हे पापलेट अतिशय नाजूकपणे हाताळावं लागतं- करण्यापासून खाण्यापर्यंत. म्हणून याचं नाव अलवार :)
साहित्य
मध्यम आकाराची 2 पापलेटं, आडवा छेट देऊन आणावीत, मागच्या बाजुला छोट्या स्लिटस.
15-20 लसूण पाकळ्या, कोथिंबीर मुठ भरून, खोवलेलं ओलं खोबरं वाटी भरून, मीठ, लिंबू एक मोठं,हळद अर्धा चमचा, दोन मोठे कांदे उभे चिरुन, दोन टॉमेटो दोन भाग करून उभे चिरुन, तेल, बांधण्यासाठी जाडसर ( पुड्याचा) दोरा, फ्रायपॅन विथ लिड, लाकडी कालथा, भातिय/ भातवाढी
कृती
आधी पापलेटं स्वच्छ धुवावीत, पोटाच्या आतले सगळे काढून अगदी स्वच्छ धुवावीत.
मग त्याला अर्धं लिंबू, मीठ, हळद आतून बाहेरून लावून ठेवावं.
खोबरं, कोथिंबीर, लसूण, मीठ सगळे कोरडेच वाटून घ्यावे. छान बारीक चटणी झाली पाहिजे. यात अर्ध लिंबू पिळा, मिक्स करा. आता ही चटणी पापलेटच्या पोटात दाबून भरा.
मासा हलकेच उलटा करून पलिकडच्या छोट्या चिरांमधेही थोडी चटणी भरा. आता जाडसर दोरा घेऊन सगळा मासा क्रॉसमधे बांधून घ्या.
हे सगळे किमान अर्धातास झाकून ठेवा. तेव्हढ्यात फुलक्या करून घ्या.
आता पॅन मधे तेल टाकून कांदा ट्रान्सपरन्ट होईपर्यंत परता. आता त्यात टॉमेटो परता.बारीक गॅस करून झाकण ठेऊन एक वाफ काढा.
झाकण काढा. थोडं पाणी सुटलं असेल ते फ्लेम मोठी करून दोन मिनिटं आटवा. आता कांदाटॉमेटोचे दोन भाग करा, एक ताटलीत काढून घ्या. पॅनमधे अर्धे मिश्रण नीट पसरवा. आता त्यात बांधलेले पापलेट ठेवा. बाजुला काढलेले मिश्रण पापलेटवर पसरा.
झाकण ठेवा.
मंद गॅसवर पाच मिनिटं ठेवा.
झाकण काढून लाकडी कालथ्याने एक पापलेट हलकेच भातीय (भातवाढण्याचा गोलसर कालथा) वर घ्या अन उलटवा. असे करताना मासा मोडता कामा नये. म्हणूनच तो भातियावर घ्यायचा. भातियावर मासा असताना खालचा कांदाटॉमेटो बाजुला करून घ्या. उलटवलेल्या माशावर तो घाला.
आता असेच दुसरा मासाही उलटवून घ्या.
झाकण ठेऊन दोन मिनिटं वाफ काढा.
आता झाकण काढून फ्लेम मोठी करून सुटलेलं पाणी आटवा. पॅन हवं तर नुसतच अलवारपणे हलवा.
आधी कांदाटॉमेटो नीट परतला की फार पाणी सुटत नाही. पण सुटलच तर आटवून घ्या.
गॅस बंद करून एक पापलेट मोठ्या ताटलीत घ्या.
कांदाटॉमेटो जरा बाजुला करून कात्रीने दोरे कापून अलवारपणे काढून घ्या. माशाचेे डोक्याकडे जरा जास्त भाग ठेऊन दोन भाग करा. स्टिलच्या जाड कालथ्याने झटक्यात जोर देऊन माशाचे दोन भाग कराता येतात. आणि एक एक भाग प्रत्येकाला वाढा. सोबत पॅनमधला राहिलेला कांदाटॉमेटोही वाढा. थोडी जास्तीची चटणी पानात वाढा.
खाताना मध्यात आडवा सलग काटा असेल लक्षात ठेवा. मासा, कांदाटॉमेटो, चटणी यांची एकत्र चव अफलातून लागते.
हे सगळच प्रकरण अलवार आहे. करताना आणि खातानाही अतिशय नाजुकपणे हाताळावं लागतं. बहुदा म्हणूनच हॉटेलमधे हा प्रकार मला अजून तरी कुठे दिसला नाही.
खाणारा खवय्या असेल तर आखा मासा वाढायलाही हरकत नाही.
हा नुसता खाल्ला तरी चालतो. हवं तर फुलकी पण सोबत द्या.
(माझंं ताट असल्याने दोरे काढून न टाकताच वाढलेलं)
सर्व्हिंग्ज 4
ही फार वेगळी टेस्ट असल्यानेे डेव्हलप व्हायला वेळ लागतो. तेव्हा सुरुवात चौघात एकाच पापलेट ने करा. नंतर प्रत्येकी एक आखंही खालच