जवस पोटात घालायचे विविध मार्ग शोधताना ही आयडिया सुचली.
लेकीला जवसाची चटणी 'शक्तीची चटणी'नावाने खाऊ घालते. यात पण जवसच असल्याने याचंही नामकरण शक्तीची चिक्की झालंय आता
साहित्य-
एक वाटी खमंग भाजलेले जवस
अर्धी वाटी खमंग भाजलेले तीळ
अर्धी वाटी मगज बी किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही बिया
दोन वाटी गूळ
चमचाभर तूप
जायफळ पावडर (हवी असल्यास)
कृती-
एका कढईत गूळ घाला आणि मंद आचेवर ठेवा. गूळ विरघळेपर्यंत लाटणं, एका वाटीचा तळ आणि ओट्याच्या थोड्या भागाला तूप लावून घ्या. गूळ विरघळला की त्यात सगळे जिन्नस घाला आणि भराभर ढवळा. मिनिटभरातच मिश्रण गोळा होऊ लागेल. कढई खाली उतरवून मिश्रण भराभर तूप लावलेल्या भागावर ओता. वाटी/लाटण्याने पसरवा आणि हव्या त्या जाडीचे करा. सुरीने हव्या त्या आकाराचे तुकडे आखा (लगेच तुकडे करू नका) आणि गार होऊ द्या. गार झाल्यावर मग मस्त तुकडे होतील.
माहितीचा स्रोत – दाण्याची चिक्की आईने शिकवली होती, त्याचं हे मी केलेलं व्हर्जन.