28 जानेवारी पर्यंत सगळं जेवण करणारी, मी बरी होऊन घरी आल्यावर भावाच्या बाईकवरून 15 किमी प्रवास करून मला भेटायला येणारी माझी आई इतक्या झटकन निघून जाईल असं मनातही आलं नव्हतं माझ्या! पण ओवरीज कॅन्सरने घात केला आणि ताप आल्याचं निमित्त होऊन जाग्यावर बसली ती कधीही न उठण्यासाठी... मधल्या काळात ट्रीटमेंट मुळे आमची फारशी भेट होतच नव्हती... आता तर खूप लांबच्या प्रवासाला निघून गेली...
तिच्याबद्दलच्या माझ्या भावना पत्र रुपात...
आई कुणा म्हणू मी......
प्रिय आईस,
बाबांना साथ देण्यासाठी स्वतः अनाथाश्रमातून आलीस आणि इथे स्वतःचं नंदनवन फुलवून आम्हाला पोरकं करून पण अगदी तृप्त मनाने गेलीस! एका माणसासाठी या गावात आलीस... आज जाताना तो माणूस नसला तरीही तुझ्यासाठी अख्खा गाव गोळा झाला. कुठेही नोकरी न करताही आयुष्य भर कोणावरही भार बनून राहणार नाही यासाठी सतत काहीतरी करत राहिलीस. पैश्यांची श्रीमंती नाही पाहिलीस फार पण माणसांची श्रीमंती मात्र आयुष्यभर प्रेमाने जपलीस.
पाठीवर असंलेला प्रेमाचा आश्वासक हात बाजूला होणं खूप एकटं करून जातं, मायेची ऊब कोणत्याही वयात हवीशीच असते. आपल्यासाठीचा हळवा कोपरा... मनाला दिलासा देणारी... उभारी देणारी... पुढे पळताना आपल्या काळजीने वाटेकडे डोळे लावून बसणारी.... आपल्या सुखात आनंद मानणारी एकमेव होतीस तू...आई!काही जागा या कोणी घेण्यासाठी नसतातच त्या जागा तशाच जपायच्या असतात... आठवणींच्या स्वरूपात.. नेहमी.. प्रेरणा देणारा आपला हळवा कोपरा.. त्याला धक्का न देता... पुढे चालत रहायलाच हवं... एवढंच राहतं आमच्या हातात!
जिथे कुठे असशील तिथे सुखात, आनंदात रहा.... मला खात्री आहे... सगळ्यांना प्रेम वाटणाऱ्या प्रेमदूतासाठी खास व्यवस्था असेल गं ...तुझी सतत नवीन प्रयोग करण्याची धडपड तशीच जिवंत राहील...तुझ्या इतकं नाही तरी करत राहीन काहीतरी.....
तुझी मीना
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle