ट्रेन, सुषमा आणि मी यांची गोष्ट

काही लोक असे असतात की ते आपल्या आयुष्यात येण्यापूर्वी सारंकाही सुरळित चालू असतं; आणि यांच्या येण्याने आपल्या आयुष्यात वादळ येतं.. तर माझ्या आयुष्यात ज्यांनी अशी वादळं आणली त्यापैकी एक म्हणजे 'सुषमा'. आता खरंतर तिचं नाव सुषमा नाहीये.. तिचं नाव मला माहितीच नाहीये. इतक्यादा भेटून, मनातल्या भावना शेअर करून सुद्धा एकमेकींची नावं आम्ही कधीच विचारली नाहीत. पण मला का कुणास ठाऊक तिचं नाव 'सुषमा'च असणार असा विश्वास आहे.. आणि माझ्यापुरतं तरी या 'वादळी' बाईचं नाव सुषमाच असणार आहे.

सुषमा मला भेटण्या आधीपासून मी पय्यन्नूर नावाच्या गावाला आठवड्यातून एक दिवस कामानिमित्त प्रवास करायचे, अजूनही करतेय. आठवड्यातल्या या दिवसाचा क्रम साधारणपणे ठरलेलाच असायचा.. पहाटे पाच वीसची पॅसेंजर पकडायची असल्यामुळे चार वीसचा गजर मोबाईलमधे लाऊन झोपी जाणे.. पण पण पण.. 'कॅण्डी क्रश खेळता खेळता आपल्याला झोप लागली, फोन चार्जिंगला न लावल्यामुळे बॅटरी मेली, आणि चार वीस चा गजर न वाजल्यामुळे आपण गाढ झोपून राहिलो, आणि ट्रेन चुकली' असं पेटंट स्वप्न पडून दर अर्ध्या तासाला जाग येणे.. म्हणजे बघा पूर्वी कसे थेटरात एकाच पिक्चरचे बारा ते तीन, तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बारा शो असायचे, तसा हा एकच स्वप्नरूपी पिक्चर माझ्या मनःपटल का काय, त्यावर रात्रभर चालू असतो, पय्यन्नूरच्या प्रत्येक आदल्या रात्री! असो तर झोप न झालेल्या अवस्थेत बळेच पहाटे उठून आवरून स्टेशनवर पोचणे, आणि तिसर्या फलाटावर दोन वेगवेगळ्या गाड्या असतात त्यातली फलाटाच्या उजव्या बाजूच्या गाडीच्या सर्वात शेवटच्या (फक्त स्र्तियांसाठी) डब्यात चढणे. स्रियांच्या डब्यात बरेचदा मी आणि एखाददुसरी लेडी पॅसेंजर किंवा कधी मी एकटीच.. जागाच जागा! तिथे पूर्ण बाकड्यावर कब्जा करून बाकायदा पांघरूण बिंघरूण घेऊन पय्यन्नूर येईपर्यंत ढाराढूर झोप काढणे आणि मस्त फ्रेश होऊन कामाला लागणे.. असा माझा खूपच छान दिनक्रम असायचा.

पण मग माझ्या आयुष्यात 'सुषमा' आली.. आमची पहिली भेट खरंतर काहीच अर्थपूर्ण नव्हती कारण ती माझ्याशी काय बोलली त्याचा अर्थच मला कळला नव्हता. माझ्या बाकड्याजवळ येऊन ती मल्याळम मधे काहीतरी बडबडली, पण मी 'मल्याळम अरिइल्या' असं उत्तर दिल्यावर तिनी डब्याची दारं आतून कडी लाऊन बंद करून घेतली. मीही फारसं लक्ष न देता ताणून दिली.. पुढच्या आठवड्यात परत ती भेटली. यावेळी मात्र आम्हला दोघींनाही कन्नड येतं असा आम्हाला शोध लागला, आणि आमचं बोलणं सुरू झालं.. हा शोध नसता लागला तर आजही माझा मंगलोर पय्यन्नूर प्रवास पूर्वी प्रमाणेच सुखावह राहिला असता, पण दैवाला ते मंजूर नव्हतं. यावेळी सुषमानी माझी झोप अक्षरशः उडवून लावली.
सुषमा: "मी रोज या पॅसेंजर ने प्रवास करते."
मी: " हो का?"
सुषमा:  "पहाटे पाचला मंगलोरमधे लेडीज मधे चढणारं कुणीच नसतं. मग मला खूप भिती वाटते."
मी: "भिती?"
सुषमा: "मी सगळे बाथरूम आल्या आल्या चेक करते. मग सगळ्या बाकड्यां खाली वाकून कोणी नाही ना ते बघते. मग चारही दारं आतून कडी लाऊन बंद करून टाकते आणि मग जिथे चेन आहे अशा कंपार्टमेंट मधेच बसते. पुढची स्टेशनं आली की बायका चढताना दार उघडते. मग एकदा का पुरेश्या बायका आल्या की निर्धास्त बसते. हा डबा एक्कट असतो, पुढच्या डब्यांशी आतून कनेक्शन नाही. कुणी आलं अंगावर तर एकट्या दुकट्या बाईला काहीच करता येणार नाही"
मी: (अवाक होऊन) "हं.."
मग ती चेन असलेल्या कंपार्टमेंट मधे निघून गेली आणि आपल्याला अशी भिती कधीच का वाटली नाही, असा विचार करता करता माझा (रात्रभरच्या जागरणाने जड झालेला) डोळा लागला. पण छे:! रात्री सारखे तीन से छे, छे से नौ अन् नौ से बारा शो डोक्यात चालू झाले.. पण यांच्या ष्टोर्या वेगवेगळ्या होत्या. एका ष्टोरीत एक माणूस माझ्या कंपार्टमेंटात येऊन खेटून बसायला लागला आणि दचकून जाग आली, पुढच्या स्वप्नात मधेच अरबी वेष केलेली रिसेप्शनिस्ट बघून दचकून जाग आली (हिचा काय संबंध??); मग पय्यन्नूरला मला जाग न आल्याने मी पुढे कण्णूरला निघून गेले म्हणून दचकून जाग आली, मग कण्णूरहून परत पय्यन्नूरला विमान निघालं होतं (म्हणे!). विमानतळावर पोचेपर्यंत ते हललं होतं.. मग त्याला चिकटलेल्या जिन्यावर लटकून निघाले, पण मधेच पडायला लागले म्हणून दचकून जाग आली. शेवटी हतबल होऊन पय्यन्नूर येईपर्यंत जागीच राहिले..

यानंतरच्या प्रत्येक पय्यन्नूर प्रवासात मला सुषमा भेटली. मी दरवेळी तिची वाट पाहू लागले.  ती आली की ओळखीचं एक हसू दोघींच्याही चेहर्यावर तरळू लागे. दोघींच्याही भुवया आपोआप वर उडून त्यांना झालेला आनंद व्यक्त करत. बरेचदा तर संपूर्ण बोगीत आम्ही दोघीच असू. आम्ही दोघी कधीही एकाच कंपार्टमेंट मधे बसलो नाही. पण एकमेकींच्या 'असण्याची' दिलासा देणारी अव्यक्त जाणीव मला होती तशी तिलाही होती. तिच्या येण्या आधी या जणिवेची गरजच मला भासली नव्हती. तिच्या संसर्गजन्य भितीपायी माझी झोप उडाली.. पण ती शक्य असतील तेवढ्या सगळ्या सावधगिर्या बाळगत असल्यामुळे मला सुरक्षितही वाटत होतं.

अशातच आजचा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे काल रात्री झोप नीट नाही. आवरून निघाले तर बिल्डिंग चं फाटक उघडायचं सोडून सिक्युरिटी गार्ड गाडीकडे बघतच बसला. मग हाॅर्न वाजवून त्याला शुद्धीवर आणल्यावर एखाद्या नववधूला शोभेल अशा संथ गतीने लाजत मुरडत फाटक उघडायला गेला.. मी आपलं 'सकाळी सकाळी चिडचिड नको', असं स्वतःलाच समजावलं आणि तोंडात आलेले अपशब्द गिळून टाकले.

मग तिकिट खिडकीवर एक जण रांग तोडून मधे घुसला. आता मात्र गिळलेले अपशब्द आलेच बाहेर.. या सगळ्यामुळे अंमळ उशिरच झाला होता. एंव्हाना सुषमा आलेली असणार.. मी सवयीनी तिसर्या प्लॅटफाॅर्मच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीच्या शेवटच्या बोगीत चढले. ही बोगी नेहमीपेक्षा जरा वेगळी होती. मोठी होती, नेहमीच्या चार दारांऐवजी हिला मधेही दोन दारं म्हणजे सहा दारं होती. पण ती पुढच्या बोगीला आतून जोडलेली नव्हती. माझी नजर सुषमाला शोधत होती. पण ती कुठेही नव्हती. येईल इतक्यात म्हणून मी एका बाकड्यावर बसले.. पण गाडी हलली तरी हिचा पत्ताच नाही. म्हणजे आता आली का पंचईत?! आता सुषमाचं काम (जे मी आजपर्यंत कधीही करायचे कष्ट घेतले नव्हते) मलाच करावं लागणार.. गाडी सुरू झाल्यानंतर बाथरूम चेक करण्यात काय पाॅइंट? तिथे समजा कोणी असलं तरी आता काय उपयोग होता?? पण तरी सुषमाच्या प्रोटोकॉल ला जागून मी बाथरूमची दारं उघडली. तिथे घाणेरडा वास सोडून कोणीच नव्हतं. मग मी सगळी दारं लावायला गेले. पण दारं लावली तर आपल्याला दर स्टेशनाला उठून उघडत बसावं लागेल. म्हणजे झोप लागत नसली तरी मी आडवी पडणार होते बाकावर. मग भिती आणि आळस अशा दोन रिपूंनी मनातल्या मनात युद्ध करून घेतलं. त्यात भितीचा विजय झाला. पण प्रत्यक्षात सहापैकी दोन दारांची कडी लागतच नव्हती. बोगीतून फिरताना आपसूकच माझी नजर बाकांखाली जात होती. न लागणार्या दारातून कोणी चढलं तर आपल्याला कळावं म्हणून त्यापैकी एकाच्या जवळ मी बसले. पन्नास टक्के रिस्क.. नशिबाने ओढायची चेन नेमकी इथेच होती (सुषमाची लिस्ट, टिक!). मी खिडकी उघडून बसले.. तेवढ्यात गाडी कुठेतरी अधेमधेच थांबली. बाहेर मिट्ट काळोख. नारळाच्या झाडांचे आकार फक्त दिसत होते. मी मोबाईल काढून भिती वाटत नसल्याचा आव आणत होते. तो आणलेला आव बघायला तरी सुषमा हवी होती.. हातातल्या मोबाइल वर 'मैत्रिण.काॅम' तेवढी साथ देत होती. केकेचा 'वेडिंग ड्रेस' वातावरणाला पूरकच होती.  कथा वाचत असतानाच बाहेर अंधारातून "शुकशुक" करून मला कोणीतरी बोलवतय असा भास झाला. माझी पुरती बोबडी वळली होती. मोबाइलवरची नजर काढून बाहेर बघायची हिंमतच होत नव्हती. मनात ॐ नमः शिवाय चा जप केल्यावर जरा धीर आला. बाहेर पाहिलं, पण कोणीच नव्हतं. भूत जास्ती डेंजर का माणूस? असा खुळा सवाल मला तशाही परिस्थितीत हसवून गेला. तेवढ्यात गाडी सुटली. ही अशी मधेच कुठे थांबली होती ते बघायला मी ट्रेन ट्रॅकिंग अॅप उघडलं. मला धक्काच बसला.  माझ्या पॅसेंजर चं स्टेटस "नाॅट स्टार्टेड फ्राॅम मंगलोर सेंट्रल, वन अवर लेट" असं होतं!! म्हणजे आपण बसलोय आणि मंगलोर सेंट्रल हून 'राइट टाइम' सुटलेय ती ही नव्हेच की काय?? म्हणूनच सुषमा नाही दिसली. मी पण बावळटासारखी काही न बघता चढले गाडीत. अरे देवा मग ही गाडी कुठे जातेय?? असे असंख्य प्रश्न मला भंडावून सोडत होते. दुसर्या कोणाला भंडावायला होतच कोण? आता रेपिस्टच्या भितीची जागा भलत्याच गाडीत चढल्याच्या भितीने घेतली.  मी प्राण पणाला लावून पुढच्या स्टेशनची वाट बघू लागले, कळेल तरी ना कुठल्या दिशेला चाललोय. स्टेशनवर असताना 'कबाकापुत्तूर' अशा विचित्र नावाच्या गावाला जाणार्या गाडीची अनाउन्समेंट ऐकल्यासारखं आठवत होतं.. तिकडे निघालेल्या गाडीत चुकून बसले की काय? हे नकाशात कुठे आहे काहीच कल्पना नाही. एवढ्यात पुढचं स्टेशन आलं.. ते माझ्या नेहमीच्या रूटचंच स्टेशन होतं. ते बघून थोडा का होइना जीव भांड्यात पडला.
 
चुकीची माहिती देऊन उगाच घाबरवल्याबद्दल अॅप ला शिव्या देऊन, भितीचा टाॅपिक मी पुन्हा पूर्ववत केला.
आता एक तास होत आला होता, पण पुरेसं उजाडलं नव्हतच. पुढच्या स्टेशनात दुसर्या दाराजवळ खुडबूड ऐकू आली.. मी सतर्क झाले. खुडबुडीनंतर बोलण्याचे आवाज, पण सगळे पुरुषी. एकाही स्रीचा आवाज नाही.. तेवढ्यात त्यातला एक जण माझ्या कंपार्टमेंट जवळ आला. त्यानी जाताना माझ्याकडे पाहिलं. मी जोरजोरात ही लेडीज बोगी आहे असं सांगायचा प्रयत्न करत होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत. आता माझ्या हृदयाची धडधड त्या माणसालाही ऐकू येईल एवढी जोरात झाली असणार, पण मग ती मलाच का ऐकू येत नाहीये, म्हणून आश्चर्यानी मी माझं मन उघडून चेक केलं. तर त्या गाढवाला या माणसाची भिती वाटण्याऐवजी, तो आल्यानी तीच जाणीव झाली होती, जी सुषमाच्या येण्याने व्हायची.. मी डोक्याला हात लावून घेतला.. पलिकडे बसलेला तो माणूस आणि त्याचे मित्र यांची मल्याळम बडबड मला रामरक्षा म्हणल्यावर जसं सुरक्षित वाटतं तसा फील देत होती.. थोड्याच वेळात उजाडलं, आणखीही काही लोक चढले, उतरले, पण एकही स्री नाही.. असेल काही विचित्र योगायोग, असं म्हणत मी पय्यन्नूरला उतरले. काही क्षणात गाडी हलली, आणि मी बसले होते त्या डब्यावरची मोठ्ठी अक्षरं "सेकंड क्लास" डोळ्यांसमोरून हलली.
त्याच्या पुढच्या "लेडीज" लिहिलेल्या डब्यातल्या सगळ्या खिडक्या बायकांनी गजबजलेल्या होत्या. आणि त्यातल्याच एक खिडकीत दिसली, मला हात करून हसणारी... "सुषमा"!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle