिटुन आजींना एक दिलासादायक प्रेमळ हसु द्यायचा प्रयत्न केला. पण त्या आजोबा गेले त्या दिशेला नाक उडवत तुरुतुरु लॉबीकडे वळल्या.

मस्टँगचे टॉप उघडे ठेवायचे की बंद यावर रोज आम्ही वाद घालायचो. या दोघांना ते उघडे हवे असायचे आणि मला बंद. केस भुरभुरीत व्हायचे वारयाने. पण बाहेरची शुद्द मोकळी हवाही हवी असायची. मग, जाऊदे, नाहीतरी समुद्राच्या पाण्याने रोजच केस भिजत होते आणि धुवावे लागत होते त्यामुळे मी आज काँप्रो केला आणि मग दिवसभर रेहमान हेअरस्टाईलने फिरले. ते पुढे फोटोत दिसेलच.

मॅजिक सँड बीच हा 'कोना' परिसरात आहे आणि सर्फिंगसाठी अतिशय प्रसिद्द आहे. एकेक लाट अशी येते की ज्यावर स्वार होणे म्हणजे अट्टल सर्फर्सना चांगलेच चॅलेंज वाटावे. माझ्यासारख्या नॉन्स्विमर्सनी मात्र लाट आली की तिच्याकडे बुड करुन उभे रहावे आणी तिने गिळंकृत केल्यावर श्वास रोखुन आधी शिर्षासन आणि मग हळुहळु अर्धबुडासन, गटांगळासन, तरंगासन असे करत करत पाय जमिनीला टेकवावेत. हे सर्व करताना श्वास घेतलातच तर मग फुकटात समुद्रपाण्याने 'नेती' केली असे म्हणावे. आपलीच मंडळी आपल्यालाच हसत असतील तर त्यांच्यापासुन दुर जाउन आपला सराव चालु ठेवावा. बीचवर जायच्या आधी कोना परिसरात थोडे शॉपिंग आणि खादाडी केली. एका ठिकाणी बरेच फुड ट्रक्स दिसले म्हणुन पहायला गेलो तर चक्क डोसाईडलीचा ट्रक दिसला. मुळची केरळमधली फॅमिली तो ट्रक चालवत होती. त्यांच्याकडे बिर्याणी, लस्सी, कॉफीही होती. मसाला डोश्याचा पहिला घास घेतला आणि मला कळले की भाजी आंबलेय. लगेच त्या बाईला मी सागितले तर ती मला सॉरी न म्हणता दुसरी भाजी देते म्हणाली. पण तोंडाची चव गेली ती गेलीच. बाजुला एक अमेरिकन कपलही खात होते. मी त्या बाईला म्हंटले, त्यांना दे नवीन भाजी नाहीतर आपण भारतीय अशाच भाज्या खातो असे वाटेल त्यांना. शिवाय पोट बिघडेल ते वेगळेच. यावर त्या बाईने मला निर्विकार लुक दिला. आम्ही तोंडाची चव घालवुन तेथुन निघालो आणि दुसट्या ट्रकवर चीजकेक खाल्ला.

बीचचा रस्ता धरला आणि मुलाने निर्वाणीचे म्हणुन परत मला विचारले तु खरंच आता तो कॉस्चुम घालणार? म्हंटले, होच. बीचवर स्वच्छ चेंजिंग रुम होती तेथे गेले तर एक भारतीय बाई तिच्या १०/१२ वर्षांच्या मुलीबरोबर कपडे बदलत होती. सुके कपडे आणि ओले केस पाहुन कळले की यांचे खेळुन झालेय. मी घातलेल्या कॉस्चुमला दाद देणारया या दोघीच पहिल्या. तिच्या मुलीला तर फारच आवडली ब्रा. तिने विचारले या खरया नारळाच्या आहेत का? म्हंटले, कल्पना नाही कारण वरती फिनिशिंग तर पेंटचे वाटत होते. त्या बाईने कुठे मिळेल, कसे मिळेल चौकशी केली. मी म्हंटले तिला, घेच तु पण आणि घालच. नाहीतरी आपण इतर कुठे आणि केव्हा घालणार असे आचरट प्रकार? त्या दोघींनी नाड्या बांधुन द्यायला मदत केली आणि गेल्या बाय करुन. मी चेंजिंग रुमच्या बाहेर आले तर नवरा कॅमेरा घेऊन उभा आणि मुलगा बुबळं पार पापणीला टेकवुन म्हणे ऑलराइट ऑलराईट, तु मोआना अजिबातच दिसत नाहीएस. पण मला नवरयाची कॉम्प्लिमेंट पुरे होती. त्याने वेगवेगळ्या अँगलने ५० एक फोटो काढले. ते कमेंट्समध्ये. मुलगा पार लाजेने चुर चुर होउ नये म्हणुन नंतर मी वरुन एक कापडाची चोळी घातली आणि मगच पाण्यात शिरले. अहाहा, काय मोकळे मोकळे वाटले, गार गार पाणी आणि त्यामुळे भिजुन अंगाला चिकटलेले स्कर्टचे गवत. अरे कर्मा, त्या गवताचा रंग समुद्राच्या पाण्याने जाऊ लागला आणि १५/२० मिनिटांतच मी चार्‍याचा स्कर्ट घातलाय असे दिसु लागले. आता मुलगा मनापासुन दात काढुलागला आणि फजिती नको म्हणुन मी चेंजिंग रुममध्ये जाऊन प्रॉपर बीचवेअर घालुन आले. मग परत थोडे फोटो काढले.

या बीचचे पाणी अगदी निळेशार दिसते. खालची वाळू पांढरीशुभ्र आहे, अगदी मऊ मुलायम. सर्फिंग, स्नोर्कलिंगला उत्तम क्लॅरिटी.
DSC_0632.JPG

आंघोळी करुन बीचवरुन निघेपर्यंत ४ वाजलेले. पोटपुजा करायला 'कोना' टाउनमध्ये गेलो. जेवणाबरोबर अननसातली टकिला प्यायलो.
IMG_3452.jpg
मी मिळेल तेथे फुलांच्या माळा विकत घेउन गळ्यात घालायचे. ही माळ लाल आणि पिवळ्या चाफ्यांची आहे. असला घमघमाट यायचा, मस्त धुंद वाटायचे. शेवटच्या दिवशी विकत घेतलेली माळ मी पार घरापर्यंत आणलेली. विमानात जाताना नाही पण येताना घालुनच बसले आणि आणली घरी.

एका नर्सरीत जाउन झाडे विमानातुन कशी न्यायची, कुठली न्यायची वगैरे चौकशी केली आणि शेवटच्या दिवशी येउन घेउन जाईन म्हणुन सांगोतले. एक बिअर ब्रुअरी दिसली आणि नवर्‍याला आत जायचा मोह आवरेना. मग त्याला एकट्यालाच पाठवुन मी जवळच्या एका हॉटेलच्या बीचवर जाऊन बसले. तेथे अशा मस्त झोपड्या होत्या.
IMG_4179.JPG

मुलाला काही मित्र मिळाले बीचवर फुटबॉल खेळायला. मी त्यांच्याकडे नजर ठेवत अनवाणी चालुन घेतले. एके ठिकाणी दगडावर या बाया पळताना दिसल्या. चिंबोरीचे कालवण आठवले आणि तोंडाला पाणी सुटले. आता घरी पोचु तेव्हाच पोटात जळजळीत काही पडेल.सगळ्या ट्रीप्समध्ये माझी ही तक्रार असतेच की पुरेसे मसालेदार जेवण मिळत नाही.
IMG_4714.JPG

तासाभराने नवर्‍याला पिक केले आणि आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. एका ठिकाणी आडरस्त्याला बर्‍याच गाड्या वळताना दिसल्या म्हणुन उत्सुकतेने आम्हीही गाडी वळवली आणि तो रस्ता निघाला 'Miloli'i Beach' कडे जाणारा. ह्या बीचचा उच्चार काही आम्हाला कळेना आणि कळला तरी लक्षात राहिना म्हणुन आम्ही आपले त्याला 'माऊली' बीच नाव ठेवले.

येथेही छान चेंजिंग रुम्स होत्या पण अजुबाजुला सगळा गांजाचा वास येत होता. आता कळले की एवढ्या गाड्या इथे का वळत होत्या ते. संध्याकाळ व्हायला आलेली म्हणजे काही लोकांची साधनेची वेळ, ते सगळे अड्डे मांडुन बसलेले 'बम भोले' करत. पण टुरिस्ट्सना कुणाचा काही उपद्रव नाही. बीच अतिशय सुंदर आणी ऐसपैस आहे. मॅजिक सँड बीच छोटा आहे त्या मानाने. पोरगं खेळुन एवढं दमलेलं तरी पाण्यात घुसलं. मी मात्र एका झाडाखाली टॉवेल पसरुन डुलकी काढायचा प्रयत्न केला. ते जमेना म्हणुन मग एक वाळुचा किल्ला बनवायला घेतला. तेही जमेना मग सरळ किल्ल्याला वरुन मोठा खड्डा केला आणि त्यात पाणी भरुन ठेवले. ते हळुहळु झिरपले आणि एक विवर तयार झाले. कौतुकाने त्याचे फोटो काढले आणि परत जरा पडले. गांजाचा वास खुपच येउ लागला तसे तेथुन निघालो. जमले तर उद्यापरवा परत येऊ असे मुलाला समजावले.

आज रात्री मला जेवायची भुक नव्हती म्हणुन फक्त कॉफी प्यायली. जोडीला मोनॅको बिस्कीटे, दिवाळीचा उरलेला चिवडा, चिक्की असं काहीबाही चरत टीव्ही पहात बसले. हे दोघं बाहेर चायनिज का पिझ्झा काहीतरी चरुन आले. मी सगळा सुका खाऊ घरुन घेऊन निघते पण त्याला माझ्याशिवाय कुणी हातही लावत नाही. रात्री मुलगा झोपल्यावर हॉट टबमध्ये जाऊन बसलो. वरती आकाशात असंख्य चांदण्या होत्या आणि फार जवळही भासत होत्या. पाण्याबाहेर जरा जरी अंग काढले तर शिरशिरी येत होती. पुलजवळच्या कबान्यात लोळलो आणि काही गहन चर्चा केल्या. तसे आम्ही एकमेकांना दोन दशके ओळखतो पण काही काही ओळखायच्या राहुन गेलेल्या गोष्टी असतातच. काही विस्मरणात गेलेल्या, किंवा गेल्यात असे आपल्याला वाटणार्‍या पण ऐनवेळी दुसर्‍याच्या बरोबर लक्षात असलेल्या. आणि घर, नोकरीसंसार, मुलंबाळं(बोके) लांब असली कीच डोके हवे तसे चालते बर्‍याचदा. सकाळच्या आजीआजोबांचा किस्सा डोक्यात ताजा होता आणि आमचेही बारके का होईना आपटीबार उडालेच होते हवाईला येउनही. त्या अनुषंगाने काही वर्षानुवर्षे डोक्यात घोळणारे, परत परत उगाळले जाणारे, डोक्यात ठाण मांडुन बसलेले मुद्दे तडीपार केले. हो, आजीबाईंसारखे नाक उडवत जायला आवडेलही मला पण मग संतापाने एकटे गाडी चालवत गेलेल्या आजोबांचे काय? किंवा रागाने गाडी उडवत जोडीदाराला मागे टाकुन जाणे सोप्पे पण अपमान गिळत हॉटेलात एकट्या परतलेल्या आजींचे काय?

उद्या 'हावी विलेज' पहायला जायचे होते. तेथे रिवर राफ्टिंग आणि हॉर्सबॅक रायडिंगचा प्लॅन होता. हे एक छोटेसे गाव आहे आणि पहाच असे हॉटेल स्टाफ ने सुचवले होते. क्रमशः

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle