आठवणीतला शिमगा

आठवणीतला शिमगा:
होळी आणि गणपती उत्सव या दोन सणांना कोकणातल्या लोकांच्या उत्साहाला अगदी उधाण येतं. बाहेर असलेले चाकरमानी अगदी न चुकता गावचा रस्ता पकडतात. आमच्या लहानपणी शिमग्याची वेगळीच मजा असायची. वेगवेगळ्या गावचे खेळे, गोमुचे नाच आणि पुठ्ठ्याच्या पालख्या घेऊन येणारी मुलं आणि या सगळ्यात मुख्य संकासुर!

गोमुचा नाच किंवा खेळे बाजूला वाजायला लागले की आजूबाजूच्या चारपाच घरात आम्ही मुलं त्यांच्या पाठोपाठ पळत असू. दरवर्षी तीच ठराविक गाणी असली तरी मज्जा वाटायची. एखादा मुलगाच गोमू व्हायचा, काळाप्रमाणे बदलणाऱ्या वेगवेगळ्या फॅशनचे कपडे गोमुच्या पेहरावात दिसायचे. हेल काढून म्हटलेली गाणी, ठराविक वाद्य परंपरा जोपासताना अलगद पुढच्या पिढीकडे सोपवायची. यातून मिळणारे पैसे सगळे जण वाटून घेत आणि त्यातून मनसोक्त दारू पीत ही त्याची नावडती बाजू!

आम्हा भावंडांना पण बाबा ती सोंगं आणून द्यायचे. माझ्याकडे जीन्स पँट आणि टीशर्ट होताच आत्याने पाठवलेला त्यामुळे एकदा बाबा घरात नसताना मी पण संकासुराचं सोंग घेऊन गेले वाडीत... कोल्ह्याची आय कोळसे खाय.. सान्यात पैसा एकतरी हाय काय... असं गाणं म्हणत सगळ्या वाडीत फिरले. वाडीतल्या लोकांनीही मला ओळखलं आणि पानाच्या चंचीतून काढून कौतुकाने भरपूर पैसे दिले. जेव्हा घरी आले आणि घरासमोर गाणं म्हटलं तेव्हा मिश्किल पणे हसलेले बाबा आजही आठवतायत! मात्र मला मिळालेले सगळे पैसे परत द्यायला लावले त्यांनीे...मला म्हणाले दिवसभर काबाडकष्ट करून पै पै जमवतात ते त्यानी कौतुकाने दिले तुला पैसे...पण तू मजा म्हणून नुसती फिर, पैसे मात्र त्याना परत दे.

होळी नेताना बोंबा मारण्याची, वाईट गोष्टी बोलण्याची प्रथा होती त्यानिमित्ताने होलयो म्हणून ओरडायची मुभा फक्त मुलगे, पुरुष यांनाच होती तरीही आम्ही मुली सुद्धा घराखालून होळी निघाली की त्यांच्या सारखंच मोठ्याने ओरडून घ्यायचो...पण बाबांनी आम्हाला कधीही तुम्ही ओरडायचं नसतं असं सांगितल्याचे आठवत नाही.
शिमग्याच्या निमित्ताने आज सहज आठवलं आणि लक्षात आलं किती छोट्या छोट्या गोष्टीत जीवनाची मूल्य शिकवायचे आपले पालक!

एकमेकांना सांभाळून घेत एकमेकांचा आदर करत, एकमेकांना स्पेस देत गावगाडा अगदी सुरळीत चालत असे... आता शिमग्यातल्या खेळयांची संख्या पण कमी झाली आणि ते अनुभव घेण्याची मानसिकता सुध्दा कमी झाली!
हा संस्कृती चा ठेवा कमी कमी होत उद्या पुढच्या पिढीला यूट्यूबवर बघायला लागू नये एवढंच वाटतं!
मिनल सरदेशपांडे

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle